॥ श्रीएकनाथमहाराजकृत
7.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
उत्तरकांड
॥ अध्याय सातवा ॥
माळी राक्षसाचा वध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
पूर्वसंगी रजनीचरी । वेढियला तो श्रीहरी ।
पुढे वर्तले ते चतुरी । सावधान ऐकावे ॥१॥
श्रीहरि पर्वतासमान । राक्षस तेथे मेहुडे जाण ।
श्रीहरी सुटलिया प्रभंजन । दणादाण राक्षसमेघां ॥२॥
अवकाळींचा पर्जन्य । बळेंविण करी गर्जन ।
तैसे राक्षस बळहीन । संग्रामा जाण प्रवर्तले ॥३॥
जैसे टोळ आकाशी । पसरती दशदिशीं ।
ते टोळ वृक्ष देखोनि मानसी । उल्लासेंसी वेढिती ॥४॥
जेंवी मशक पर्वतमाथा । असंख्य बैसती तत्वता ।
परी तो भार पर्वतचित्ता । अणुमात्र उपजेना ॥५॥
जैसे मत्स्य सागरी । क्रीडताती सहपरिवारी ।
ते पारधी आकळी जाळियाभीतरीं । तैसे श्रीहरि करू पाहे ॥६॥
परस्परांचे तुंबळ युद्ध :
त्या राक्षसांचे अमोघ बाण । वज्राऐसे अति कठिण ।
जैसा प्रळयींच प्रभंजन । भूतगण पै व्यापी ॥७॥
राक्षसबाणांचा शिरावा । वेढिता झाला त्या माधवा ।
पुढे जे वर्तले श्रीराघवा । सांगेन मी अवधारी ॥८॥
वैष्णवी माया अकळ । घातले भ्रांतीचे पटळ ।
रणी मांडिला कोल्हाळ । वीरी सकळीं परस्परें ॥९॥
रथ लोटिती रथावरी । कुंजर आदळले कुंजरीं ।
असिवार असिवारीं । सैन्यसागरीं आवर्त ॥१०॥
ते राक्षस पर्वताकार । हाणिते झाले शस्त्रसंभार ।
जैसा वर्णांमाजी द्विजवर । प्राणायामबळेंकरीं ॥११॥
शरदाटले भूमंडळी । तेणे दशदिशां अंधारी पडली ।
वीरां वीर तये काळी । हाणिते झाले आपआपणियांतें ॥१२॥
आपले सैन्य आपण । मारिते झाले राक्षस गण ।
सवेंचि करिती गाढ गर्जन । आपणा आपण मानवती ॥१३॥
शस्त्रे सणसणा वाजत । जैसा प्रळयकाळींचा वात ।
दोन्ही दळां संघाट होत । वीर गर्जत वाढिवा ॥१४॥
श्रीविष्णूंकडून राक्षसांचा संहार :
मग निशाचरांवरी । रागे क्षोभला श्रीहरी ।
शार्ड्.ग धनुष्य टणत्कारी । नाद अंबरीं न समाये ॥१५॥
राक्षसांच्या शिरांतें । तोडिता झाला क्रोधे बहुते ।
जैसा योगेश्वर मायेतें । आत्मज्ञानें निरसी पै ॥१६॥
सर्वांतक बाण घेउनी करी । क्रोधे सोडिला दैत्यांवरी ।
तेणे क्षणमात्राभीतरी । केली बोहरी राक्षसांची ॥१७॥
निशाचर पाडोनि भूमंडळी । बाण भेदोनि गेला पातळीं ।
शेष कांपतसे चळचळीं । कूर्म कळकळी पै धाके ॥१८॥
सवेंचि पांचजन्य त्राहटिला । नेणो नादें काळ कांपला ।
दिग्गजांच्या श्रवणबिळा । बधिरता पै आली ॥१९॥
शशिसूर्य कंपायमान । नक्षत्रे पडती गळोन ।
मेरुमस्तक आंदोळून । समुद्रजीवन उचंबळले ॥२०॥
नांदें राक्षसें झालीं वेडीं । समरांगणीं पडली उभडीं ।
एका झालीं हडबडी गाढी । एक रोकडीं निमाली ॥२१॥
सेन्य मारिले समसकट । रथचक्राचें झाले पीठ ।
घुरघुरितसे कंठ । प्राण त्यागित रणरंगी ॥२२॥
जैसे सिंहाचें गर्जन । कुंजरांचा पळे प्राण ।
तैसे प्राणाहत राक्षससैन्य । पांचजन्यनादेंकरीं ॥२३॥
रणनदी वाहे अशुद्धगाढी । राक्षसकरवडें यांची दरडी ।
समरांगणीं जुंझती कडोविकडी । तेचि परथडी पावले ॥२४॥
रणवसंत माजला । वीरे वीर रुधिरें न्हाला ।
तोचि पळस फुलावला । आरक्ततेकरोनी ॥२५॥
रण पडिले असंख्यात । वीर घायाळ झाले बहुत ।
तोचि कोकिळांचा रव होत । आलापीत पंचमस्वरीं ॥२६॥
रवि रजनी खंडित । अति वाते समुद्र हेलावत ।
तैसा श्रीहरि मर्दित । अरिवीरसैन्यातें ॥२७॥
शरभेण यथा सिंहः सिंहेन द्विरदो यथा ।
द्विरदेन यथा व्याघ्रो व्याघ्रेण द्वीपिनो यथा ॥१॥
द्वीपिना च यथा श्वानः शुना मार्जारका यथा ।
मार्जारेण यथा सर्पाः सर्पेण च यथा प्लवाः ॥२॥
तथा ते राक्षसाः सर्वे विष्णुना प्रभविष्णुना ॥३॥
शार्ङ्गधनुष्यापासूनि शर । मनोवेगापरीस थोर ।
सुटले तेणे निशाचर । रणभूमीवर पाडिले हो ॥२८॥
शरभ जैसा सिंह विदारी । सिंह गजाते विदारी ।
गज व्याघ्र देखोनि दूरी । व्याघ्रा भय चित्याचें ॥२९॥
चित्या श्वाना वैर थोर । एकमेकांचा करिती संहार ।
श्वानास भीतसे मार्जार । सर्पा मांजर पै भक्षी ॥३०॥
उरगें भेकातें गिळी जाण । तैसे श्रीहरीचे शर दारुण ।
राक्षससैन्य करोन भग्न । वीर दारुण पाडियेले ॥३१॥
वीर पाडिले रणमंडळीं । जैसा प्राणी सुषुप्तिकाळीं ।
नाकीं तोंडीं पडे धुळी । त्याचे तया स्मरण नाही ॥३२॥
तीनही राक्षस भयभीत :
कोट्यानुकोटी राक्षस । मारोनि विष्णु पावला यश ।
उरले तिही घेतला त्रास । लंकाप्रवेश तिही केला ॥३३॥
शंखराजाची ध्वनि भारी । तेणे राक्षसें घाबिरीं ।
पळोनि प्रवेशलीं पुरी । एकी मार्गी प्राण सांडिले ॥३४॥
राक्षससैन्य भंगलें । कित्येक रणी पडिले ।
हे सुमाळिनें देखिले । क्रोधाचें आले भरतें तया ॥३५॥
मग तो सुमाळी रजनीचर । विष्णूस येवोनि समोर ।
बोलता झाला साहे माझे शर । तरी मी वीर तुज म्हणेन ॥३६॥
सुमाळी , माल्यवंत याम्ना पराभूत केले :
विष्णूतें हाणित शर । विष्णू निवारी योद्धा चतुर ।
मग म्हणे तू राक्षस थोर । संग्रामी धीर धरी आता ॥३७॥
श्रीविष्णूनें चाप सज्जिले । गुणीं शर लाविले ।
जया बाणंवरी खेळे । पुट तेजाळ अग्नीचें ॥३८॥
विष्णूचें येता अग्निमय बाण । राक्षसें केले खंडण ।
सोडोनियां आपुले बाण । रवि विष्णू आच्छादिला ॥३९॥
मांडलें रण अति कठिण । राक्षसे सोडिले निर्वाणबाण ।
रणरंगी विष्णूस आंवरुन । आपण गर्जन करिता झाला ॥४०॥
सुमाळियें दिधली आरोळी । जेंवि विजु तडके मेघमंडळीं ।
श्रीहरीने देखोनि ते काळी । बाण तयावरी सोडिले ॥४१॥
बाण आदळले रथेसीं । छेदिले रथांच्या वारुवांसी ।
वाहटुळीमाजि पत्रें जैसी । आकाशपोंकळी भोंवत ॥४२॥
सुमाळी होवोनियां भ्रात । रणामाजि परिभ्रमत ।
जैसा अटवीं अंध फिरत । जाजावत प्राणी पै ॥४३॥
रणी सारथि भंगला । सुमाळी विरथ झाला ।
श्रीविष्णू यश पावला । देवी केली पुष्पवृष्टि ॥४४॥
सुमाळी रणी विमुख । देखोनि माल्यवंत कोपला अधिक ।
बाण घेतला काळांतक । क्रोधे सोडिता झाला ॥४५॥
तो बाण अति तेजाळ । सूर्यतेजाहूनि सोज्ज्वळ ।
माळी संधान करी सबळ । तये काळी अवधारा ॥४६॥
वैरियाचे अमित बाण । विष्णू मध्ये करी खंडण ।
जैसा पंदित छेदी पाखांडकथन । तेंवी ते बाण तोडिले ॥४७॥
तदनंतरे श्रीहरी । काय करिता झाला ते अवसरी ।
संधान सरी राक्षसांवरी । जेंवी अंबरीं घन वर्षे ॥४८॥
की ते काळाचेचि दूत । प्रेरिलिया स्थळासी जात ।
तैसे चालिले गर्जत । राक्षसअंत करावया ॥४९॥
माल्यवंता देही भेदले । रुधिरातें प्राशन करिते झाले ।
सर्पसुधापानीं बैसले । चाटूं निघाले सुरासुरा ॥५०॥
माल्यवंत झाला मूर्च्छाभूत । रथ सार्थि अश्व तेथ ।
न लागतांचि क्षणमात्र । हतोहत पै झाले ॥५१॥
चाप बाण पडिले रणी । सैन्या झाली भंगणी ।
रजनीचर मूर्च्छा सावरोनी । तत्क्षणीं उठिला ॥५२॥
माळीच्या गदाप्रहारने गरुड मूर्च्छित :
हाती वसवोनियां गदा । करिता झाला महाशब्दा ।
जैसा सिंह कांपे क्रोधे गदागदा । तेंवी गोविंदा हाणित ॥५३॥
ते गदा गरुडाचे ललाटीं । बैसे जैसा दरिद्री कपाळ पिटी ।
रुद्रप्रळयकाळीं घोंटी । मायामय सृष्टिरुपातें ॥५४॥
राक्षसगदा अति कठिण । लागता गरुड मूर्च्छापन्न ।
रणी विमुख नारायण । राक्षसगण हरिखले ॥५५॥
देव रणी पराभविले । श्रीविष्णूस विमुख केले ।
गरुडा गदेनें हाणितलें । राक्षसा झाले महासुख ॥५६॥
एक आनंदें नाचती । एक माळीसी वर्णिती ।
एक भला भला म्हणती । थोर ख्याती त्वा केली ॥५७॥
बंधूचें उसनें घेतलें । विष्णूतें विमुख केले ।
समरांगणीं यश आले । पराभविलें देवांते ॥५८॥
राक्षस समस्त एकवटूनी । आनंदे गर्जती मेघध्वनी ।
हे ऐकोनि विष्णूनें कानी । कृपावलोकनीं उठविलें गरुडा ॥५९॥
श्रीहरीची कृपा जयावरी । तयाचे कोण काय करी ।
हात उतरितां श्रीहरी । बळ शरीरी बाणले ॥६०॥
विष्णूंनी सुदर्शनचक्रानें माळीचा शिरच्छेद केला :
गरुडावरी वळंघोनि जाण । हाती सुदर्शन चक्र दारुण ।
जयाचे तेज कोटिसूर्यगण । खद्योत होवोन राहिले ॥६१॥
चक्राभेणे कळिकाळ । चळचळां कापे होवोनि निर्बळ ।
चक्रातें देखोनि समुद्राजवळ । मर्यादेते नुलंघी ॥६२॥
ऐसे चक्र अति दुर्धर । राक्षसाचें छेदोनि शिर ।
गगनी भोवे चक्राकार । देखोनि भास्कर कोपला ॥६३॥
पर्वणी सांडोनि अवकाळीं । राहु येतो आम्हांजवळी ।
तैसे राक्षसशिर अंतराळीं । भोंवोनि खाली पडिले ॥६४॥
स्वर्गी देव आनंदले । पुष्पवर्षाव करिते झाले ।
एक आनंदे नाचूं लागले । एक गाते झाले हरिनाम ॥६५॥
राक्षसांचा आक्रोश आणि पळापळ :
येरीकडे रजनीचर । निमाला देखोनि माळी वीर ।
दुःखे पिटिती करे शिर । पाषाणें उदर पीटिती ॥६६॥
म्हणती अपशकुनाचें झाले फळ । मारिले आमचें असंख्य दळ ।
बंधु निर्दळिला सबळ । सेना सकळ पळाली ॥६७॥
आमचें कांही न चले येथ । म्हणोनि सुमाळी माल्यवंत ।
विमुख होवोनि रणाआंत । पुरी प्रवेशते पै झाले ॥६८॥
कित्येक सैन्य पळाले । किंचित जे काही उरले ।
ते पक्षवातें गरुडे संहारिलें । चक्रे तोडिलें शिरातें ॥६९॥
गदेनें कित्येक निमाले । तोमरें कित्येक निवटिले ।
कांही थोडेबहुत उरले । ते मारिले शस्त्रेंकरीं ॥७०॥
कित्येक बणें निर्दळून । रणी पाडिले असंख्य जाण ।
तेथे भूतावळी मिळोन । मांसभक्षण करिती ॥७१॥
आनंदें नाचती क्षेत्रपाळ । वाद्यें वाजविती वेताळ ।
शाकिनी डाकिनी करिती गोंधळ । मांसाचा सुकाळ पै तेथे ॥७२॥
पात्रें भरोनि रुधिर पिती । एकमेकांस प्रीतीनें देती ।
एकमेकांस हांसती । तिरस्कारिती एकमेका ॥७३॥
ऐसा संग्राम अत्यद्भुत । श्रीहरि झाला विजयान्वित ।
पुढे परिसावे सावचित्त । वाल्मीक वाग्रत्नातें ॥७४॥
वाल्मीककृत रामायण । एकैक अक्षर पावन ।
श्रवणें ब्रह्महत्यादि दोष दहन । कलिमलनाशन रामकथां ॥७५॥
एका जनर्दना शरण । म्हणता कैंचे दुजेपण ।
श्रीरामप्रिय रामायण । नाम तारण भवदोषां ॥७६॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे उत्तरकांडे एकाकारटीकायां माळीराक्षसवधो नाम सप्तमोऽध्यायः ॥७॥
ओंव्या ॥७६॥ श्लोक ॥३॥ एवं ॥७९॥
