॥ श्रीएकनाथमहाराजकृत
25.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय पंचविसावा ॥
जानकीचे पाणिग्रहण
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
जानकीचे पाणिग्रहण -
श्रीराममंडपाआंत । आला चहू वरांसमवेत ।
जनकासी आल्हाद बहुत । आला दशरथ ऋषियुक्त ॥१॥
जनकें दिधला सन्मान । गाद्या पडगद्या वरासन ।
मृदुलिया लोटांगण । ऋषिससंपन्न सभेसीं ॥२॥
मधुपर्क :
मधुपराचें विधिविधान । चारी पुरुषार्थ चवाई पूर्ण ।
त्यावरी समाधि सुखासन । वरासन चौघांसी ॥३॥
सदोदिता आवाहन । अधिष्ठानासी आसन ।
कर्मरहितासी आचमन । चरणक्षाळण अचरणा ॥४॥
श्रीराम भूषणां भूषण । त्यासी अलंकार आभरण ।
निरावरनासी प्रावरण । सर्वगता आगमना वाहनादिक ॥५॥
सहजासी पाठीपोट । अखंडासी वस्तिपीठ ।
निःशब्दा शब्द स्पष्ट । निरंतरा अंतःपट लग्नार्थ धरिती ॥६॥
श्रीराम परब्रह्म स्वतंत्र । तोही धरी ब्रह्मसूत्र ।
वेदविधान आचार । श्रीरामचम्द्र प्रतिपाळी ॥७॥
असो हा अगाध परमार्थ । जनक आला मधुपर्कार्थ ।
त्याचा जाणोनि भावार्थ । श्रीरघुनाथ अंगीकारी ॥८॥
सर्व समता समसमान । तेंचि श्रीरामासी आसन ।
आशानैराश्यासी अर्घ्यदान । तेणे श्रीचरण समर्घ्य जाले ॥९॥
पाद्यार्घ्यालागीं तीर्थ । त्रिगुणत्रिवेणी गुणातीत ।
चैतन्यप्रवाहें पुनीत । यथोचित चिद्गंगा ॥१०॥
स्वये सुमेधा घाली उदक । चरण प्रक्षाळी विदेह जनक ।
तळी तीर्थे सकळिक । आली आवश्यक चरणतीर्था ॥११॥
श्रीरामाचे चरणतीर्थ । सेविता तीर्थे होती पुनीत ।
सुर नर सिद्ध आले तेथ । लग्नी रघुनाथ पहावया ॥१२॥
सुमेधा शुद्ध निजजीवन । घाली श्रीरामासी आचमन ।
चोविसा नामांसीं संपूर्ण । सर्वापोषण कर्माचें ॥१३॥
परब्रह्मींचा अधिष्ठात्रा । त्यासीही देती ब्रह्मसूत्रा ।
मान देतो वृद्धाचारा । श्रुतिव्यवहारा संरक्षी ॥१४॥
टिळे माळा शुद्ध सुमने । चिद्रत्ना्दि दिव्यभूषणें ।
भावे पूजिलें चौघांकारणें । परिधानें पीतांबरे ॥१५॥
उदक घालिता मूळांत । शाखा पल्लव टवटवित ।
तेंवी पूजिल्या रघुनाथ । सालंकृत बधु चारी ॥१६॥
रसस्वाद रसना घोटी । तेणेण् इंद्रियां पुष्टितुष्टि ।
राम पूजियेल्या जगजेठी । बंधुत्रिपुटी संपूज्य ॥१७॥
मुख्य स्थानी अग्नौकरण । तेणे सुखी देवब्राह्मण ।
तेंवी पूजिल्या रघुनंदन । चौघे जण संपूज्य ॥१८॥
एका मनासी संबोधन । तेणे इंद्रियां समाधान ।
तैसे अधिष्ठान रघुनंदन । तेणे बंधु आपण संतुष्ट ॥१९॥
दधिमधु एकत्रता । घातले चौघांचिया हाता ।
वेहाच्या निजभावार्था । श्रीरघुनाथा आते प्रीती ॥२०॥
विपरीत वेदविधान । दधि मधु प्राशी रघुनंदन ।
निष्कर्मासी कर्मबंधन । विस्मित जन सुरसिद्ध ॥२१॥
जनक म्हणे प्रतिगृह्यतां । प्रतिगृह्णामि म्हणविती रघुनाथा ।
विदेहें सोडिलिया अहंता । प्रतिग्राह्यता सर्वांची ॥२२॥
संकल्प सांडितां नरेंद्र । दधि मधु सेविता रामचम्द्र ।
सुमेधा घालीतसे पै नीर । प्रक्षाळी कर श्रीराम ॥२३॥
सवेंचि केले शुद्धाचमन । सद्गुरू म्हणती सावधान ।
नाही विलंब व्यवधान । वेगी सुलग्न साधावें ॥२४॥
श्रीरामपद रिते न पडे । पूर्णता पायी पायी मांडे ।
दोन्ही सद्गुरू दोहींकडे । वरू वाडेंकोडें चालविले ॥२५॥
सीतेसह चारही कन्यांचे गौरिहरपूजन :
गौरीहरीं सीता सती । गौरीहरातें शिंपिती ।
शिवासी श्रीरामाची प्रीती । आला लग्नार्थीं भवानीसीं ॥२६॥
मुख्य माया अंतःपट । तिसी श्रीरामे शेवट ।
मनक निजभाग्यें वरिष्ठ । सोयरा श्रेष्ठ श्रीराम ॥२७॥
श्रीरामनामाचें नित्य स्मरण । अंतःपटनिवारण ।
त्यासीही अंतःपट जाण । धरिती ब्राह्मण वेदार्थी ॥२८॥
सुटावया देवांचे बंधन । मुख्य सीताचि कारण ।
तिचे साधावया सुलग्न । रवि सावधान घडी राखे ॥२९॥
लग्नघटका भरताच "सावधान" म्हणून उच्चार :
घडी भरतांची न लगे क्षण । म्हणती नित्यसावधान ।
सत्य सवेंगे चाढे जीवन । नाही व्यवधान शब्दाचे ॥३०॥
सांडाचौघींची उठाउठी । राहा निजदृष्टी सावधान ॥३१॥
अंतःपट आहे ज्यासी । आधीआ सावध करा त्यासी ।
अक्षर निमिष श्वासोच्छ्वासीं । भडी वेगेंसीं भरताहे ॥३२॥
यालागी नित्यसावधान । सद्गुसरु म्हणताहे आपण ।व
चना न द्यावे प्रतिवचन । सावधान निजरूपीं ॥३३॥
शब्दार्थें महामौन । धरी तो नित्य सावधान ।
ज्यासी शब्दार्थीं अभिमान । असावधान तो सदा ॥३४॥
अंगि जाणिवेचे जाणपण । वचना न देती प्रतिवचन ।
तेणे वचनें त्यांसी दूषण । सावधानपण त्यां नाही ॥३५॥
अति समयो सन्निध लग्न । उभय भागीं सावधान ।
अच्युतचिंतने राखावे मन । अति सुलग्न स्वानंदे ॥३६॥
ॐपुण्याहं वचन । पूर्णतेचें पूर्णपण ।
त्यापूर्णता रघुनंदन । निजात्मलग्न स्वये साधी ॥३७॥
अंतरपात काढल्यानंतर वधूवर परस्परांना वरतात :
ॐपुण्याहं मुळींची गोष्टी । तेणे शब्द विरे प्रणवाच्या पोटी ।
अंतःपट फिटला उठाउठी । सीता गोरटी वरी राम ॥३८॥
नयनी नयन संलग्न । एकचि जाले देखणेंपण ।
प्रानपती वरिता पूर्ण । प्रानें प्राण एक जाले ॥३९॥
वसिष्ठाच्या लग्नाक्षता । एकात्मता पंचभूता ।
श्रीरामे वरिली सीता । एकात्मता निजलग्नीं ॥४०॥
एक अवयवी एक अवयव । एक जाले सीताराघव ।
एक जाले जीवभाव । लग्न अपूर्व श्रीवसिष्ठे ॥४१॥
सीतेचिये निजमाथां । श्रीराम घाली लग्नाक्षता ।
तोचि हस्त पावे सीता । सुखरूपता स्वानंदे ॥४२॥
श्रीरामाचे निजमाथां । अक्षतां घालूं जाता सीता ।
सर्वाभूतीं देखे रघुनाथा । कर्तव्यता सलज्ज ॥४३॥
पाणिग्रहणीं रघुनाथा । पावोनिया जी सर्वथा ।
क्रिया पौरुषल्या समस्ता । निष्कर्मता श्रीरामे ॥४४॥
अर्धनारीनटेश्वरी । जो पुरुष तोचि नारी ।
श्रीरामही तैशाच परी । सीता वरी निजात्मता ॥४५॥
श्रीराम स्वये चैतन्यमूर्ती । सीता तंव चिच्छक्ती ।
लग्न लागले एकात्मप्रीतीं । चतुरोक्ती चहू ठायी ॥४६॥
सीतेने वरिला श्रीरामचंद्र । ऊर्मिलेने वरिला सौमित्र ।
मांडवीनें वरिला भरत वीर । शत्रुघ्न शूर श्रुतकीर्तीने ॥४७॥
चौघी कन्या चौघे वर । लगन लागले सविस्तर ।
वोहरें शोभती मनोहर । जयजयकार प्रवतला ॥४८॥
जयजयकार, मंगलवाद्यवादन, संगितनृत्यादि सोहळा :
ऋषी करिती जयजयकार । सुमने वर्षती सुरवर ।
मंगळतुरांचा गजर । नादें अंबर कोंदलें ॥४९॥
सुरीं दुंदुभित्राहाटी । भीरीमृदुंग किंकाटी।
नाद न समाये नभाचे पोटी । निधा वैकुंठी उठत ॥५०॥
रंभा उर्वशी नाचणी । नाचती जनकाच्या रंगणीं ।
गंधर्व मधुर गाती गाणीं । ओंवाळणी दोही भागीं ॥५१॥
पाणिग्रहण, कंकणबंधन :
असो हे जाले पाणिग्रहण । वोहरां बांधावया कंकण ।
वसिष्ठ येवोनि आपण । सूत्र परिधान सूतवी ॥५२॥
गगनगभींचा सूक्ष्म तंतु । तोचि अष्टधा वेढितु ।
स्थूळाभिमानें दृश्य होतु । मग तोडितु दो ठायी ॥५३॥
अखंड खंड केले जाण । घालोनि त्रिगुणांए वळण ।
अर्ध स्थ्रीनामें कांकण । अर्ध परिपूर्ण पुरुषत्वे ॥५४॥
फेडिली मायेची वधूवस्त्रें । श्रीराम मेचूनि अच्छिद्रें ।
अष्टपुत्र्या पीतांबरे । नेसलीं वोहरें स्वानंदे ॥५५॥
मायामळिण वधूवस्त्रासी । न घे शतानंद उदासी ।
वसिष्ठ न घे वरवस्त्रासी । दोघे उदासी पुरोहित ॥५६॥
घ्यावया मायामळिण वासासी । कलहो सलोभ सगोत्रजांसी ।
विसरोनियां निजात्मत्वेंसीं । देह लोभासीं भांडती ॥५७॥
कोट्यानुकोटी निजधना । जनकें दिधली वरदक्षिणा ।
सौभाग्यद्रव्यें देता वाणा । निंबलोणा उतरिती ॥५८॥
जीवी जीवा पडली मिठी । बाह्य पालवा बांधिली गांठी ।
राम देखोनिया दृष्टी । उल्लास पोटी जानकीच्या ॥५९॥
विवाहहोम वगैरे :
विवाहहोम निजनिर्धारी । वोहरें आणावीं तुम्ही घ्यावी ॥६०॥
हांसे आले रघुनाथासी । विपरीत विधि लौकिकासी ।
वसिष्ठ म्हणे श्रीरामासी । वृद्धाचारासी प्रतिपाळी ॥६१॥
स्वये श्रीराम विचारी । माझी प्रकृति मजमाझारी ।
न घेता बैसली कडेवरी । मजहूनि दुरी होऊ नेणे ॥६२॥
न बैसवितां बैसली कडिये । जीवे भावे मज हे पढिये ।
नांवरूपाचे मज मढिये । उभवोनि गुढिये हे नांदे ॥६३॥
हे माझेनि शोभे रूपवंती । माझेनि इसी नित्यस्थिती ।
माझेनि इसी गमनगती । लाजूं किती लौकिका ॥६४॥
तिसी न लावितां हात । नोवरी उचली रघुनाथ ।
अलिप्तपणें घेवोनि येत । तेणे विस्मित ऋषिसमूह ॥६५॥
चहू पुरुषार्थां चारी मुक्ती । तैसी चारी वोहरें शोभती ।
कडे घेतल्या कवण्या रीती । तेही स्थिती अवधारा ॥६६॥
सायुज्यता सीता सती । तीसी उचली रघुपती ।
उर्मिला स्वरूपता शोभती । उचलिली प्रीती सौमित्रे ॥६७॥
मांडवी स्वये समीपता । भरते उचलिली तत्वता ।
श्तकीर्ति सलोकता । होय उचलिता शत्रुघ्न ॥६८॥
एवं बोहरे आली वेदिकेप्रती । शतानंदे विधिवेदोक्तीं ।
केली विवाहहोमसमाप्ती । द्विजां देती धनधान्य ॥६९॥
जनकें केला अनुक्रम । येथे करावा चतुर्थ होम ।
चारी दिवस संभ्रम । सोहळा परम करावा ॥७०॥
धेंडा नाचविणे :
धेंडा नाचवावा येथे । ते पहावया जन आर्तभूत ।
वचन न मानीच रघुनाथ । भविष्यार्थ जाणोनी ॥७१॥
धनुर्भंगाचा अनुक्रम । क्रोध पावेल परशुराम ।
दारुण होईल संग्राम । अति दुर्गम दुर्धर ॥७२॥
जमदग्नीचा क्रोधानळ । परशुरामाचा क्रोध तुंबळ ।
उभय क्रोधे गर्वप्रबळ । नगरी तत्काळ जाळील ॥७३॥
प्रजा पीडती समस्त । हे श्रीरामाचे मनोगत ।
वसिष्ठ जाणे इत्थंभूत । आणि हृद्गत रामाचे ॥७४॥
वर्हाठडाहूनि अधिक । पुढे कार्य आहे अधिक ।
आणि अयोध्येसी जाता आवश्यक । जाणे एकाएक वनवासा ॥७५॥
येथे जाले पाणिग्रहण । लंकेसी मारिल्या रावण ।
तै सीतेचे माझे होईल लग्न । सोहळा संपूर्ण युद्धाचा ॥७६॥
तेथे नाचेल रणधेंडा । ओवाळनी राक्षमुंडा ।
पडतील अति उदंडा । बाणप्रचंडासमवेत ॥७७॥
जानकीविवाह अल्प सोहळा । सोडणें आता देवांची बंदिशाळा ।
तोडणे आहे ग्रहांची शृंखला । तो आगळा उत्साह ॥७८॥
श्रीरामाच्या निजभावासी । वसिष्ठें जाणोनि सावकाशी ।
तेणे सांगितले जनकासी । वेगी वोहरांसी बोळवीं ॥७९॥
श्रीराम नव्हे गा प्राकृत । वाचे वचन ब्रह्मलिहित ।
जनकें मानोनि निश्चित । हर्षयुक्त बोळवी ॥८०॥
वधूवरांना वस्त्रालंकारादि आंदण देणे :
वधूवरांसी आंदनें । दिव्यालंकारभूषणें ।
नानापरींचीं आभरणे । बहु सुवर्ण गजपृष्ठीं ॥८१॥
अतिसूक्ष्में रोमांबरें । पट्टकूलें पीतांबरे ।
अति मोलाची नानाकारें । वस्त्रे विचित्रें दिधली ॥८२॥
मुक्ताफळांच्या झालरी । दिधल्या रथांच्या हारी ।
गज गर्जती दळभारी । अलंकारी डुल्लती ॥८३॥
रत्नाालंकारीं मनोहर । अमित दिधले असिवार ।
पदक कंठ्या दासी अपार । नवरस हार शोभती ॥८४॥
जनकासी अति उल्लास । सेवा करावया श्रीरामास ।
मुकुटकुंडलांचे घोंस । दिधले बहुवस विश्वासी ॥८५॥
सुमेधा बोले भाववचन । अनन्यभावें आम्ही शरण ।
जीव श्रीरामासी दिधला आंदण । बाह्य आभरणां कोण पाड ॥८६॥
जनक बोले हर्षयुक्त । देह गेह वित्त जीवित ।
केले रामार्पण समस्त । जाण निश्चित सुमेधे ॥८७॥
ऐसी दोघे अति उल्लासीं । आंदनें देवोनि वोहरांसीं ।
जनक बोळवीत रामासी । बहु मार्गासी स्वये आला ॥८८॥
प्रयाणासमयी रामांचे अभिवादन, आशीर्वादग्रहण :
विश्वामित्रें तरी आपण । करूनियां वसिष्ठासी नमन ।
दोही रायांसी पुसोनि जाण । करी गमन स्वाश्रमा ॥८९॥
राम लक्ष्मण दोघे जण । करिती साष्टांग नमन ।
ऋषीनें देवोनि आशीर्वचन । करी गमन स्वाश्रमा ॥९०॥
श्रीराम म्हणे मिथिलानाथा । येवोनि आपण राहवें आता ।
येरें वसिष्ठचरणीं ठेविला माथा । होय पुसता व्याह्यासी ॥९१॥
दशरथे अति सन्मान । करूनि दिधले आलिंगन ।
जनक श्रीरामासी आपण । घाली लोटांगण सद्भावे ॥९२॥
कुशध्वजासमवेत । आलिंगूनी चारी जामात ।
जनक अत्यंत हर्षयुक्त । निघे त्वरित निजनगरा ॥९३॥
सर्वाम्चे अयोध्येकडे गमन :
करिता अयोध्यागमन । परशुरामाचें आगमन ।
ज्याचेनि विश्व कोपायमान । अति दारुण भयानक ॥९४॥
रामे श्रीरामा पडिपाडु । रामा श्रीरामा युद्ध दृढु ।
रामे श्रीरामा प्रेम गोडु । कथाकैवाडु अवधारा ॥९५॥
एकाजनार्दना शरण । जाले जानकीपाणिग्रहण ।
श्रीरामे रामा समाधान । कथा गहन अति गोड ॥९६॥
स्वस्ति श्रीबावार्थरामायने बालकांडे एकाकारटीकायां
जानकीपाणिग्रहणं नाम पंचविंशतितोध्यायः ॥२५॥
॥ ओंव्या ९६ ॥
