सहज कर्म भक्ति घडवया
110.
सहज कर्म भक्ति घडवया कोडे ।
ज्ञानघन निवाडे नाम जपो ॥
नाम मात्र नमन ज्ञानघन पूर्ण ।
रामनामे कर्ण भरू रया ॥
सत्वाचे सागरी उतरो पैलथडी ।
रिती अर्धघडी जावो नेदो ॥
ज्ञानदेवा चित्त अवघे धन गोत ।
रामनामे तृप्त सकळ जीव ॥
अर्थ :
परमात्म्याची सहज भक्ती करण्यासाठी व ज्ञानधन मिळवण्यासाठी नाममंत्र जप हा उत्तम कर्म मार्ग आहे. रामनामाच्या घोषाने कान भरुन गेले की त्या नामामुळे ज्ञानधन मिळते. रिकामा वेळ न घालवता नामस्मरणात रत झाले तर सत्व समुद्र पार होतो म्हणजे मुक्तीचा मार्ग मिळतो. रामनामामुळे मी तृप्त झालो माझे चित्त त्या नामाने व्यापले व ज्ञानधन मिळाले असे माऊली सांगतात.
