घडिया घालुनि तळी चाल
3996.
घडिया घालुनि तळी चालती वनमाळी । उमटती कोमळी कुंकुमाची ॥१॥
वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकी जेणे ॥धृपद॥
पैस धरुनी चाला ठाकत ठायी ठायी । मौन्य धरुनी काही न बोलावे ॥२॥
तुका अवसरु जाणवितो पुढे । उघडली महाल मंदिरे कवाडे ॥३॥
अर्थ :
हरी शय्यागृहातून येत असताना त्यांच्या पायाखाली वस्त्रांच्या घड्या घालून टाकल्या आहेत आणि त्यावरुन वनमाळी चालत येत आहेत व त्यावर हरीचे कुंकुम मंडीत कोवळी पावले उमटत आहेत. ज्याने पाषाणदेखील पाण्यात तारले अशा हरीच्या चरण रजाला सर्व जण म्हणजे लोकांनी वंदन करावे. पैस जागा सोडून हरीला जाण्यासाठी सर्वांनी मधोमध जागा सोडा आणि सर्वांनी जागोजागी हरीला जाण्यासाठी जागा ठेवून उभे राहा व मधोमध हरीला जाता येईल अशी जागा सोडा व सर्वांनी मौन धारण करा कोणी कोणाशीही काहीच बोलू नका. तुकाराम महाराज म्हणतात, आता हरीच्या शय्यागृहाचे कवाडे उघडले आहेत, हरी बाहेर येत आहेत आणि मी पुढे चोपदार म्हणून उभा आहे आणि तुम्ही कसे वागावे या विषयी वेळोवेळी मी तुम्हाला सूचना देत आहे.
