॥ श्रीएकनाथमहाराजकृत
14.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय चवदावा ॥
अहल्योद्धार
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
एवमुक्ते तयोर्वाक्य सर्व एव महर्षय: ।
विश्वामित्रं पुरस्कृत्य राघवं वाक्यमब्रुवन् ॥१॥
मैथिलस्य नरश्रेष्ठ जनकस्य भविष्यति ।
यज्ञः परमधर्मिष्ठो यास्यामस्तत्र वै वयम् ॥२॥
त्वं चापि नरशार्दूल सहास्माभिर्गामिष्यासि ।
अद्भुतं च धनूरत्नं तत्र त्वं द्रष्टुमर्हसि ॥३॥
जनकराजाकडून स्वयंवराचे आमंत्रण :
ऋषिसभे प्रसन्नोन्मुख । बैसले वर्णिती रघुकुळ टिळक ।
तंव जनकाचे दोघे सेवक । पत्र कुंकुमांकित घेवोनि आले ॥१॥
विश्वामित्रें निजगायार्थ । ऋषी मेळविले समस्त ।
स्वामीनें त्यांसमवेत । यावे यथार्थ स्वयंवरा ॥२॥
तंव रामलक्ष्मणांलागुनी । कौशिक बोलावी सन्मानोनी ।
दोघीं साष्टांग नमूनी । कर जोडोनी बोलत ॥३॥
आम्ही तुझे नित्यांकित । निजसेवक निश्चित ।
सिद्धी पावला यज्ञार्थ्स् । पुढील कार्यार्थ सांगावा ॥४॥
स्वामी जे तू आज्ञा देसी । ते कार्य करू क्षणार्धेंसी ।
गुरुकृपेची महिमा ऐसी । सर्व कार्यासी निजसिद्धी ॥५॥
बाळपणी धीर शूर । मारिले उद्भट निशाचर ।
परी गर्व न धरी रघुवीर । तेणे विश्वामित्र सुखी झाला ॥६॥
वीरधैर्येंसी ज्ञान प्रांजळे । ऐसा निगर्वीं शिष्य मिळे ।
तेणे गुरुसी सुखसोहळे । त्या सुखासी कांटाळें असेचिना ॥७॥
विश्वामित्रांची श्रीरामांना मिथिलेला येण्याविषयी विनंती :
ऐसा सुखावोनि विश्वामित्र । आलिंगिले श्रीरामसौमित्र ।
सांगे जनकाचे आले मूळपत्र । जाणे सत्वर मिथिलेसी ॥८॥
जनक मिथिलेचा नृपवर । धनुर्याग सीतास्वयंवर ।
तेथे मिनले सुरनर । तेणे ऋषीश्वर बोलाविले ॥९॥
देशोदेशींच्या भूपाळां । मूळ पाठविले सकळा ।
दशरथासी धाडिले मूळा । तो नयेचि विव्हळा श्रीरामविरहें ॥१०॥
आम्ही ऋषिवर्य समस्त । अवश्य जाऊ गा तेथ ।
तुम्हींही यावे आम्हांसमवेत । आज्ञा समर्थ म्हणे श्रीराम ॥११॥
श्रीरामांची अनुमती :
गुरुआज्ञापरिपाळण । हे सकळ भाग्या निजभूषण ।
सकळ कल्याणाचे कल्याण । गुरुवचन शिष्यासी ॥१२॥
तुझेनि शिष्यत्वें माझी थोरी । तुवा अवश्य यावे तेथवरी ।
सकळ राजे सभेमाझारीं । तू मुख्य मुखरण होसील ॥१३॥
सर्वांचे मिथिलेला प्रयाण :
ऐसे ऐकोनि गुरुवचन । सद्गुरुसमवेत आपण ।
रथारुढ रामलक्ष्मण । मिथिलेसी प्रयाण महोत्साहें ॥१४॥
रथारूढ रामचंद्र । अवघे करिती जयजयकार ।
ऋषीसमवेत रघुवीर । अति सत्वर निघाला ॥१५॥
मिथिलें आरते पंचयोजनीं । मुनि राहिले कुशोपवनीं ।
बैसल्या ऋषींचिया श्रेणी । राम सुखासनीं उपविष्ट ॥१६॥
मार्गातून जाताना एक ओसाड आश्रम लागतो :
तेचि उपवनीं अके कोनी । श्रीराम आश्रम देखे नयनी ।
वृक्ष खांकरले फळी पानी । आश्रमी कोणी असेना ॥१७॥
ऐसे देखोनि रघुनाथ । पुसे ऋषींस वृत्तांत ।
म्हणे हे का दिसे वन उपहत । हा वृत्तांत सांगा मज ॥१८॥
येथे वस्ती नाही मनुष्यासी । पक्षी वाळीले वृक्षांसी ।
आश्रमी अहल्येसीं । आश्रमवासी गौतम ॥२०॥
इंद्रें छळिले अहल्येसी । गौतमें शापिलें दोहींसी ।
तैंपासोनिया आश्रमासी । वस्ती कोणासी असेना ॥२१॥
अहल्येविषयी श्रीरामाची जिज्ञासा :
राम पुसे अहल्या ती कोण । इंद्रें छळावया काय कारण ।
हे समूळ मूळींचे कथन । कृपा करून सांगावे ॥२२॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । विश्वामित्र म्हणे आपण ।
अहल्येंचें उद्धरण । प्रसंगे पूर्ण ओढवले ॥२३॥
तिचे सौंदर्यवर्णन -
त्रैलोक्याचें बरवेपण । ब्रह्मयाने एकवटीने आपण ।
स्वये कन्या केली निर्माण । अहल्या जाण तीस नांव ॥२४॥
शरीर अत्यंत सुकुमार । खुपों शकती चंद्रकर ।
पन्नगपद्मिणी तीपुढें निबर । निजांगे अरुवार नभापरिस ॥२५॥
तिचे होतांचि स्पर्शन । मनाआदि इंद्रियां गुदगुल्या पूर्ण ।
फिकें अमृताचें गोडपण । तिचे बरवेपण देखोनि ॥२६॥
देखोनि तिचिया मुखासी । अत्यंत सुख डोळ्यांसी ।
ते मुखी जाले क्षेत्रसंन्यासी । आन पहावयासी नावडे ॥२७॥
अत्यंत सौंदर्याची शोभा । चंद्र लोपे अंगप्रभा ।
देखोनि लावण्याचा गाभा । विवेकाचा उभा प्राण जाय ॥२८॥
तिसी होता डोळेभेटी । धैर्याची विरे गांठी ।
बरवेपणें अत्यंत लाठी । देखिल्या दृष्टी उपडेना ॥२९॥
ऐसी अत्यंत सुंदर । दिवसेंदिवस जाली थोर ।
कन्या देखोनि उपवर । वरविचार ब्रह्मयासी ॥३०॥
अहल्येसाठी इंद्रिदिकांची स्पर्धा :
इंद्र साक्षेपी करावया राणी । चंद्र साक्षेपी करावया पत्नी ।
सूर्य स्वये तिच्या वरणी । अनुदिनी उपाजी ॥३१॥
वरुण वायु यम कुबेर । स्कंदादि सकळ सुरवर ।
अहल्यावरणी अति सादर । पडला विचार ब्रह्मयासी ॥३२॥
विधाता करी विचार । अहल्यावरणीं सर्व सादर ।
मा कोणाचा करू निर्धार । प्रकारांतर उपपादी ॥३३॥
ब्रह्मदेवाचा पण :
ब्रह्मयाने योजिले विंदान । दो प्रहरीं पृथ्वीप्रदक्षिण ।
जो करून येईल आपण । त्यासी कन्यादान अहल्या ॥३४॥
ऐकोनि ब्रह्मयाचे वचन । इंद्र ऐरावतीसी करी गमन ।
चंद्र मृगेसी निघे आपण । मेषारोहणें निघे अग्नि ॥३५॥
यम नियंता सकळ जगा । तोही कामाच्या लगबगां ।
पालाणूनिया टोणगा । लागवेगां निघाला ॥३६॥
स्कंदे पालाणिला मयूर । कामे पालाणिला मकर ।
एवं अवधेचि सुरवर । निघाले सत्वर प्रदक्षिणे ॥३७॥
ऋषीश्वर धाकटे मोठे । धांवती मेरुतळवटें ।
आम्ही आपुलिये तपोनिष्ठे । करू निजनेटें प्रदक्षिणा ॥३८॥
गौतमांनी प्रसूतीसमयी गाईला प्रदक्षिना करून पण जिंकला :
गौतम करिंतां अनुष्ठान । गोप्रसूतिकाळ जाण ।
उभयतोमुखी देखोनि पूर्ण । त्रिवार प्रदक्षिणा तेणे केली ॥३९॥
उभयतोमुखीप्रदक्षिण । पृथ्वीप्रदक्षिणेंसमान ।
हे ब्रह्मयाने जाणोनि ज्ञान । करी कन्यादान गौतमासी ॥४०॥
त्यामुळे इंद्र कपटाचरणास प्रवृत्त :
इंद्र आला प्रथमप्रहरा । तंव अहल्येसी गौतम नोवरा ।
बोहलीं देखोनि वधूवरा । अभ्यंतरी संतप्त ॥४१॥
जे जे प्रदक्षिणा करूनि येती । ते तेही श्वास टाकिती ।
गौतमासी अहल्याप्राप्ती । कैशा रीती जाली पा ॥४२॥
इंद्र पुसे ब्र्हमयासी । अहल्या देणे होती गौतमासी ।
तरी का छळिले आम्हांसी । प्रदक्षिणेसी धाडुनी ॥४३॥
ब्रह्मा बोलिला आपण । त्रिवार पृथ्वीप्रदक्षिण ।
गौतमासी घडली संपूर्ण । मग कन्यादान मी केले ॥४४॥
इंद्र म्हणे आम्हांहूनि गौतमासी । अधिक शक्ति चालावयासी ।
त्रिवार प्रदक्षिणा यासी । घडली कैसी नेणवे ॥४५॥
ब्रह्मा म्हणे न करी छळण । उभयतोमुखींचे प्रदक्षिण ।
पृथ्वीप्रदक्षिणेसमान । हे जाणोनि कन्यादान म्या केले ॥४६॥
वचन पाहिले वेदोल्तीं । परि अति संताप वाढला चित्ती ।
म्हणे मी नाना छळणोक्ती । अहल्या ऐपती स्वये करीन ॥४७॥
चंद्र भोगिले गुरुपत्नीसी । तेवीं मी भोगीन अहल्येसी ।
यापरी इंद्रे निजमानसी । निश्चयासीं दृढ धरिले ॥४८॥
इंद्रापासून सावध राहण्याची सूचना :
ब्रह्मा सांगे गौतमासी । इंद्र अभिलाषी अहल्येसी ।
तरी तुम्ही अहर्निशी । अति यत्नेंसी राखावी ॥४९॥
गौतम तपे तेजोराशी । अहल्या आणिली आश्रमासी ।
इंद्र कष्टतां वर्षानुवर्षीं । अहल्या त्यासी अप्राप्त ॥५०॥
पूर्ण खग्रास सूर्यग्रहण । अहल्येसहित गंगास्नान ।
करावया जाय गौतम आपण । अति सावधान इंद्रार्थीं ॥५१॥
जाले ग्रहण विधिविधान । अहल्या करोनि मुक्तिस्नान ।
आश्रमासी आली आपण । द्विजभोजनपाकार्थ ॥५२॥
गौतम स्वधर्मे संपन्न । करावया राहिला दानतर्पण ।
तेचि संधि साधोनि पूर्ण । इंद्र आपण संचरला ॥५३॥
गौतमरूपाने इंद्राचे अहल्येकडे आगमन :
गौतमाच्या स्वरूपस्थिती । इंद्र आला अहल्येप्रती ।
तिसी नेवोनि एकांती । सवेग रति स्वये मागे ॥५४॥
ते म्हण नवलगती । दिवसा केवी मागा रती ।
आजि पर्वकाळ पितृतिथी । काम सर्वार्थी निशिद्ध ॥५५॥
भलतसें पतीचें वचन । पाळिती पतिव्रता पूर्ण ।
पतिवचनालागीं दूषण । अधःपतन ते स्त्रियेसी ॥५६॥
पतिचिया वचनार्था । अनुचरावे सर्वथा ।
हे मर्यादा वेदशास्त्रार्था । दोष सर्वथा देखो नये ॥५७॥
पतिवाक्या दोषदर्शन । देखे तिसी आकल्प अधःपतन ।
आता तू जाहलीस सज्ञान । पतिवचन न मानिसी ॥५८॥
जे जे माझे विरुद्धाचरण । ते ते आपुलेनि तपें मी आपण ।
तत्काळ करीन निर्दळण । येथे तुज कोण संदेह ॥५९॥
संकोचली स्वधर्मता । कांही न बोलवे सर्वथा ।
मग जावोनिया एकांता । त्यासी रत्यर्थ अनुसरली ॥६०॥
इंद्र अहल्या सेजेवरी । तंव गौतम आला बाहेरी ।
परपुरुषा रतली नारी । जाणोनी द्वारी गुप्त राहे ॥६१॥
कपटाचरण लक्षात आणल्यामुळे अहल्येचा संताप :
अहल्या म्हणे एकांतवासीं । घेवोनि भ्रताररूपासी ।
तू कोण येथे आलासी । कपटें भोगिसी परदारा ॥६२॥
अहल्यें इंद्र धरिला हाती घेवोनि भ्रताररूपाची बुंथी ।
तू कोण पापमूर्तीं । छळोनि रती मागितली ॥६३॥
तो म्हणे मी अमरपती । येरी म्हणे पूर्ण झाली रती ।
आता तू जाई शीघ्रगती । दोघांची उपहती ऋषी करील ॥६४॥
मर मर पापिष्ठ चांडाळा । नाही पापाचा कंटाळा ।
विटाळविलें दोही कुळां । दुष्टा दुःशीळा नीघ वेगी ॥६५॥
जळो तुझे महिमान । निंद्य कर्म काळे वदन ।
येथोनि शीघ्र करी गमन । देखिल्या दहन ऋषि करील ॥६६॥
तो तू देवाचा देवाधिपती । तो तू परदारकामासक्तीं ।
अचुक गेलासी अधोगती । नीघ मागुती मुख न दाखवीं ॥६७॥
गौतमाकडून अहल्या व इंद्रास शाप :
लाजा इंद्र निघे बाहेरी । तंव गौतम देखिला द्वारी ।
भयें कांपोनि जिव्हारी । इंद्रगोपाकारीं पळोनि गेला ॥६८॥
तंव गौतमे खुंटविली गती । जावों न शके निजशक्तीं ।
अद्यापि इंद्रगोपांप्रती । शीघ्रगती असेना ॥६९॥
जेणे करिसी परदाररमण । ते झडती तुझे वृषण ।
परभगीं आसक्त मन । भगें सर्वांगी संपूर्ण होती ॥७०॥
इंद्र शापिला यापरी । इंद्र पाहे भीतरी ।
तंव अहल्या वस्त्रे सांवरी । म्हणे दुराचारी रमलीस केवी ॥७१॥
क्षणो नास्ति रहो नास्ति नास्ति प्रार्थयिता नरः ।
तेन नारद नारीणां पातिव्रत्य हि जायते ॥४॥
अहल्येची प्रार्थना :
स्मृतिवेदान्तवेदोक्ती । धीर धरूण् न शके सती ।
परपुरुषें प्रार्थिल्या एकांती । पतिरूपोक्ती छळिले मज ॥७२॥
तुमचिया स्वरूपस्थिती । तेणे म्मज मागितली रती ।
मी रमलें तुम्हांप्रती । कपट निश्चिती मी नेणे ॥७३॥
तुमचिया वचनार्था । ना न म्हणवे तत्वता ।
याच्या कपटाची वार्ता । मी सर्वथा जाणेंना ॥७४॥
स्वामींच्या वचना उल्लंघन । तेंचि मज अधःपतन ।
येणे भये मी आपण । स्वधर्माचरण विचरलें ॥७५॥
इंद्रअहल्याएकांतवार्ता । गौतमे ऐकिल्या निजगुप्ता ।
तेंचि सांगतसे तत्वता । तू निजकामार्था रमलीसी ॥७६॥
शापवाणी :
संभोगीं परपुरुष जाणता । जरी तू उठलीस हाणोनि लाथा ।
तरी मी मानितों पतिव्रता । तू पूर्णकामता रमलीसी ॥७७॥
ओळखोनि परपुरुषता । तू बोललीसी भोग भोगितां ।
तुझी जाली पूर्णकामता । ऋषि न येता तू जाय ॥७८॥
जाणोनि परपुरुषाचें ज्ञान । भोगी कंटाळेना तुझे मन ।
ते तू होसी पाषाण । शिळा जाण जडत्वे ॥७९॥
परपुरुषीं कामाचा मोहळा । ते तू होसी महाशिळा ।
तुज कोणी न देखे डोळा । भूते विटाळा मानिती तुझ्या ॥८०॥
वृक्ष फुलां फळा न येती । छायेसी नव्हे विश्व्रांती ।
आश्रमी प्राणी न वसती । पापोपहती भोगिसी ॥८१॥
येरी बोलली आपण । पतिभ्रमें लागले दूषण ।
स्वामीनें कृपा करावी । पूर्ण शापमोचन वदावें ॥८२॥
गौतमाकडून उःशाप :
ऐकोनि तिचे दीन वचन । कृपेने कळवळला संपूर्ण ।
म्हणे लागल्या श्रीरामचरण । तै तू जाण उद्धरसी ॥८२॥
तुज जंव भेटती रामचरण । तंववरी करावे रामस्मरण ।
रामनामापरते आन । प्रायश्चित जाण असेना ॥८४॥
रामनामाच्या आवृत्तीं । जळती पापांचिया पंक्ती ।
शिळारूपें तुझी लोपेल मती । तरी राम चित्ती न विसंबे ॥८५॥
ऋषि पाठिमोरा जाला तंव अहल्या जाली शिळा ।
आश्रम पावला अवकळा । प्राणी तत्काळ पळाले ॥८६॥
कैसे शापाचें अति बळ । मुंगी माशी सांडी स्थळ ।
पक्षी पळाले सकळ । श्वापदांचे मेळे सवेग गेले ॥८७॥
शाप दिल्याबद्दल गौतमांना पश्चात्ताप :
शाप देवोनि कोपदृष्टीं । गौतमे सांडिली पर्णकुटी ।
सवेंचि अनुताप जाला पोटी । म्हणे क्रोधे उठाउठी जिंकिले मज ॥८८॥
अहल्या इंद्रा अतिप्रीतीं । सुखभोग भोगितां एकांती ।
तेव्हा का मज नुपजे शांती । स्त्रीकामासक्तीं नाडिलो क्रोधे ॥८९॥
रतिभोगएकांतवासी । इंद्र असता अहल्येपासीं ।
अनुद्वेगें त्यागोनि त्यांसी । मी का तपासी न वचेंचि ॥९०॥
सर्वांतरात्मा भोक्ता एक । ऐसा जाणता तो मी देख ।
त्या मज इंद्रभोगाचें दुःख । ज्ञानेसीं विवेक गिळिला क्रोधे ॥९१॥
माझी स्त्री माझे घर । हे कामक्रोधांचें निजमंदिर ।
येथे ठकले थोर थोर । मजही साचार नाडिले क्रोधे ॥९२॥
माझी स्त्री हा जो अभिमान । हे सकळ दुःखाचे भाजन ।
हेंचि क्रोधाचें जन्मस्थान । तेणे मी संपूर्ण नाडलों ॥९३॥
गौतम पावन त्रिजगती । ऐसी पुराणीं प्रसिद्ध वदम्ती ।
तो मी स्त्रीलोभानुवृत्तीं । विवेकसंपत्ती नाडिलो क्रोधं ॥९४॥
म्या गौतमें माध्यान्हकाळीं । नित्य पिकवोनियां साळी ।
ऋषी वांचविले दुष्काळीं । तो मी तात्काळां नाडिलो क्रोधे ॥९५॥
मुख्यत्वे स्त्री-कामापासीं । क्रोध सर्वदा मुसमुसी ।
तेणे नाडिले मज गौतमासी । म्या कोणापासी सांगावे ॥९६॥
कामक्रोधाचा प्रभाव :
मातेवरी गालिप्रदान । भलता साहे करोनि हेळण ।
स्त्रीवरोनि शिवी देता जाण । तत्काळ मरण शस्त्रे का शापे ॥९७॥
वाप क्रोधाची निजख्याती । त्या दोघांची केली उपहती ।
मज नाडिले ज्ञानविरक्तीं । क्रोध परमार्थी घातक ॥९८॥
क्रोध केवळ महामांग । जिवें मारिले वैराग्य ।
सकळ योगा होय भंग । क्रोधे सर्वांग अति पवित्र ॥९९॥
मातगविटाळा जळे निवृत्ती । क्रोधाची चित्तामाजी वस्ती ।
त्याचे क्षाळणीं न चले युक्ती । क्रोध सर्वार्थें घातक ॥१००॥
का ते कांता कस्ते पुत्रः । ऐसे म्या वाचिलें शास्त्रा ।
ते वृथा गेले पुराणपत्रा । क्रोधे अपवित्र मज केले ॥१॥
कामासी जे वश होती । ते कांही तरी भोगभोगिती ।
जे आतुडले क्रोधाहातीं । ते वृथा नागवती भोगमोक्शां ॥२॥
क्रोधाऐसा वैरी । बैसला असता जिव्हारीं ।
जो तयाची मानी थोरी । तोचि चराचरी अतिमूर्ख ॥३॥
अपकारिणी कोपश्चेत् कोपे कोपः कथं न ते ।
धर्मार्थकाममोक्षाणां प्रसह्य परिपंथिनि ॥५॥
अपकारियावरी कोप करिती । परी कोपावरी कोप न करिती ।
क्रोध वाटपाडा निश्चतीं । चहू पुरुषार्थ नागवी ॥४॥
त्या क्रोधाची होय शांती । तैसे आचरेन तपस्थितें ।
ऐसा निश्चय करोनि चित्ती । ऋषि त्पार्थी निघाला ॥५॥
एवमुक्त्वा महातेजा गौतमो ऋषिसत्तमः ।
पुण्यदेशं समासाद्य सिद्धचारणसेवितम् ॥६॥
सिद्धचारणलोकावरी । मेरुगिरीच्या पाथारीं ।
हिमाचळाच्या शिखरीं तपातें आदरी गौतम ॥६॥
गौतम बैसोनि निर्विकारी । अगाध निष्ठतें आदरी ।
कामक्रोधांचा नुरे उरी । त्या तपाची थोरी थोरावे ॥७॥
शापामुळे इंद्राची अवस्था :
ब्रह्मशाप अति दारुण । इंद्राचे झडले वृषण ।
भगें बिंबली संपूर्ण । तेंही लक्षण अवधारा ॥८॥
परदारनिरीक्षण । भगांकित जाले नयन ।
परदारमुखचुंबन । भगांकित वदन तेणे झाले ॥९॥
परदारा आलिंगन । हृदयी भगें पडली जाण ।
बाहु भगांकित जाले जाण । अंगुल्या संपूर्ण भगांकित ॥११०॥
परदारप्रतिगमन । भगांकित जाले चरण ।
खालें तळवांही जाण । भगें संपूर्ण बिंबली ॥१२॥
परदारेंसी कामगोष्टी । भगांकित जाला दोही होटीं ।
भगें पडली लल्लाटीं । भगीं पाठी पुरविली ॥१३॥
ईंड्र पावला उपहती । सर्वांगें भगें स्रवती ।
निजकर्माची मानोनि खंती । अधोगती विलपत ॥१४॥
इंद्र सर्वांगी भगांकित । तो पक्षियांमाजी राहिला गुप्त ।
पाहता देव ऋषी समस्त । ते अभिव्यक्त लक्षेना ॥१५॥
शापाचे परिणाम :
इंद्रे सांडिले अमरमंडळ । मेघ झाले उच्छृंखळ ।
पृथ्वी झाली मंदफळ । स्वधर्म सकळ खुंटले ॥१६॥
यालागी साक्षेपे इंद्रासी । शोधिते जाले देव ऋषी ।
बृहस्पति सांगे तयांपासी । गौतमासी उःशाप मागा ॥१७॥
मग मिळोनि देवऋषी । अवघे आले गौतमापासीं ।
उद्धरण करावया इंद्रासी । समस्तीं त्यासी प्रार्थिलें ॥१८॥
गौतमें अनुतापे जाअण । केले क्रोधाचें निर्दळण ।
देव प्रार्थितांचि जाण । कृपेनें संपूर्ण कळवळिला ॥१९॥
इंद्र पावला उपहती । त्याची पुरविल्यापरिस महंती ।
अतिशये करीन वाढती । स्वये वरदोक्ति वदता झाला ॥१२०॥
इंद्र होता मयूरवेषें । उःशाप होतांचि डोळसें ।
सर्वांगी उभारोनि पिसे । अति उल्लासें नाचत ॥२१॥
इंद्र होता भगांकित पूर्ण । ती भगें होतील लोचन ।
तैंपासोनि सहस्रनयन । इंद्र अभिधान पावला ॥२२॥
इंद्राकडून गौतमस्तुती, इंद्राला उःशापप्राप्ती :
इंद्र म्हणे जय जयजी गौतमा । पुरुषांमाजी उत्तमोत्तमा ।
न कळे तुझा महिमा । अगाध महिमा पै तुझा ॥२३॥
त्वा शाप नाही दिधला । माझा कर्मभोग म्या भोगिला ।
जो दुराचारी तो सरता केला । हे महद् लीला पै तुझी ॥२४॥
ऐसी इंद्रे केली स्तुती । तेथे देवहि गौतमातें स्तविती ।
अलोलिक तुझी ख्याती । अपराधी निश्चित त्वा उद्धरिली ॥२५॥
इंद्रपणाची ते खूण । मयूरीं आभासे पूर्ण ।
तै त्यासी नव्हते वृषण । मयूरासी स्त्रीरमण असेना ॥२६॥
मयूर आनंदे नृत्य करी । वीर्य स्रवे नेत्रद्वारी ।
ते झेलोनि ने मयूरी । तेणेंचि उदरी गर्भ तिसी ॥२७॥
पूर्ण महत्त्व आले इंद्रासी । परी ठाव नाही पुरुषत्वासी ।
तेव्हा गजाचे वृषण देवोनि त्यासी । पुरुषत्वासी पूर्ण केले ॥२८॥
गजदेही नाही वृषण । तेणे तो जाला वीर्यक्षीण ।
त्यासी दिधले इंद्रें वृषण । तेणे मस्तकी संपूर्ण वंदिलें ॥२९॥
इंद्रशापामुळे मोर आणि हत्तीवर परिणाम :
यालागी गजाचे देही । अद्यापि लिंगीं वृषण नाही ।
ते भासती मस्तकाचे ठायी । कुंभेभ पाही यालागी म्हणती ॥१३०॥
रतिकाळी आपण । लिंगापासीं येती वृषण ।
येर्हळवीं ते मस्तकी जाण । कुंभेभ पूर्ण यापरी भासे ॥३१॥
गजाचिया वृषणस्थितीं । इंद्रासी जाली ऐश्वर्यप्राप्ती ।
यालागी त्यासी ऐरावती । देवींसमस्तीं ठेविले नांव ॥३२॥
इंद्रापासी गजाचे वृषण । तेणे त्यासी बळ संपूर्ण ।
गजापासी इंद्रवृषण । शक्रसमान गळ त्यासी ॥३३॥
गजास बळ शक्रासमान । शक्रें वाढविलें गजमहिमान ।
गजदळें दळ शोभायमान । येरवी ते जाण रुंडमुंड ॥३४॥
गजेंद्रासी राज्यप्राप्ती । यालागी गजांतलक्ष्मी म्हणती ।
समस्त प्रजा नमस्कारिती । ते पूर्णस्थिती लक्ष्मीची ॥३५॥
एवं ऋषिवाक्यकृपास्थितीं । इंद्र पावला उपहती ।
त्यासी वाहून ऐरावतीं । नेला स्वर्गाप्रती जयजयाकारें ॥३६॥
इंद्रअरहल्याआखान । ऋषीने सांगितले संपूर्ण ।
अहल्येचे पाषाणपण । करी उद्धरण श्रीरामा ॥३७॥
अहेल्येचा उद्धार :
ऐकोनि सद्गुरूचें वचन । वेगी उठला रघुनण्दन ।
करावया अहल्योद्धरण । आश्रमी आपण प्रवेशला ॥३८॥
हाती धरोनि ऋषिवर्यासी । आश्रमी पाहे अहल्येसी ।
ते लक्षेना सकळा ऋषींसी । पाहता चौंपासीं दिसेना ॥३९॥
आश्रमी करिता परिभ्रमण । अवचट लागला रामचरण ।
जाले अहल्योद्धरण । साष्टांग नमन त्या केले ॥१४०॥
मस्तकी धरिले श्रीरामचरण । आनंदाश्रू चालिले पूर्ण ।
जाले श्रीरामचरणप्रक्षाळण । प्रेम संपूर्ण अहल्येसी ॥४१॥
श्रीरामस्तुती :
म्हणे जय जय रामचंद्रा । शिळा तारिली पदमुद्रा ।
तुझा चरण जगदुद्धारा । भवसागरा लागता ॥४२॥
तुझा लागतांचि श्रीचरण । शिळा उद्धरें हे नवल कोण ।
कर्माकर्माची बोळवण । प्रपंच तो पूर्ण परमार्थ होय ॥४३॥
न होता तुझी चरणभेटी । प्रपंचाची सबळ गोष्टी ।
तुझे चरण देखता दृष्टी । प्रपंच उठी ब्रह्मत्वे ॥४४॥
तुझा लागतांची श्रीचरण । स्थूळ लिंग आणि कारण ।
महाकारणेंसी जाण । होय परिपूर्ण परब्रह्म ॥४५॥
तुझे लागतांचि पाय । देह तो होय विदेह ।
संदेह होती निःसंदेह । जीव तो होय शिवसाक्षी ॥४६॥
अगाध चरनांची ख्याती । वानितां मौनावल्या श्रुती ।
चरणा शरण चारी मुक्ती । कथानुवृत्तिअनुवादें ॥४७॥
अनुवादतां रामकथा । कळिकाळ वोढवी माथा ।
तीर्थे वंदिती चरणतीर्था । कथा ऐकता देव निवती ॥४८॥
आवडी गाता रामायण । श्रीराम सुखावें आपण ।
वक्त्यांचे निरसे जन्ममरण । श्रोते संपूर्ण ब्रह्म होती ॥४९॥
ऐसी हे तुझी निजकथा । पावन करी लोका समस्ता ।
असो कथानुवादवार्ता । नाम स्मरतां निजमुक्ति ॥१५०॥
नित्य स्मरतां रामनाम । सकळ पातकां करी भस्म ।
चहू पुरुषार्थाचें काम । होय सुगम हरिनामें ॥५१॥
करिता रामनामस्मरण । जन्ममरणासी ये मरण ।
समूळ विरे मीतूंपण । भवबंधन बाधेना ॥५२॥
बाधेना मायामोहन । बाधेना कर्मबंधन ।
बाधेना त्रिविधविंदान । रामस्मरण करितांचि ॥५३॥
दृश्य द्रष्टा आणि दर्शन । ध्येय ध्याता आणि ध्यान ।
ज्ञेय ज्ञाता आणि ज्ञान करता रामस्मरण । त्रिपुटीचें भान असेना ॥५४॥
असेना देही अहंभाव । असेना जीवी जीवभाव ।
मीतूंपणा नाही ठाव । नामनिर्वाह श्रीरामे ॥५५॥
रामनामाच्या गदारोळें स्मरत्या शरण रिघिजे काळे ।
भवभय समूळ पळे । सुखसोहळे श्रीरामे ॥५६॥
श्रीरामनामगजरे । ब्रह्म स्वानंदे हुंवरे ।
जेवी धेनु वत्सा अनुसरे । तेवीं नामोच्चारें श्रीराम ॥५७॥
नाममाहात्म्य :
श्रीराम हे नामाक्षर । क्षराक्षरातीत पर ।
नाम परब्रह्म परात्पर । नाममंत्र शिवसेव्य ॥५८॥
नामापासी सद्यःमुक्ती । पंडित बोलती पुराणोक्तीं ।
मी बोलिलो ते माझी प्रतीती । नाम निश्चिती तारक ॥५९॥
नामे भुक्ती नामे मुक्ती । नामापासीं ब्रह्मप्राप्ती ।
रामनाम जे जपती । वंद्य त्रिजगती तेचि पै ॥१६०॥
रामनाम परम तप । रामनाम परम तप ।
रामनाम निरसी पुण्यपाप । नाम निर्विकल्प समाधि ॥६१॥
नामी नाही अनध्यान । नामी सर्वदा स्वाध्याय ।
नाम प्रत्यक्ष परब्रह्म पाहे । अभाग्या भाव उमजेना ॥६२॥
नामी नाही अनध्ययन । नामी नाही विधिविधान ।
नामी नाही कर्मबंधन । नामे पावन महापापी ॥६३॥
जरी जाला दुराचारी । तो जै भरे अनुतापभरीं ।
रामनामे जपे जिव्हारी । तो साधु संसारी भगवद्वाक्यें ॥६४॥
अहल्येने केलेली स्तुती :
श्रीरामकृपानिजदीप । आहल्येचें गेले आकल्पपाप ।
तिच्या तपाचा प्रताप । पात ते निष्पात करूनि दावी ॥६५॥
इंद्र न करिता व्यभिचार । शाप न देता ऋषीश्वर ।
तै मी कैंचा पावतें रामचंद्र । भाग्य माझे थोर ऋषिशापें ॥६६॥
गौतमाचा निजशाप । तो मज जाला अमृतरूप ।
माझे जावोनि पुण्यपाप । शुद्ध स्वरूप पावले ॥६७॥
इंद्र केला नाही व्यभिचार । केला माझा जन्मोद्धार ।
गौतमास्जाप नव्हे तो वर ।तेणें रघुवीर भेटविला ॥६८॥
गौतम माझा निजभ्रतारू । गौतम माझा निजसद्गुरू ।
गौतम माझा निजनिर्धारू । तेणे रघुवीरू भेटविला ॥६९॥
जगी उदंड आहेत वीर । परी छेदूं न शकती अहंकार ।
परम योद्धा श्रीरामचंद्र । मारिला सहपरिवार अहंभाव माझा ॥१७०॥
ऐसी अहल्या करिता स्तुती । गौतम कळलें ज्ञानशक्तीं ।
तेणे येवोनि शीघ्रगती । स्वये रघुपति पूजिला ॥७१॥
कामक्रोधा निर्दाळी गौतम । अहल्या श्रीरामे निष्काम ।
दोहांची वृत्ति सहजें सम । रामे परब्रह्म पावलीं ॥७२॥
गौतम अहल्या पुनर्मीलन :
श्रीरामे देवोनि भेटी । दोहींची सोडिली लिंगगांठी ।
सच्चिदानंदें आली पुष्टी । दोघा समदृष्टी समत्वें ॥७३॥
दोहींचें एक देखणेपण । दोहींचे एक सावध श्रवण ।
दोहींचे एक मन उन्मन । दोन्ही चैतन्यघन श्रीरामे ॥७४॥
दोहींचा एक आत्मा एक प्राण । दोहींचें एक अंतःकरण ।
दोहींचें एक निजज्ञान । दोघे सुखसंपन्न एकात्मता ॥७५॥
दोहींची एक शब्दसिद्धी । दोहींची एक इंद्रियविधी ।
प्रपंचीं परमार्थी समान बुद्धी । दोघा समाधी एकचि ॥७६॥
ऐसी एकात्मतानिष्ठ । दोघा भरिला शेंसपात ।
गौतम ऋषिवर्य वरिष्ठ । अहल्या श्रेष्ट पतिव्रता ॥७७॥
ऐसी एकात्मता पूर्ण । स्वये श्रीराम आपण ।
केले अहल्योद्धरण । गौतम संपूर्ण सुखी केला ॥७८॥
सुखी संपन्न ऋषीश्वर । हर्षे निर्भर सुरवर ।
वर्षती सुमनांचे संभार । जयजयकार प्रवर्तला ॥७९॥
एकात्मा तरलों म्हणती । शेखी भेददृष्तीं विषयासक्ती ।
ऐसी ऐकोनिया मुक्ती । श्रोते हांसती सज्ञान ॥१८०॥
कवित्व करिताती धीटपाठ । मेळविती कर्मकचाट ।
तेंवि कवित्वाची कटकट । श्रोते वीट मानिती ॥८१॥
जे कवित्वीं शब्दचातुर्यशोभा । ते शाब्दिकासी अतिवल्लभा ।
जे कथा परमार्थज्ञानगाभा । ते कथाजगदंबा जग निववी ॥८२॥
ज्ञानी निवती परमार्थबोधें । पंडित निवती पदबंधें ।
लोक निवती कथाविनोदें । ग्रंथसंबंधें जग निवे ॥८३॥
मुख्यत्वे ग्रंथींचें राखावे प्रेम । प्रतिपदीं प्रतिपादावे परब्रह्म ।
हाचि कवित्वाचा कवित्वधर्म । श्रोते सप्रेम होती सुखी ॥८४॥
कथा रम्य रामायण । एका जनार्दना शरण ।
जाले अहोल्य्द्धरण । जानकीवरण ते ऐका ॥८५॥
स्वस्ति श्रीभावार्थ रामायणे बालकांडें एकाकारटीकायां
अहल्योद्धरणं नाम चतुर्दशोऽध्याय ॥१४॥
॥ श्लोक - ६ ॥ ओंव्या १८५ ॥ एवं १९१ ॥
