(गौळणींची अवस्था)
3791.
(गौळणींची अवस्था)
सात पाच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गाऱ्हाणे देती कैसे ।
काय व्यालीस पोर चोरटे सिरजोर जनावेगळे ची कैसे।
दहि दुध लोणी शिंका नुरे चि काही कवाड जैशाचे तैसे ।
चाळवूनि नाशिली कन्याकुमरे आमुच्या सुनांसि लाविले पिसे गे बाइये ॥१॥
आझुनि तरी यासि सांगे बरव्या परी । नाही तरी नाही उरी जीवेसाटी ।
मिळोनि सकळै जणी करू वाखा । सखी तुज मज होईल तुटी गे बाइये ॥धृपद॥
नेणे आपपर लौकिक वेव्हार । भलते ठायी भलते करी ।
पाळतुनि घरी आम्ही नसता । तेथे आपण संचार करी ।
सोगया चुंबन देतो आळिंगन । लोळे आमुच्या सेजाबाजावरी ।
शिंकी कडाडा फोडी गोरसाचे डेरे धरिता न सापडे करी गे बाइये ॥२॥
आता याची चाड नाहो आम्हा भीड । सांपता कोड पुरवू मनिचे ।
सोसिले बहु दिस । नव्हता केला निस । म्हणुनि एकुलते तुमचे ।
चरण खांबी बांधेन जीवे । सरिसा जवे न चले काही याचे ।
अर्थ प्राण देता न सोडी सर्वथा । भलते हो या जिवाचे गे बाइये ॥३॥
घेउनी जननी हाती चक्रपाणी । देतिसे गौळणी वेळोवेळा ।
निष्ठुर वाद झणी बोलाल सकळा । क्षोभ जाइल माझ्या बाळा ।
जेथे लागे हात वाढते नवनीत अमृताच्या कल्लोळा ।
देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे बाइये ॥४॥
अर्थ :
एक दिवस सात पाच गवळणी मिळून यशोदेकडे कृष्णाविषयी गाऱ्हाणे सांगण्यासाठी आले व यशोदेला ते म्हणतात की हे यशोदे तू जगावेगळया चोरटया शिरजोर अशा मुलाला जन्म दिला का आहेस ? अग यशोदे आमच्या शिंकेमध्ये आता दही, दूध, तूप, लोणी काहीच शिल्लक राहात नाही घरचे दार पाहिले तर जसेच्या तसे लावलेले दिसते परंतू चोरी तर
