बहु या प्रपंचे भोगवि
3021.
बहु या प्रपंचे भोगविल्या खाणी । ठाकोनिया मनी आला सीण ॥१॥
आता पायापाशी लपवावे देवा । नको पाहू सेवा भक्ती माझी ॥धृपद॥
बहु भय वाटे एकाच्या बोभाटे । आली घायवटे फिरोनिया ॥२॥
तुका म्हणे सिगे भरू आले माप । वियोग संताप झाला तुझा ॥३॥
अर्थ :
देवा या प्रपंचाने मला खूप जन्ममरणाच्या खाणी भोगविल्या आहेत त्यामुळे आता मला त्याचा इतका शीण आला आहे की मनाला वाटते त्याला टाकून दयावे. देवा आता त्यामुळे तू मला तुझ्या पायापाशी लपव माझी सेवा भक्ती माझा भक्तीभाव काहीही पाहू नको. देवा मला त्या नरकाचा भोग वाटा ऐकून खूप भय वाटत आहे. आणि अनेक जीव यापूर्वी खूप जन्ममरणाचे दु:ख देखील भोगून फिरुन आले आहेत. या बोभाटयाने देखील मला भय वाटत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या आयुष्यरुपी मापाचे माप आता शिगेपर्यंत भरत आले आहे आणि मला तुझ्या वियोगाने संताप होत आहे व दु:खही होत आहे.
