न साधे योगी न संपडे
139.
न साधे योगी न संपडे जगी । ते नंदाच्या उत्संगी खेळे रूप ॥१॥
कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळी । गोपिका सकळी वेढियेला ॥२॥
गाईचे कळप गोपाळ अमुप । खेळतसे दीप वैकुंठीचा ॥३॥
निवृत्ति दीपडे वैकुंठे साबडे । यशोदामाये कोडे चुंबन देत ॥४॥
अर्थ:
जे ब्रह्मस्वरुप योग्यांच्या ध्यानात सापडत नाही जे जगाला दिसत नाही ते नंदाच्या मांडीवर खेळत आहे. तोच माझा हरि गोकुळात कृष्ण बनुन खेळत आहे व त्यांने सर्व गोपिका नादावल्या आहेत. तो वैकुंठीचा दिप गाईंचे कळप घेऊन गवळ्यांसोबत खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, मला ज्ञानप्रकाश देणारा निरागस कृष्ण माता यशोदेचे प्रेमाने चुंबन घेतो.
