वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › १. बालकाण्ड - अध्याय २७ › २२. विवाहोत्सव

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088275 · अभंग क्र. २२

22.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय बाविसावा ॥
सूर्यवंशवर्णन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

दशरथ राजा मिथिलेला येतो :

जीवशिवांचे समाधान । ते हे कथा रामायण ।
पवित्र परिकर पावन । जगदुद्धरन जडजीवां ॥१॥
श्रीरामी संलग्नता । सर्वांगें समरसें सीता ।
यादि नांव सुलग्नता । ते लग्नकथा अवधारा ॥२॥
मार्गीं वसोनि चारी वस्ती । राजा दशरथ शीघ्रगती ।
आला विदेहपुराप्रतीं । जेथे रघुपति निजविजयी ॥३॥
विदेहपुरा वस्ती आले । ते त्रिभुवनी विजयी जाले ।
विश्वामित्रे मित्रत्व केले । गुरुत्व दिधले वसिष्ठें ॥४॥
श्रीवसिष्ठें विश्वामित्रु । केला श्रीरामी धनुर्विद्यागुरु ।
आपण ब्रह्मविद्यासद्‌गुरु । विजयी रामचम्द्र याचेनि ॥५॥
वसिष्ठनिष्ठानिजनिर्धारीं । दशरथ पावला विदेहपुरी ।
रत्न्कळसांचिया हारी । तेजे अंबरीं रवि लोपे ॥६॥
दशरथ आला निजनगरीं । छत्रे पल्लवछत्रें वरी ।
निशाणे त्राहाटिल्या भेरी । मंगळतुरीं गर्जत ॥७॥

जनकाने सामोरे जाऊन सर्वांचे स्वागत केले :

आला ऐकोनि दशरथ । जनक सामोरा धांवत ।
शतानंद पुरोहोत । सवे समस्त प्रधान ॥८॥
पुढे वसिष्ठ देखिला दृष्टी । धांवोनि चरणी घातली मिठी ।
जगदुद्धार स्वचरणांगुष्टी । सभाग्य सृष्टी मी एक ॥९॥
वसिष्ठचरण जाले प्राप्त । आजि माझे कुळ पुनीत ।
आजि माझे पितर तृप्त । वंश सनाथ आजि माझा ॥१०॥
वसिष्ठ भेटल्या अभिष्ट । वसिष्ठ भेटल्या अनिष्ट इष्ट ।
वसिष्ठ भेटल्या बाग्य वरिष्ठ । वसिष्ठें श्रेष्ठ निजदास ॥११॥
वसिष्ठ अत्यंत सज्ञान । जनक सद्‌भाव संपूर्ण ।
देखोनि दिधले आलिंगन । समाधान दोघांसी ॥१२॥
दोनी दीप एक होती । द्वैतलोपें एकचि दीप्ती ।
तैसे आलिंगन देती । अभेदवृत्तीं आल्हाद ॥१३॥
वसिष्ठ देहींच विदेही । जनक सहजची विदेही ।
दोघे निःसंदेह विदेही । दिधले पाही आलिंगन ॥१४॥
जनक वसिष्ठांचे भेटी । आल्हाद न माये सृष्टी ।
पुढे दसह्रथ देखिला दृष्टी । उठाउठी आलिंगी॥१५॥
जानकीजनका श्रीराम जनका । आलिंगन पडले देखा ।
तेणे संतोष सकळिका । तिही लोका आल्हाद ॥१६॥
एक जनक एक दसह्रथ । समर्थु आलिंगी समर्थ ।
तेणे सुखावे रघुनाथ । पुरला मनोरथ सीतेचा ॥१७॥
दोघा अतिप्रीतीं आलिंगन । दोघे राजे सुखसंपन्न ।
सीतारघुनाथांचे लग्न । वेगी सुलग्न करावे ॥१८॥
देखोनि भरत आणि शत्रुघ्न । राज प्रधान विस्मयापन्न ।
विस्मित मिथिलेचे जन । रामलक्ष्मण केंवि आले ॥१९॥
कांही जाला अपमान । किंवा चुकले विधिविधान ।
दोघे आले हे रुसोन । अति उद्विग्न विदेही ॥२०॥
पुसोनि येता कौशिकासी । दोघे होते गुरुसेवेसी ।
तेचि दोघे दशरथापासी । शीघ्रवेगेंसी का आले ॥ २१
जनक वसिष्टासी पुसे आपण । रामलक्ष्मण दोघे जण ।
येथे का आले रुसोन । कोण विधान मी चुकलों ॥२२॥

दशरथपुत्रांचे वसिष्ठाकडून वरणन :

विदेहासी सांगे वसिष्ठ । रामलक्ष्मण ते ज्येष्ठ ।
भरतशत्रुघ्न हे कनिष्ठ । सांगता स्पष्ट कळेना ॥२३॥
रूपरेखा समसमान । ठाणमाण गुण लावण्य ।
हे दोघे रामलक्ष्मण । भरतशत्रुघ्न ते कवण ॥२४॥
ऐसे बोलता विदेहासी । हांसे आले वसिष्ठासी ।
मग बैसवोनि सावकाशीं । पूर्ववृत्तांतासी साम्गत ॥२५॥
भरत रामपिंडाचा अर्धभाग । तो रामरूपी दिसे सांग ।
शत्रुघ्न सौमित्राचा भाग । त्याचे सर्वांग तद्‌रूप ॥२६॥
हे चतुर्विध चारी मूर्ती । एकरूपें चतुर्धा भासती ।
ऐसे ऐकोनि भूपती । विस्मये चित्ती तटस्थ ॥२७॥
तेचि समयी विश्वामित्र । घेवोनि आला रामसौमित्र ।
दशरथाचे चारी पुत्र । शोभा विचित्र एकत्वे ॥२८॥
देखता चतुर्मूर्ति चतुरर्क । पाहणे पाहता अवघे एक ।
ऐकोनि जनका परमसुख । परम पुरुष हे चारी ॥२९॥

दशरथपुत्रांच्या लग्नाची जनकाकडून सूचना :

कुशध्वज माझा कनिष्ठ बंधू । त्याच्या कन्या स्वरूपसिंधू ।
भरतशत्रुघ्ना करू वधू । उर्मिलासंबंधू लक्ष्मणासी ॥३०॥
ऐसा जनकाचा मनोरथ । चवघां बंधूंसहित ।
जामाता जोडला रघुनाथ । उल्लासत स्वानंदे ॥३१॥

विश्वामित्रांची दशरथाकडून स्तुती :

घेवोनी रामलक्श्मण । विश्वामित्र आला आपण ।
दशरथ घाली लोटांगण । हर्षे चरण वंदिलें ॥३२॥
आनंदें दशरथ बोलत । तुझी धनुर्विद्या समर्थ ।
तुझेनि विजयी रघुनाथ । कीर्ति विख्यात तुझेनि ॥३३॥
तुझेनि ताटिकेसी अंत । तुझेनि सुबाहूसी घात ।
तुझिये कृपे जानकी प्राप्त । तू अतिसमर्थ ऋषिवर्या ॥३४॥
माझे अत्यंत कृपणपण । नेदीं म्हणे रामलक्ष्मण ।
ते त्वा आणोनि आपण । यशभूषण आपण दिधले ॥३५॥
तुझेनि निजशिष्यपणें । तिही लोकी मिरवे लेणें ।
ऐसी लेवविलीं भूषणे । कंठाभरणें शिवासी ॥३६॥

विश्वामित्रांचे उत्तर :

ऐसे ऐकता स्तुतिस्तोत्र । हांसोनि बोले विश्वामित्र ।
रामचम्द्रे मी पवित्र । ब्रह्मी ब्रह्मसूत्र श्रीराम ॥३७॥
श्रीरामाचेनि शिष्यपणें । तिही लोकी माझे गुरुत्व वंदनें ।
श्रीरामे माझे सनाथ जिणें । जिणें मरणें मज नाही ॥३८॥
पूर्वी यागीं मी अनाथ । तो श्रीरामे केलों सनाथ ।
कर्माकर्मा करोनि घात । श्रीरघुनाथ तुष्टला ॥३९॥
श्रीरामशिष्यत्वाची नवाई । मज देहवंता वम्दी विदेही ।
रामकीर्ति सांगो काई । पाषाण पायी पुनीत ॥४०॥
ज्याचेनि पाये तरती पाषाण । त्याचेनि गुरुत्वे मी धन्य ।
माझेंही यज्ञाचें फण जाण । ब्रह्म परिपूर्ण श्रीराम ॥४१॥
ऐसे बोलता विश्वामित्र । सुर सिद्ध करिती जयजयकार ।
वर्षतीं सुमनांचे संभार । प्रेमे विश्वामित्र मूर्च्छित ॥४२॥
वसिष्ठ येवोनियां तेथ । विश्वामित्रा करी सावचित ।
जे बोलिलासी ते इत्थंभूत । श्रीरघुनाथ परब्रह्म ॥४३॥
आल्हादे दशरथ उठोन । आलिंगी श्रीराम-लक्ष्मण ।
रत्नें् धन धान्य ओंवाळून । चौघेही जण बैसविले ॥४४॥
वसिष्ठविश्वामित्रवचन । श्रीराम ब्रह्म पूर्ण ।
तेणे जनकासी आल्हाद पूर्ण । करावया लग्न उद्यत ॥४५॥

दशरथाच्या चारही मुलांच्या विवाहनिश्चितीसाठी कुशध्वजाला निमंत्रण :

शतानंत पुरोहितासी । जनकधाडी कुशध्वजापासीं ।
तो चाकटा बंधु आम्हांसी । शीघ्र त्यासी आणावें ॥४६॥
संकाशा नाम नगरीसी । म्या राज्यी स्थापिले प्रतिष्ठेसीं ।
दोघी कन्या आहेत त्यासी । लावण्यराशी सुंदरा ॥४७॥
श्लाघ्य संबंधुरघुनंदना । दोघी द्याव्या भरत शत्रुघ्नां ।
यालागी त्यासी शीघ्र आणा । लग्नीं सुलग्ना साधावया ॥४८॥
ऐकोनि जनकाचें आकारण । शीघ्र कुशध्वज आला आपण ।
रायासी करोनि नमन । आलिंगन दिधले ॥४९॥
जनकसभा सावकाशीं । मूळ धाडिले दशरथासी ।
वेगी बोलावूनी त्यासी । लग्नदिवसासी नेमावया ॥५०॥
दशरथ आला ऋषिमूळी । वसिष्ठ वामदेव रायाजवळी ।
कश्यप कात्यायन जाबाली । तपोबळी मार्कंडेया ॥५१॥
आले सखे सुहृज्जन । जनकें दिधला सन्मान ।
अवघे बैसविले सावधान । लग्नदिन नेमावया ॥५२॥
विवाह करावया सत्कुळीं । दोही वंशांची वंशावळी ।
शोधोनि पहावी समूळी । ऋषि सकळी नेमिले ॥५३॥
वराचे कुळ समस्त । सांगावया वसिष्ठ कुळदैवत ।
तेणे सांगावा आद्यंत । इत्थंभूत रविवंश ॥५४॥

वसिष्ठकृत सूर्यवंशवर्णन :

ऐकोनि ऋषींचे उत्तर । वसिष्ठें केला नमस्कार ।
ऐका सूर्यवंशविस्तार । अति पवित्र भूपती ॥५५॥
सूर्यवंशाचिये ख्याती । महापातकी मुक्त होती ।
एक एक चक्रवर्ती । त्रिजगती भूषण ॥५६॥
सूर्याचा मुख्य मनु पुत्र । मनूचा इक्ष्वाकु पवित्र ।
तेणे अयोध्या मुक्तक्षेत्र । केले नगर निजवासा ॥५७॥
यालागी सूर्यवंशी जाण । म्हणती इक्ष्वाकुनंदन ।
म्हणावया हेंचि कारण । पदव्याख्यान याचि स्थितीं ॥५८॥
येच वंशी पृथु चक्रवर्ती । रसातळा जाता क्षिती ।
पृथूनें धरिली आत्मशक्तीं । पृथ्वी म्हणती त्याचेनि ॥५९॥
तेणे केले पृथ्वीचे दोहन । सुखी केले सकळ जन ।
पूजाभक्तीने पावन पूर्ण । अनर्घ्य रत्‍न सूर्यवंशी ॥६०॥
येच वंशी उत्तानचरण । त्याचा पुत्र ध्रुव जाण ।
बाळपनी देव सुप्रसन्न । करोनि आपण अढळ जाला ॥६१॥
योनिद्वारें न जन्मतां । पित्याचे कुशीं जन्म पावतां ।
परी मरों नेदीच निजधाता । तो मांधाता रविवंशीं ॥६२॥
शिबी चक्रवर्ती येच वंशी । पक्ष्यासाठी तुकी मांसासी ।
नगरी नेली वैकुंठासी । सत्वराशी शिबी देखा ॥६३॥
सूर्यवम्शीं अति पवित्र । जन्म पावला हरिश्चंद्र ।
स्वप्नदानविधि उपचार । केला साचार जागृती ॥६४॥
दक्षिणा द्यावया समग्र । डोंबाघरीं होय परतंत्र ।
विकोनियां स्त्रीपुत्र । विश्वामित्र सुखी केला ॥६५॥
रक्मांगद येच वंशीं । व्रत पाळोनि एकादशी ।
नगरी नेली वैकुंठासी । व्रतें जगासी उद्धार ॥६६॥
सुरासुरा नागवे वैरी । धूमांकित पातालविवरीं ।
त्याते शोधोनियां मारी । तो धुंधुमार रविवंशीं ॥६७॥
त्याचा पुत्र धर्मांगद । एकादशीव्रतीं आल्हाद ।
शिर देता न मानी खेद । परमानंद पावला ॥६८॥
सूर्यवंशींचे भूपती । एका चढी एकाची ख्याती ।
श्रवणें जन पावन होती । वंशात्पत्ती अवधारा ॥६९॥
येच वंशी अंकऋषी । व्रत साधोनि द्वादशी ।
देव आणिला गर्भवासासी । दुर्वासासी वांचविलें ॥७०॥
येच वंशी राजे सगर । ज्यांचेनि नांवे जाले सागर ।
कपिलशापें जळतां शूर । करी उद्धार भगीरथ ॥७१॥
भगीरथें निजात्मशक्तीं । आणोनियां भागीरथी ।
पूर्वज तारिले नेणो किती । त्रिजगती उद्धार ॥७२॥
भगीरथसुत प्रवीण युद्धी । देवा दैत्या युद्धसंधीं ।
इंद्रें बैसवोनियां खांदी । नेला त्रिशुद्धी युद्धासी ॥७३॥
बैसला इंद्राच्या ककुदीं । यालागी काकुत्स्थ म्हणती ।
त्यांच्या नामाची निजख्याती । काकुत्स्थ म्हनती श्रीरामा ॥७४॥
रविवंशीं अति निष्पाप । राजा जन्मला दिलीप ।
कामधेनु उपासी नृप । अति साक्षेपे पुत्रार्थीं ॥७५॥
कामधेनु प्रसन्न पूर्ण । रघु पुत्र पावला सुलक्षण ।
ज्याचेनि नांवे रघुनंदन । वंशींचा जाण म्हणताती ॥७६॥
रघूचा अज अतुर्बळी । अति प्रतापी भूमंडळी ।
वैरी अजप्राय बळी । पायांतळी मेमाती ॥७७॥
त्या अजाचा दशरथ । शुक्र जिंकिला युद्धात ।
स्वर्गी जाला यशवंत । सन्मानिला अमरेंद्रें ॥७८॥
पराभविलें दैत्यगुरूसी । अति आल्हाद बृहस्पतीसी ।
आलिंगूनियां हृदयेंसीं । निजनगरासी धाडेला ॥७९॥
त्याचे पुत्र चौघे जण । श्रीराम आणि लक्ष्मण ।
धाकुटे भरत शत्रुघ्न । आदिकारण हे चारी ॥८०॥
केला ताटिकेचा निर्वाळा । सुबाहु मारिला राक्षमेळा ।
रावण अपमानिला बळा । चरणी शिळा उद्धरिली ॥८१॥
सूर्यवंशींचें वर्णन । वसिष्ठ गर्जें आल्हादोन ।
सुमनें वर्षती सुरगण । हर्षत मन जनकाचें ॥८२॥
ऐकोनि सूर्यवंशावली । महासिद्धीं पिटिली टाळी ।
धन्य धन्य जनकबाळी । भाग्ये तत्कुळीं सुलग्न ॥८३॥
परिसोनि निजवंशवर्णन । दशरथासी आल्हाद पूण ।
वसिष्ठावरी ओंवाळून । देत गोदान लक्षकोटी ॥८४॥
मग उठोनि महाऋषीं । बैसविले वसिष्ठासी ।
तू सूर्यवंशाचा सद्‌गुरू होसी । रविवंशासी भूषण ॥८५॥
सूर्यवांशीं जे जे भूप । सांगितले अतिप्रताप ।
ते तुझेनि निष्पाप । तू सद्‌रूप सद्‌गुरू ॥८६॥
जेवी सूर्य निजतेजेंसी । सूर्यकांतीं तेज प्रकाशी ।
तेंवी तुझेनि अनुग्रहेंसी । सूर्यवंशासी प्रताप ॥८७॥
अचेतन तुझिया कृपादृष्टी । सूर्यमंडळीं तपे छाटी ।
तुझा अनुग्रह जाल्यापाठीं । शिष्य सृष्टी निजविजयी ॥८८॥
वसिष्ठ वक्ता सुखस्वानंद । सभेसी जाला परमानंद ।
जनक भाग्याचा अगाध । लग्नसंबंध श्रीरामी ॥८९॥
एकाजनार्दना शरण । जाले सूर्यवंशव्याख्यान ।
जनकवंशांचे निरूपण । सावधान अवधारा ॥९०॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
सूर्यवंशनिरूपणं नाम द्वाविंशतितमोऽध्यायः ॥२२॥
॥ ओंव्या ९० ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग