(कवित्वाचा निषेध व त
3515.
(कवित्वाचा निषेध व त्याचा परिहार)
नाही जो वेचलो जिवाचिया त्यागे । तोवरी वाउगे काय बोलो ॥१॥
जाणिवले आता करी ये उद्देश । जोडो किंवा नाश तुमची जीवे ॥धृपद॥
ठायीचेचि आले होते ऐसे मना । जावे ऐसे वना दृढ जाले ॥२॥
तुका म्हणे मग वेचीन उत्तरे । उददेशिले खरे झाल्यावरी ॥३॥
अर्थ :
जोपर्यंत मी जीवाचा त्याग केला नाही देहाचा खर्च करुन तुझी सेवा केली नाही तोपर्यंत परमार्थाविषयी व्यर्थ काय बोलू ? देवा आता मला माझा मुख्य उद्देश समजला आहे आता मी प्राप्ती तुझी तरी करुन घेईल नाहीतर माझ्या जीवाचा तरी नाश करुन घेईल. पूर्वीच माझ्या मनामध्ये असे आले होते वनामधे जावे असा दृढनिश्चय देखील झाला होता. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझा उद्देश म्हणजे तुझी प्राप्ती करुन घेण्याचा आहे तो ज्यावेळी खरा होईल त्यापुढेच मी तुझ्या सेवेचे आणि तुझ्या भक्तीचे शब्द बोलेन.
