आजि माझा जन्म सफल गे
571.
आजि माझा जन्म सफल गे माये ।
संतसज्जनांचे देखियले पाये ।
त्यांचे चरणरजे देहभार जाये ।
सुख हे होय अनिवार ॥१॥
आजि माझे भाय फळासी आले ।
साधुसंतांचे पाय देखिले ।
सप्रेम या देही दाटले ।
सुख सुखावले सहजची ॥२॥
एकपणे होते अनेक झाले ।
पाहाता विश्वाकार विस्तारले ।
वटबीजन्याये कैसे विरूढले ।
सर्व होउनी ठेले माझी मीच ॥३॥
आले गेले अवधान नाथिला भ्रम ।
आजवरी प्रकृतीचे केला हा धर्म ।
रज्जुसर्पन्याये मिथ्या जाला भ्रम ।
देखता चरणरज नाचे ॥४॥
बहिणी म्हणे तेणे अहंपण माझे ।
संसारदुःख उतरिले वोझे ।
तुकाराम भेटला धन्य जिणे माझे ।
कृतकृत्य जाले सहजची ॥५॥
