सहज लीळा मी साक्षी य
2338.
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचू वाचा ऐसे जाले ॥१॥
उपक्रमे वदे निशब्दाची वाणी । जे कोठे बंधनी गुंपोनेणे ॥धृपद॥
तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन ॥२॥
तुका म्हणे येथे गेला अतिशय । आता पुन्हा नये तोंड दावू ॥३॥
अर्थ :
मी जे काव्य केले आहे ते सहज रीतीने लीला रुपी काव्य केले आहे परंतु ते मी केले नसून केवळ मी त्याचा साक्षी आहे व त्याचा त्याग ही मी करू शकत नाही इतका मला त्या काव्याचा हेवा जडला आहे. हा जो माझ्या वाणीतुन काव्य रुपी उपक्रम चालू आहे तो पहिल्यापासून जे निशब्द असे ब्रम्ह आहे हे त्याचेच निरूपण करीत आहे व कोणत्याही माइक पदार्थाचे वर्णन करण्याच्या बंधनात माझी वाणी पडत नाही. सर्व अंधाराचा नाश सूर्य करतो व त्या सूर्याच्या उजडा मध्ये सर्व लोक आपापले व्यवहार करत असतात परंतु सर्वांच्या व्यवहारापासून सूर्य वेगळा राहत असतो. तुकाराम महाराज म्हणतात मी जे काव्य केले आहे त्याविषयी मी काव्य केले असा अभिमान माझा केव्हाच गेला आहे आता तो अभिमान केव्हाच परत येणार नाही.
