दृश्यादृश्य नातळे स्
728.
दृश्यादृश्य नातळे स्थूळ प्रपंचभान ।
तेथे मायेचे कारण हेत नाही ।
म्हणोनी ज्ञान विज्ञान कल्पना लक्षण ।
तेथे सुखासी सुख जाण भोगिता हे ॥१॥
नामावांचुनी संवादे निवृत्ति अभेद पदे ।
निज भजनी स्वानंदे नवल पाहे ॥२॥
तेथे दिवस ना रात्री सर्वहेतुविवर्जितु ।
स्वयंभासक तू नवल त्याचे ॥३॥
चिन्मय ना चिन्मात्र वेद्य सर्वगत ।
स्वसंवेद्य साक्षभूत आपणयासी ॥४॥
स्वयंवेद्य सन्मुखता भेदु नाही आता ।
भक्ति आणि परमार्था हेचि रूप ॥५॥
निवृत्तिप्रसादे संपर्केसी बोध ।
नीच नवा आनंद ज्ञानदेवा ॥६॥
अर्थ :
दृश्य, अदृश्य स्थूल प्रपंच ज्याठिकाणी (परमात्म) भान होत नाही. तेथे माया मानण्याचे तरी कारण काय? मग ज्ञान विज्ञान लक्षण ही कल्पना कोठून आणावी? सर्व सुखाचा सुख परमात्मा त्याचाच उपभोग भोगणारा जीव होतो. नाम व नामी यांचा अभेद सर्वत्र आहे. त्या नामाचा संवाद निवृत्तिनाथ करीत आहे. त्या आत्मचिंतनरूपी भजनाचा आनंद श्रीगुरू निवृत्तीनाथ आम्हाला देत आहेत हेच मोठे नवल आहे. दुसरे नवल असे की त्या स्थितित दिवस किंवा रात्र किंवा कोणाचाही हेतु नसून तेच पद तू केवळ स्वयंप्रकाश असल्यामुळे चिन्मय किंवा चिन्मात्र हे धर्म तुझ्या ठिकाणी नाही सर्वगत असणारे वेद्य जे परमात्मतत्त्व स्वसंवेद्य साक्षीभूत ही आपणच आहे. स्वसंवेद्य सन्मुख असता भेद शिल्लक राहात नाही. अशा तऱ्हेचा अद्वैत बोध होणे, हीच भक्ति असून खरा परमार्थ हाच आहे. निवृत्तीरायांच्या कृपेमुळे हा बोध आम्हाला प्राप्त झाला आणित्यामुळे आम्ही नित्यनवा असा ब्रह्मानंद भोगित आहोत असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
