गुरु हा संतुकुळीचा र
56.
गुरु हा संतुकुळीचा राजा । गुरु हा प्राणाविसावा माझा ।
गुरुवीणा देव दुजा । पाहता नाही त्रिलोकी ॥१॥
गुरु हा सुखाचा सागरु । गुरु हा प्रेमाचा आगरु ।
गुरु हा धैर्याचा डोंगरु । कदाकाळी डळमळीना ॥२॥
गुरु वैराग्याचे मुळ । गुरु हा परब्रम्ह केवळ ।
गुरु सोडवी तात्काळ । गांठ लिंगदेहाची ॥३॥
गुरु हा साधकांशी साह्य । गुरु हा भक्तांलागी माय ।
गुरु हा कामधेनु गाय । भक्तांघरी दुभतसे ॥४॥
गुरु घाली ज्ञानांजन । गुरु दाखवी निज धन ।
गुरु सौभाग्य देऊन । साधुबोध नांदवी ॥५॥
गुरु मुक्तीचे मंडन । गुरु दुष्टांचे दंडन ।
गुरु पापाचे खंडन । नानापरी वारितसे ॥६॥
काया काशी गुरु उपदेशी । तारक मंत्र दिला आम्हांसी ।
बापरखुमादेविवरासी । ध्यान मानसी लागले ॥७॥
