वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › १. बालकाण्ड - अध्याय २७ › ७. विश्वामित्रांचे अयोध्येत आगमन

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088277 · अभंग क्र. ७

7.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय सातवा ॥
श्रीरामांची तीर्थयात्रा

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

धन्य रामायण सृष्टी । धन्य वाल्मीकाचे वाग्वृष्टी ।
अक्षरीं अक्षरपरिपाटी । दोष कोट्यनुकोटी नासती ॥१॥
नासती महापातकें । नासती द्वंद्वेदुःखे ।
रामकथा ऐकता हरिखें । सुख महासुखे थोरावे ॥२॥
येथोनि श्रीरामचरित्र । अपवित्रा करी अति पवित्र ।
कथाकौतुक अति विचित्र । श्रोती सादर परिसावे ॥३॥

श्रीरामजन्माने लंकेत घडलेल्या अशुभसूचक घटना :

श्रीराम जन्मला अयोध्यापुरीं । तंव वीज पडे लंकेवरी ।
भूस्फोटन नगरद्वारीं । भूकंप नगरी त्रिकेटेंसीं ॥४॥
रावण जंव भद्रीं चढे । तंव मुकुट पायरीवरी पडे ।
वायुघातें छत्र मोडे । सभेचे हुडे खचोनि पडती ॥५॥
कुंभकर्णाच्या घरावरी । दिवाभीत घूं घूं करी ।
इंद्रजित आरशाभीतरीं । देखे आशिर शरीर ॥६॥
मंदोदरीची गळसरी । तुटोनि पडे अग्निभीतरीं ।
तीते काढी जंव सुंदरी । तंव भस्म करी हुताशन ॥७॥
ऐसा विघ्नांचा आवर्त । तेणे राणिवसां आकांत ।
येणे राक्षसकुळा घात । हाहाभूत निशाचर ॥८॥
रावण सांगे भयेंकरीं । दृढपणें असा रे नगरी ।
येथोनिकोणीं न जावे दूरी । अहोरात्री सावधान ॥९॥
प्रधानादिक सभानायक । तिही थोर घेतला धाक ।
रावणा लागली धुकधुक । अरिष्ट आत्यंतिक देखोनि ॥१०॥

कुमारांचे व्रतबंधादि संस्कार व अध्ययन :

येरीकडे अयोध्येंसी जाण । श्रीवसिष्ठ आपण ।
चौघा कुमारांचे विधान । संस्कारपूर्व करवता झाला ॥११॥
जातकर्म नामाभिधान । कटिसूत्र अन्नप्राशन ।
चौलकर्म वायनदान । केले संपूर्ण विधियुक्त ॥१२॥
ऐश्वर्याचे आविष्करें । व्रतबंधाचेनि गजरे ।
दानें सन्मानें सत्पात्रें । सुखी नृपवरें यापरी केले ॥१३॥
रामाचा व्रतबंध । सुखी केले विप्रवृंद ।
स्वानंदे निघाले दोंद । डोलत परमानंद पावले ॥१४॥
श्रीरामाचे व्रतबंधन । सुखी केले अकिंचन ।
वणवण निमाली पूर्ण । मागतेपण मुक्त जाले ॥१५॥
जालिया व्रतबंधन । वसिष्ठापासीं चौघे जण ।
आरंभिले वेदाध्ययन । शास्त्रव्याख्यान वेदांत ॥१६॥
श्रीराम वेदाचें जन्मस्थान । त्यासी संस्कारमंत्रें जाण ।
पठन जाले शास्त्र संपूर्ण । अगाधपण प्रज्ञेचें ॥१७॥
यापरी रघुनाथासी जाण । जाली षोडश वर्षें संपूर्ण ।
करावया तीर्थाभिरामन । रघुनंदन उद्यत ॥१८॥
प्रार्थूनि वसिष्ठातें । त्या सद्‌गुरूच्या अनुमतें ।
आज्ञा मागोनि दशरथातें । श्रीराम तीर्थातें निघाला ॥१९॥
मग पाहोनिया सुदिन । स्वस्तिवादु पुण्याहवाचन ।
सर्वें देवोनियां सैन्य । सुबुद्धिप्रधानसमवेत ॥२०॥
दिधली अक्षयी भांडारें । सवत्स गाईंची खिल्लारें ।
नाना प्रकारचीं वस्त्रे । तीर्थीं रघुवीरे वांटावया ॥२१॥

तीर्थयात्रावर्णन :

सरें सरितां सिंधुसंगम । पुण्यभूमि पुण्याश्रम ।
केले प्रयागादि पंचग्राम । मार्ग दुर्गम हिमालया ॥२२॥
बदरीमार्गीं पंचप्रयाग । वेदप्रयाग शिवप्रयाग ।
कर्णप्रयाग ब्रह्मप्रयाग । अतिगुप्तप्रयाग पांचवा ॥२३॥
शरयू गंगा सुवर्णभद्रा तिन्ही । हे पूर्व प्रयोग त्रिवेणी ।
कार्तिक मासीं कृष्णा वेणी । मुख्य त्रिवेणी माघस्नान ॥२४॥
वने तपोवनें शैलशिखरे । परम पावन जे जे उखरें ।
तीर्थादि तिन्ही पुष्करें । तीर्थक्षेत्रें विधियुक्त ॥२५॥
नैमिषारण्य धर्मारण्य । चंपकारण्य ब्रह्मारण्य ।म
हापंथाचें वेदारण्य । ऋषी वेदज्ञ जेथे असती ॥२६॥
मंदरादि आणि विंध्याद्रि । मूळपीठींचा सह्याद्रि ।
गंगातीरींचा ब्रह्माद्रि । लोकोत्तरीं अति श्रेष्ठ ॥२७॥
प्राची सरस्वती बिंदुसर । धर्मालय कुरुक्षेत्र ।
ज्वाळामुखी ज्वाळा दुर्धर । अति पवित्र तीर्थोदकी ॥२९॥
केले तिन्ही गयेंचे दर्शन । धर्मस्तंभांचे स्पर्शन ।
ब्रह्मयोनीचें अवलोकन । गायत्रींचे ध्यान संध्यावटी ॥२९॥
ब्रह्मावर्त गोमतीतीर । हिरण्यासहित सागर ।
सागरावती शंखोद्वार । जेथे वेदोद्वार करी हरि ॥३०॥
सप्तपुरी तीर्थमार्गें । केली बाराही ज्योतिर्लिंगें ।
प्रभासेंसी सोमनाथयोगें । पंचकृष्णाप्रयोगें मूळमाधव ॥३१॥
द्वारकेचा कल्याणकृष्ण । दुजा शंखनारायण ।
तिजा पिंडारकी काळकृष्ण चौथा तो जाण गडदामोदर ॥३२॥
मूळचें निज मूळस्थान । मूळमाधव पांचा कृष्ण ।
हे तंव यात्रामंडळगमन । पुण्यपावन सर्वांसी ॥३३॥
गंडकी यमुना सुरसरी । तापी नर्मदा मत्स्योदरी ।
कृष्ण भीमा गोदावरी । दरितें दुरी ज्याचेनी ॥३४॥
मत्स्यतीर्थ पक्षीतीर्थ । शिवकांची विष्णुकांचीयुक्त ।
त्रिकोण हस्ति तीर्थभूत । तीर्थ विख्यात कुंभकोण ॥३५॥
प्रतीची कावेरी ताम्रपर्णीं । कृतमाला पयस्विनी ।
या पंचनद्यांच्या स्नानीं । भगवद्‌भजनी दृढभाव ॥३६॥
कन्याकुमारी जनार्दन । शेषशायीं अनंत शयन ।
उभय कावेरी श्रीरंगस्थान । परम पावन अगस्त्याश्रम ॥३७॥
दर्शने मुक्ति चिदंबरीं पाही । जन्ममुक्ती कमलालयीं ।
मरणमुक्ति काशीच्या ठायी । स्मरणे मुक्ति देई अरुणाचळ ॥३८॥

श्रीरामांचा लोकसंग्रह :

श्रीराम तीर्थां तीर्थभूत । मोक्षा मुक्ति श्रीरघुनाथ ।
तोही तीर्थयात्रा करित । लोकसंग्रहार्थ स्वलीला ॥३९॥
जे तीर्थीं जे विधान । जे तीर्थीं जे स्नान ।
तैसे करोनि दान सन्मान । सुखी जन श्रीरामे केले ॥४०॥
श्रीरामे सुखी केले महाऋषी । रामे सुखी केले संन्यासी ।
रामे सुखी केले तीर्थवासी । सुखी वनवसी श्रीरामे केले ॥४१॥
रामे सुखी केले त्यागी । रामे सुखी केले भोगी ।
रामे सुखी केले विरागी । सुख संभोगी श्रीराम ॥४२॥
रामे सुखी केले ब्रह्मचारी । रामे सुखी केले व्रतधारी ।
रामे सुखी केल्या नरनारी । राम सुखकारी सर्वांसी ॥४३॥
रामे सुखी केले तपी । रामे< सुखी केले जपी ।
रामे सुखी केले निर्विकल्पी । सुखरूप श्रीराम ॥४४॥
रामे सुखी केले दिगंबर । रामे सुखी केले वल्कलधर ।
रामे सुखी केले सदाचार । सुख साचार श्रीराम ॥४५॥
रामे सुखी केले अयाचित । रामे सुखी केले अति विरक्त ।
रामे सुखी केले धर्मासक्त । राम समस्ता सुखकारी ॥४६॥
रामे सुखी केले अकिंचन । रामे सुखी केले अति दीन ।
रामे सुखी केले अज्ञान । राम सकळसुजनसुखकारी ॥४७॥
रामे सुखी केले कापडी । रामे सुखी केली बापुडीं ।
रामे सुखी केली साबडीं । सुखाची कुळवाडी श्रीराम ॥४८॥
रामे सुखी केले सेवक । रामे सुखी केले केवळ रंक ।
रामे सुखी केले लोक । जे भावे सन्मुख भेटो आले ॥४९॥
रामे सुखी केले विवेकी । रामे सुखी केले एकाकी ।
रामे सुखी केले त्रैलोक्यी । यात्रानुलोकीं स्वलीला ॥५०॥
यात्रा विधियुक्तप्रकारें । स्वलीला रघुवीरे ।
नाना जना दानप्रकारें । चहू समुद्री सुखी केले ॥५१॥
द्वारका पश्चिम समुद्र । जगन्नाथ पूर्वसमुद्र ।
मानससरोवर उत्तर समुद्र । दक्षिणसमुद्र श्रीसेतुबंध ॥५२॥
यापरि समुद्र वलयांकित । तीर्थे करोनिया समस्त ।
अयोध्ये आला रघुनाथ । सुमुहूर्तें स्वानंदे ॥५३॥
नगर शृंगारिले नृपवरें । गुढिया तोरणे मखरे ।
गगन गर्जें जयजयकारे । आणिला गजरें रघुनाथ ॥५४॥
भाट गर्जती गहिरावचनीं । पुढे नाचती नाचणी ।
कीर्ति वर्णिजे बंदिजनीं । अयोध्याभुवनीं उल्लास ॥५५॥
पदोपदीं ओंवाळणी । पदोंपदी सुवासिनी ।
पदोंपदी अक्षयवाणी । मंत्रध्वनी स्वरयुक्त ॥५६॥
वसिष्ठासी घातले लोटांगण । दशरथा साष्टांग नमन ।
चौघांसी दिधले आलिंगन । परम समाधान रायासी ॥५७॥
अभिवंदिल्या तिघी माता । हर्ष दशरथाचे चित्ता ।
उत्संगी बैसविले रघुनाथा । सुख समस्ता अपार ॥५८॥
चौघा करविले मंगळस्नान । दिव्यांबरे परिधान ।
दिव्यालंकार चंदन । सुमनीं सुमन शृंगारिले ॥५९॥
वसिष्ठवचन प्रमाण । केले व्रतविसर्जन ।
द्विजां दिधले भोजन । दानसन्मानसमारंभें ॥६०॥
यापरी तीर्थाभिगमन । करूनि आला रघुनंदन ।
येथोनि वैराग्य पूर्ण । श्रीराम आपण विन्यासें दावी ॥६१॥
येथोनि कथा मनोहर । गुह्य ज्ञाने ज्ञानगंभीर ।
स्वये निरूपील रघुवीर । वैराग्यविचार मुमुक्षुहेतु ॥६२॥
मुमुक्षु तारावया संसार । दावी वैराग्य निजसार ।
धर्मलक्षणीं अवतार । सत्य साचार श्रीराम ॥६३॥
एका जनार्दनी एक । कवीश्वराचें अति रंक ।
त्या मूर्खाचेनि मुखे देख । कथा अलोलिक श्रीराम वदवी ॥६४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
श्रीरामतीर्थयात्रागमनं नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥
॥ ओंव्या ६४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग