अविवेकें देखा नवल के
2520.
अविवेकें देखा नवल केले । अभिमानें कैसे लग्न लाविले ॥१॥
गुणाची नोवरी अवगुणाचा नोवरा । सख्या सहोदरा लग्न केले ॥२॥
पांचें सुरवाडी सासुरवाडी ये । अकल्पीचे शेजे निजलिये ॥३॥
अंगसंगेविण संतती जाहली । आब्रह्म कैसी तात्काळ व्याली ॥४॥
गुणाचेनि बळे वरसोनी पोटे । घरोघरी भेटी नेत असे ॥५॥
सत्कर्म विवेकु पोटासी आला । तेणे जागविला आपुला व्याला ॥६॥
उठोनिया वरु संतती खाये । नोवरीसहित गेली माये ॥७॥
पितामहाचा पिता सुभानुतेजें । एका जनार्दनी न दिजे दुजे ॥८॥
