॥ श्रीएकनाथमहाराजकृत
15.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय पंधरावा ॥
कुबेराचा पराभव
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
तदनंतर अवनिजापती । प्रीती सांगतसे अगस्ती।
म्हणे स्वामी ब्रह्मंडाच्या पंक्ती । उतरिसी रचिसी हेळामात्रें ॥१॥
तू ईश्वराचा ईश्वर । तू सुरवरांचा आदिइंद्र।
तूंचि नटनाट्यलीलावतार । दावितोसी विनोदें ॥२॥
तूंचि प्रकृति आणि पुरुष । तू ब्रह्मादिकांचा ईश ।
तू अवतार अयोध्याधीश । तू कथा आम्हांला पुसतोसी ॥३॥
आमच वाढवोनि मान ।आम्हंप्रती करितोसि प्रश्न ।
हेंचि आम्हं थोर भूशण । तू परब्रह्म वंदिसी॥४॥
आता अवधारी धरणिजारमणा । यक्षेसीं संग्राम करता रावणा ।
रक्षोगण आणिले रणांगणा। मग रावणा कय झालें॥५॥
द्वारपाळें तोरणावरी । झोडिलां रावणा पळे दूरी ।
तदनंतरे श्रीरामा अवधारी । कथेचिया निरुपणा ॥६॥
यक्षगण मोडिले रणी । शतसहस्त्र पाडिले मेदिनीं ।
धनाघक्षें देखोनि नयनीं। आपण संग्रामा निघाला॥७॥
तेथे मणिवरनामें यक्श्ःअ । प्रतापे अत्यंत दक्ष ।
सांगाते वीर सहस्त्र लक्ष । अतियोद्धे पराक्रमी ॥८॥
गदा मुद्गल शक्ति तोमर । शूळ मुसळ लहुडी चक्र ।
यक्ष करिते झाले मार । रणी राक्षस लक्षोनी ॥९॥
तेव्हा प्रहस्ते काय केले । रणी सहस्त्रातें मारिले ।
गदा घेवोनि निवटिले । महोदरें सहस्त्रातें ॥१०॥
श्रीरामा सावधान अवधारी । मारीच राक्षस दुराचारी ।
निमेष न भरता दोनी सहस्त्रवरी । रणी यक्ष पाडिले ॥११॥
धृम्राक्षेसीं मणिभद्र र्ण । करिते झले दोघे जण ।धू
म्राक्षें मुसळ तोलुन । मणिभद्र वक्षः स्थळीं हाणिला ॥१२॥
लागता मुसळाचा घावो । तेणे नुलंडेच महाबाहो ।
तदनंतरे मणिभद्रें गदा पहा हो । आवो साधोनि मारिली ॥१३॥
धुम्राक्षाच्या मस्तकावरी । गदा बैसली जैसी वीज शिखरी ।
अचेतन धरणीवरी । पडला रक्त वाहतसे ॥१४॥
धुम्राक्ष रणी पडिला । देखोनि रावण क्रोधा चढला ।
रणमेदिनीस धांवत झाला । युगांतींचा अग्नि जैसा ॥१५॥
रणी मारिता झाला शक्तिकरूनी । मणिभद्र यक्षालागोनी ।
झळफळित गदा यक्षें घेवोनी । राक्षसेंद्रा हाणितली ॥१६॥
यक्षगदेच्या घाई । रावणमुकुट पडिला भुईं ।
सवेंचि यक्ष पाठीसी पाही । रावणाच्या राहिला ॥१७॥
रावण गदाघातेंकरी । मुकुट पडलियाचे भय न धरी ।
मणिभद्र यक्ष पाठीसी निर्धारी । उभा तिष्ठत राहिला ॥१८॥
राक्षसी सिंहनाद केला। श्रीरामा पर्वत दुमदुमिला।
दुरोनि धनाधिपें देखिला । मणिभद्राचा पराक्रम ॥१९॥
मणिभद्र महाशूर । योद्ध्यांमाजी परम वीर ।
कुबेरें देखोनि सत्वर । काय बोलता पै झाला ॥२०॥
म्हणे ब्राह्मणच्या शापोक्ती । रावणाची यशःकीर्ती ।
आणि ऐश्वर्यसंपत्ती । भस्म झालीं द्विजशापें ॥२१॥
रावणाची निंदा :
कुबेर दीर्घवचनें बोले । रावणे कुळा लांछन लाविले ।
देवा द्विजां दुःख दिधले । ते भोगी रे निजकर्म ॥२२॥
दुष्टा नष्टा चांडाळा । तुवं भक्षिले ॠषिकुळा ।
देवांते त्रास दिधला । ते भोगी रे निजकर्म ॥२३॥
निरपराधें वनांतरीं । तुवा द्विज भक्षिले यष्टिवरी ।
तया पापाची सामग्री । तू अधोरीं पडसील ॥२४॥
उपजोनियां ब्रह्मवंशीं । लाज लाविली कुळासी ।
तुजसारिखा पापिष्ठ सृष्ठींसी । म्या नाही रे देखिला ॥२५॥
तू झालासी नरकाचा पाहुणा । तुजविण नरक नाही दुणा ।
नरका जावे न लगे रावणा। नरकप्राय तूंचि तू ॥२६॥जे
आवडीनें विष प्याला । तो परिपाकीं जण निमाला ।तै
सें रावणा झाले तुजला । ब्रह्मणाचे शापेंकरीं ॥२७॥
मूढ आरूढोनि वृक्षावरी ।बैसला ते फांदी कुठारेंकरी ।
तोडितां पडे भूमीवरी । तैसे रावणातुज झलें ॥२८॥
बाजगिराचें वानर जैसे । तो नचवी नाचे नाचे तैसे ।
तुझे प्रधान अजाण तैसे त्यांचेनि वचनें वर्तसी ॥२९॥
जो स्वधर्माचा त्याग करी । पापियाचे व्रत अंगीकारी ।
तयासी यमराज आपुले स्वपुरी । यमपाशीं बांधोनि ने ॥३०॥
ज्येष्ठांतें न वंदिती । हेळान करोनि निर्भत्सिती ।
ते नर वंचिती परोपकार । यमाधीन पै होती ॥३२॥
नाशवंत हा संसार । जाणोनि न करी भजनसार ।
मूढबुद्धि हा पामर । नरक घोर तो भोगी ॥३३॥
रावणने संतपून पुन्हा युद्धास सुरुवात केली :
ऐकोनि वैश्रवणाचें वचन । कोपे आरक्त पूर्ण नयन ।
कुबेराप्रति दशानन ।संग्रामासी मिसळला ॥३४॥
प्रधान विमुख झाले होते । तेही घेतले सांगाते ।
भग्न झाला रावणपुनरपि तेथे संग्रामाते करिता झाला ॥३५॥
मणिभद्रें भग्न केला । माथींचा मुकुट पाडिला ।
तो रावण नाही श्रांतला । नाही श्रमला संग्रामी ॥३६॥
श्रीराम म्हणे जी अगस्ती । संग्राम करिता मणिभद्राप्रती ।
शिरींचा मुकुट पाडिला क्षिती । श्रम का चित्ती नाही झाला ॥३७॥
अगस्ति म्हणे श्रीरामा । यासि वर देता ब्रह्मा ।
वरबळें पुरूषोत्तमा । यक्ष गंधर्व न गणीच ॥३८॥
हा रावण पुढतीं । युद्ध करी बंधुप्रती ।
ते अवधारी धरणिजापती । आश्चर्य थोर होईल ॥३९॥
येरीकडे कुबेर जाण । अग्न्यस्त्र सोडिले दारूण ।
राक्षस झाले कंपायमान । अग्नि जाळितो उरी शिरी ॥४०॥
जैसा पळयींचा अग्नी । पसरे त्रैलोक्य व्यापूनी ।
तैसी कुबेरास्त्रापासूनीं । अग्निमयी रणभूमी ॥४१॥
रावणे वरूणास्त्र घातले । क्षणामाजी अग्नीतें शांत केले ।
पृथ्वी परिपूर्ण झाली जळे । सरोवर नद्या भरियेल्या ॥४२॥
रावणे राक्षसी माव केली । अदृश्य झाला तये काळी ।
मागून बंधुचे हृदयकमळीं । येवोनि गदा हाणितली ॥४३॥
दशग्रीव कपटी क्रूर । दुरात्मा महा मावकार ।
समरांगणीं सत्वर । अदृश्य झाला ते काळी ॥४४॥
अदृश्य येवोनि तये काळी । धनेशाचे हृदयकमळीं ।
गदा हाणितली तेणे भूमंडळी । पाडिला जैसा पर्वत ॥४५॥
वसंती पलाश आरक्त । पुष्पी फळी वन शोभत ।
तैसा कुबेर रूधिरांकित । रणमेदिनी उलंडला ॥४६॥
अशोक वृक्ष मूळेंसी । उलंडोनि पडे भूमीसी ।
तैसा कुबेर रणभूमीसी । पडला तरू पै जैसा ॥४७॥
तदनंतरे प्रधान मिळोन । नंदनवनास कुबेर नेऊन ।
परस्परीं विचारून । उपचार करिते झाले ते काळी ॥४८॥
आरोग्य व्हावया शरीरी । जैसा धन्वंतरी उपचार करी ।
तैसे प्रधानीं थोरथोरी । उपचार कुबेरीं मांडिले ॥४९॥
कुबेराचा पराभव करून रावणाने पुष्पक विमान नेले :
येरिकडे श्रीरामा । रावण तो पापकर्मा ।
मग प्रवर्तला अधर्मा । पुष्पक विमाना हरिता झाला ॥५०॥
पुष्पक विमानाची स्थिती । ऐक योगियांच्या ध्येयमूर्ती ।
चिंतिल्या स्थळासी शीघ्रगती । मनोवेगेंकरोनि जाय ॥५१॥
मनोवेगाते सांडोनि मागे । विमान जाय अति वेगे ।
म्हणोनि कामग ऐसे निजांगे । ज्ञातें पंडीत बोलती ॥५२॥
तया विमानावरी । आरूढोनि श्रीरामा तुझा वैरी ।
आनंदें गर्जत ते अवसरी । कैलासाप्रती चालिला ॥५३॥
कुबेराते जिंतोनि राक्षस । येता झाला कैलासास ।
पुढील कथा अति सुरस । सावध श्रोती परिसिजे ॥५४॥
वाल्मीकाच्या ग्रंथाधारें । संताचेनि कृपाभरें ।
कथा चालिली पुढारे । गोड निरूपण पै आहे ॥५५॥
एका विनवी संतजनां । तुमच्या प्रसादाचा पान्हा ।
तेणे वदलों बोबड्या वचना । बाळपणा लक्षोनि ॥५६॥
एका जनार्दना शरण । पुढे रम्य सुरस गहन ।
कथा ऐका रामायण । दत्तचित्त होवोनी ॥५७॥
स्वस्ति श्रीभावार्थ - रामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां
वैश्रवणभंगो नाम पंचदशोऽध्यायः ॥१५॥ ओंव्या ॥५८॥
