कपटाचे कुपथ्य जाले त
870.
कपटाचे कुपथ्य जाले तुझे पोटी | स्मरावा जगजेठी कृपाळु तो ॥१॥
नाम औषध घ्यावे नाम औषध घ्यावे | संतांचे लागावे समागमी ॥२॥
त्यापाशी औषध आहे नानाविध | रामकृष्ण गोविंद म्हणती वाचे ॥३॥
पुत्रस्नेहे कैसा अजामेळ स्मरला | तेणे तो उद्धरला क्षणमात्रे ॥४॥
राम राम म्हणता तारिली कुंटिणी | वैकुंठभुवनी तये वासु ॥५॥
तेचि हे औषध प्रल्हादे घेतले | ते तू घे उगले म्हणे नामा ॥६॥
