वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › १. बालकाण्ड - अध्याय २७ › २७. अयोध्येत आगमन व बालकांड समाप्त

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088279 · अभंग क्र. २७

27.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय सत्ताविसावा ॥
श्रीरामजानकी अयोध्याप्रवेश

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

श्रीरामांनी विष्णुचाप वरुणास दिले :

परशुराम गेला स्वस्थाना । स्वस्थता दशरथाचे मना ।
आनंद वाढला चौगुना । रघुनाथ जाणा निजविजयी ॥१॥
सांडोनि वैष्णवचापासी । भार्गव गेला स्वाश्रमासी ।
धनुष्य दिधले श्रीरामासी । तेणे वरुणासी तेंदिधलें ॥२॥
मी आपुलिया निजात्मशक्तीं । रणी जिंकोनि राक्षसपंक्ती ।
वैष्णवचाप हे असता हाती । लोक म्हणती धनुष्यबळ ॥३॥
माझ्या यशाची निजपुष्टीं । अवघी जाईल धनुष्यासाठीं ।
यालागी ते उठाउठी । राम जगजेठी स्वये त्यागी ॥४॥
स्वसामर्थ्य नाही ज्यासी । धनुष्य यश केंवी होईल त्यासी ।
यालागी श्रीराम नव्हे अभिलाषी । म्हणोनि वरुणासी दिधले ॥५॥

अयोध्येत प्रवेश, प्रजाजनांकडून सत्कार :

अयोध्येत प्रवेशावया सत्वर । उल्लास करी नृपवर ।
आनंदें गर्जती गजभार । सैन्यसंभार आल्हादी ॥६॥
निशाण भेरी मृदंग शंख । ढोल चौडकी काहळा अनेक ।
जयजयकारें सकळिक । नगरान्मुख निघाले ॥७॥
ऋषी पढती शांतिपाठ । ब्रींदे गर्जताती भाट ।
सिंहनाद करिती वीर वाट । घडघडाट रथांचा ॥८॥
वसिष्ठे दूर धाडिले पुढे । नगर शृगारावया वाडेंकोडें ।
रंगमाळा कुंकुमसडे । मखरे तोरणे ठायी ठायी ॥९॥
गुढिया उभविल्या घरोघरी । पताका झळकती अंबरीं ।
दिव्यभूषणें दिव्यांबरी । नरनारी शोभती ॥१०॥
कुंकुम केशर सौमनमाळा । कंठी रत्नशपदक रत्नंमेखळा ।
नवरत्न हार ऋळे गळा । जनलीला शोभत ॥११॥
पूर्णकशश द्वारोद्वारीं । दधि दूर्वा सुमने त्यांभीतरीं ।
प्रदीप्त दीप ठेविले हारीं । घरोघरी आल्हाद ॥१२॥
राजगृहीं अति उत्सावो । गुढिया मखरे उभविती पाहो ।
विजयी जाला श्रीरामराओ । आजानुबाहू प्रतापी ॥१३॥
श्रीरामे शिवचाप भंगुनी । परशुरामाते जिंकोनी ।
सीता आणिली पर्णोनी । जनवदनी हे वार्ता ॥१४॥
एक म्हणती गुरूच्या यागीं । राक्षस मारिले रनांगणी ।
सुबाहु छेदिला सर्वांगी । मारीचालागीं घाय केले ॥१५॥
आणिक म्हणती दुष्ट ताटिका । नित्य पीडीतसे लोका अनेकां ।
श्रीरामे देखतांचि देखा । बाणे एका निवटिली ॥१६॥
एक म्हणती श्रीरामे अवलीळा । चरणे उद्धरिली अहल्या शिळा ।
श्रीराम परब्रह्मपुतळा । सच्चित्कळा साचार ॥१७॥
साकार आणि निराकार । स्वये श्रीराम चिन्मात्र ।
चन्य चन्य लोकांचे नेत्र । श्रीरामवक्त्र देखती ॥१८॥
देखता श्रीरामाचे मुख । निःशेष जाय तहान भूक ।
परमानंदे कोंदाटे सुख । हरिख ओसंडे ॥१९॥
ऐसी श्रीरामाची कीर्ती । घरोघरी अनुवादती ।
आला ऐकोनि रघुपती । सामोरे येती नगरस्थ ॥२०॥
छत्रचामरें गजभारे । वाजती नानाविध तुरे ।
शोभायमान चारी वोहरें । आला गजरें रघुवीर ॥२१॥
चारी पुत्र चारी सुना । देखता धणी न पुरे मना ।
पाहता पारणे होतसे नयना । भाग्यभावना दशरथा ॥२२॥
श्रावणपितयाचा शाप । दशरथासी सुखस्वरूप ।
पुत्र पावला सद्‌रूप । चित्स्वरूप श्रीराम ॥२३॥
जैसा मातेचा निजकोप । वरी कठिण आंत सुखरूप ।
तैसा ब्राह्मणाचा शाप । शापे निष्पाप सुख देत ॥२४॥
श्रावणपितयाचिया शापासाठीं । दशरथा श्रीरामभेटी ।
भोगेत आनंदाच्या कोटी । सभाग्य सृष्टी दशरथ ॥२५॥

श्रीरामदर्शनार्थ सर्वांची स्पर्धा :

नगरी प्रवेशे रघुपती । चारी मुक्ती पुढे नाचती ।
पायघडियांचे गर्तीं । पायी लोळती पुरुषार्थ ॥२६॥
अनुहताचिया संगती । नानाविधें तुरे वाजती ।
नादे कोंदाटे चिच्छक्ती । नभस्थिती चिन्मात्र ॥२७॥
श्रीराम पहावया प्रेम पडिभरीं । एक चढली परेच्या उपरी ।
एक चढोनियां गोपुरी । एक जनांभीतरीं राप पहाती ॥२८॥
एक सलज्ज एकांती । गवाक्षरें राम पहाती ।
एक एकातें धरोनि हाती । राम दाविती अनुलक्षीं ॥२९॥
हा नव्हे तो नव्हे पैल तो तो । ऐसे देखणे जो दावितो ।
तोचि अनुभवएका होतो । पाहणें पाहवितो श्रीराम ॥३०॥
एक चढोनि जीवाचे माथा । सादरें पाहती श्रीरघुनाथा ।
एक सांडोनि जीवभावता । श्रीरघुनाथा भेटती ॥३१॥
नावडे जीवशिवसाम्गात । एकाकी एकपणाआंत ।
परपूर्ण पाहती रघुनाथ । आल्हादयुक्त स्वानंदे ॥३२॥
एक प्रेमाचेनि पडिपाडें । आनंदें नाचती रामापुढें ।
एक ते अत्यंत निधडे । पाहाती चहूंकडे श्रीराम ॥३३॥
एकातें श्रीराम सांगाती । एकासी श्रीराम नित्यगती ।
एक श्रीरामाच्या निजस्थितीं । स्वये वर्तती सर्वदा ॥३४॥
एक निःसंग निश्चिती । लोकाचिये लोकस्थिती ।
स्वये श्रीराम पाहती । आशंकावृत्ती त्या नाही ॥३५॥
एकाची नवलनवाई । गजबजेंसी भिणें नाही ।
श्रीराम पाहती ठायी ठायी । आडवें कांही येवो न शके ॥३६॥
ऐसिया लोकांचिया पंक्ती । श्रीरामासी पाहू येती ।
मंडपघसनी जनासी होती । श्रीराममूर्ती पहावया ॥३७॥
पायघड्या पदवाहणें । दीपावळी नीरांजनें ।
ओवाळिती धनधान्यें । राम पहावया उल्लास जनासी ॥३८॥
श्रीराम जाता निजनगतीं । पाहो न येती अग्निहोत्री ।
पाहता विटाळ होईल भारी । तंव राम दुरी अंतरला ॥३९॥
श्रेत्री स्वयंपाकी केवळ । श्रीराम पाहता होय विटाळ ।
आधणीं टाकावया तांदूळ । चाटू तत्काळ विसरले ॥४०॥
ऐशिया विटाळाची परी । श्रीराम अंतरला दुरीच्या दुरी ।
धुपधुपित पाकाभीतरीं । कर्मअमहंकारी गुंतले ॥४१॥
आम्ही उत्तम आश्रमवासी । श्रीराम जातो जनप्रदेशीं ।
पाहता स्पर्श होईल आम्हांसी । दुरून संन्यासी पाहू म्हणती ॥४२॥
विटाळ भेणे दुरूनि पाहता । श्रीराम न दिसे सर्वथा ।
आश्रमाभिमाने पाहू जाता । राम तत्वता लक्षेना ॥४३॥
अनुलक्षोनि श्रीरामासी । पिंगळा वेश्या धांवे उल्लासीं ।
मार्गी झगटली सन्याशासी । हे लक्ष तिसी असेना ॥४४॥
मज का झगटली हे रांड । रागे सम्न्यासी ठोकी दंड ।
येरी पाहता श्रीरामाचे तोंड । दंडे उदंड सुखी जाली ॥४५॥
स्वामी तुमच्या दंडाचा घाव । तेणे दंडिला माझा अहंभाव ।
तो दंडीना तुम्हांसी पाहाहो । पाहता रामराव विटाळ देखा ॥४६॥
श्रीराम पहतां विटाळ उडे । तो विटाळ संन्याशामाजी दडे ।
म्हणोनि विटाळाचें सांकडे । संन्याशाकडे सर्वदा ॥४७॥
श्रीराम पाहता विकल्पविटाळ । भक्तभावीं न राहे तीळ ।
तो सद्‌गंध संन्याशामाजी सळ । आश्रमी केवळ राहिला ॥४८॥
मी आत्मा सर्वांभूतीं परिपूर्ण । ऐसे भूतां देवोनि अभयदान ।
स्वये केले संन्यासग्रहण । तोचि आपण विटाळ देखे ॥४९॥
श्रोत्री स्वयंपाकी संन्यासी । हे निजमाहेर विटाळासी ।
त्यांमाजी तो सदा मुसमुसी । देखती जगासी अपवित्र ॥५०॥
ऐसी विवादतां वेश्या संन्याशासीं । श्रीराम गेला स्वये स्वाश्रमासी ।
संन्यासी करिता मृत्तिकास्नानासी । आली हातासी मृत्तिका ॥५१॥
मी पवित्र जग अपवित्र । हे स्वयंपाकाचें मुख्य सूत्र ।
तेणे विटाळे श्रीरामचम्द्र । दुरी दुरतर अंतरला ॥५२॥
वर्णाभिमान स्वाश्रमाभिमान । कर्माभिमान धर्माभिमान ।
न वंचितां सर्वाभिमान । रघुनंदन भेटेना ॥५३॥
वेश्या बोलता सद्युक्तीसी । पिंगळा वेश्या कोण म्हणसी ।
जे अवधूतें चोविसा गुरुंसी । यदूपासीं सांगितली ॥५४॥
श्रीराम पावला राजभवन । शांति येवोनि आपण ।
जीवभावाचें निंबलोण । सांडी ओंवाळून वोहरांसी ॥५५॥

श्रीरामाचे राजप्रासादात आगमन :

चारी पुत्र सुना चारी । वसिष्ठें धरोनिया करी ।
प्रवेशला राज मंदिरी । उल्लास भारी राणिवसां ॥५६॥
वाजती मधुर मंगळतुरे । द्विज गर्जती जयजयकारें ।
वोहरें देखोनि मनोहरे । राण्याआदरें पाहो आल्या ॥५७॥
पहिलें कौसल्येसी नमन । चारी सुना अंकी वाहून ।
फरा कंकण । पदकभूषण । दे आपण स्वानंदे ॥५८॥
लागता सुमित्रेच्या चरणा । अति हरिखें आलिंगी चारी सुना ।
कटिमेखळा करकंकणा । दे आपण स्वानंदे ॥५९॥
कैकयीसी करिता नमन । चहू सुनांसी दे चुंबन ।
तांत आपुल्या दोघी सुना जाण । त्यासी घाली आपण सुमनमाळा ॥६०॥
आणखी राणिवसांच्या नारी । वोहरें आलिंगती प्रीतीकरीं ।
ओवाळिती नानापरी । आल्हाद भारी राणिवसां ॥६१॥
करावया गृहप्रवेशासी । कृत्रिम लक्ष्मी भाणवसी ।
देखोनि श्रीरामसामर्थ्यासी । लक्ष्मीं पूर्णांशेसीं प्रकटली तेथे ॥६२॥
कृत्रिम लक्ष्मीचें अंतर । तेथे प्रवेशली लक्ष्मी साचार ।
तिणें तिचे रूप मनोहर । अति सुम्दर आभासे ॥६३॥
सीता आणिली धनुर्भंगेसीं । दुसरी सीता कैंची भाणवसी ।
हे आश्चर्य ज्यात्यासीं ऋषिही मनासीं विस्मित ॥६४॥
ते देखता लक्ष्मीयेसी । सीता साशंकित मानसी ।
हे स्त्री असता गृहवासी । रामे का मज सीतेसी पर्णिले ॥६५॥
आम्ही दोघी स्त्रिया असता । केंवी एकपत्नी्त्व रघुनाथा ।
असो हे एकपत्नीात्व कथा । सवती तत्वता मज जाली ॥६६॥
सवती ओढवली कपाळासी । म्हणोनि क्षोभे पाहता तिसी ।
लक्ष्मी लागली पायांसी । मी तुझी दासी जानकीये ॥६७॥
प्रेमे देता आलिंगन । दोहींचें मोडले दोनपण ।
दोही ठायी एकत्व पूर्ण । आपणा आपण देखती ॥६८॥
लक्ष्मी तेचि सीता आपण । सीता तेचि लक्ष्मी जाण ।
श्रीरामाचे एकपत्नी्पण । सीतेसी पूर्ण कळो सरलें ॥६९॥
सीतालक्ष्मीचें एकपण । त्यादोघी जाणती आपण ।
हे ब्रह्मादिकाम् न कळे विंदान । की जाणे पूर्ण वसिष्ठ ॥७०॥

लक्ष्मीपूजन, आपल्या पत्नी्सह चारही बंधू दशरथ व वसिष्ठाचे सेवेस तत्पर :

शुद्ध विद्या जोडली शस्त्रास्त्रीं । स्त्रिया आणिल्या अति गजरीं ।
कीर्तिं फार जाली लोकांतरीं । येवढी सामग्री श्रीरामा ॥७२॥
तेही चौघे बंधु चौघी स्त्रियांसी । दशरथाचे सेवेंसीं ।
सावधान अहर्निशी । वसिष्ठापासीं किंकरत्वें ॥७३॥
त्यांमाजी श्रीराम जाण । वसिष्ठासी प्रिय संपूर्ण ।
तो दशरथाचा जीवप्राण । आवडे संपूर्ण सर्वांसी ॥७४॥
राम आवडे सर्व भूतां । रामेम् सर्वांसी सुखरूपता ।
तोही वसिष्ठाच्या वचनार्था । होय वंदता किंकरत्वे ॥७५॥
गुरुमहिमा अति थोर । तो संरक्षी रामचम्द्र ।
लोकसंग्रहणार्थ साचार । दावी विचार भजनाचा ॥७६॥

श्रीराम-सीता यांचे परस्पर प्रेम :

श्रीरामाच्या मनोगता । अनुकूल वर्ते सीता ।
सीतेचिया मनोरथा । परिपूर्णता श्रीरामे ॥७७॥
सीतेचा भाव श्रीरामी पूर्ण । राम सीतेसी संपूर्ण ।
सीता रामे सुखसंपन्न । सुखी रघुनंदन सीतेचेनि ॥७८॥
रामरसें रसज्ञ सीता । सीतेच्या रसने श्रीराम भोक्ता ।
श्रीराम देखणे सीता डोळसता । तिचेनि देखता श्रीराम ॥७९॥
श्रीरामे सीता सुंदर पूर्ण । सीतेने राम शोभे सगुण ।
श्रीरामे सीता सुलक्षण । सीतेचेनि लक्ष्यलक्षण श्रीरामा ॥८०॥
श्रीराम सीतेचा निजभोग । सीतेचेनि श्रीराम सुरंग ।
श्रीराम सीता शोभे सांग । सीता सर्वांग श्रीराम ॥८१॥
सीता रस श्रीराम स्वाद ।सीता सुमन श्रीराम सुगंध ।
सीता बुद्धि श्रीराम बोध । अनन्यसिद्धि येरयेरा ॥८२॥
सीता वचन श्रीराम वचनार्थ । सीता पद श्रीराम पदार्थ ।
सीता मुक्ति श्रीराम मुक्त्यर्थ । परम स्वार्थ येरयेरा ॥८३॥
सीता जीव राम जीवन । सीता मन राम मनोज्ञ ।
सीता चित्त श्रीराम चैतन्य । आनंदघन येरयेरा ॥८४॥
सीता धरा श्रीराम धारक । सीता चालण श्रीराम चाळक ।
सीता व्याप्य श्रीराम व्यापक । सुखसंतोष येरयेरा ॥८५॥
सीता क्रिया श्रीरामकर्ता । सीता भोग्य राम भोक्ता ।
सीता ज्ञान राम ज्ञाता । एकात्मता अतिप्रीतीं ॥८६॥
सीता शर्करा राम गोडी । सीता व्यवसाय राम जोडी ।
एकात्मता अति आवडी । न कळे फुडी श्रुतिशास्त्रां ॥८७॥
येरयेरांविण जाण । न करिती उदकपान ।
येरयेरांविण न खाती पान । प्रीती अनन्य येरयेरा ॥८८॥
येरयेरा वेगळेपन । होऊं न शकती अर्धक्षण ।
अणुमाजी दोघे जण । नांदती पूर्ण पूर्णत्वे ॥८९॥
ऐसीऐसिया अनन्यगतीं ।श्रीराम भोगी सीता सती ।
सीतेचिया निजात्मप्रीतीं । श्रीराममूर्ति उल्लासे ॥९०॥
सीतेचा भावार्थ संपूर्ण । देखोनि उल्लासे रघुनंदन ।
सीता भाव धरी द्विगुण । प्रति चतुर्गुण श्रीरामी ॥९१॥
सीता भाव धरी अधिकाधिक । तंव तंव श्रीरामी ओसंडे सुख ।
कैसी अति प्रीति अलोलिक । एकएकां अनन्य ॥९२॥
जैसा ज्यासी श्रीरामी भक्ती । तैसी त्यावरी रामप्रीती ।
हे बोलिलेंसे बहुता ग्रंथीं । मीच किती अनुवादों ॥९३॥
जैसा भाव तैसी प्रीती । जैसी प्रीती तैसी प्राप्ती ।
जैसी प्राप्ती तैसी स्थिती । हाचि परमार्थी मुख्यार्थ ॥९४॥
ग्रंथी राखोनियां गुह्यार्थ । मुख्यत्वे दावावा परमार्थ ।
हाचि कवित्वाचा निजस्वार्थ । येणे रघुनाथ संतुष्ट ॥९५॥

बालकांडाचा उपसंहार :

संतुष्ट होती श्रोते । संतुष्ट होती वक्ते ।
संतुष्ट होती कथाकर्ते । श्रीरामचरित्र रामायणन ॥९६॥
कथा परिसतां रामायण । पूर्वज उद्धरती जाण ।
पूर्वजांचें नवलाव कोण । उद्धरे संपूर्ण त्रिजगती ॥९७॥
श्रीरामकथेची नव्हाळी । हे सदाशिवाची जपमाळी ।
मणिकर्णिका अंतकाळी । जपे कर्णमूळीं ते हे ब्रह्म ॥९८॥
सावधान करणे निजमना । तेचि मणिकर्णिका सत्य जाणा ।
आदरेम् परिसतां रामायणा । ते तारक पूर्ण परब्रह्म ॥९९॥
आदरे रामकथाश्रवण । ते तारक ब्रह्म रामायण ।
काशी मणिकर्णिका आपण । हात जोडून उभ्या तेथे ॥१००॥
यालागी रामकथेपासीं । तीर्थे तिष्ठती अहर्निशीं ।
चारी मुक्ति होती दासी । कथाउल्हासी परमानंद ॥१॥
कथा रामायणी अगाध । पदोपदीं परमानंदे ।
श्रवनें ओसंडे आनंद । निजात्मबोध श्रीरामे ॥२॥
रामायणाच्या निजकीर्ती । सुखें शिवादिक डुल्लती ।
तेणे पावन त्रिजगती । कथाश्रवणार्तीं श्रीराम संतोषे ॥३॥
यापरी अयोध्येप्रती । सीतेचे अनन्य प्रीती ।
वसता झाला रघुपती । जाली समाप्ती बाळकांडा ॥४॥
वश्य करोनि वैराग्य वितंड । साधिले ब्रह्मज्ञान अखंड ।
ऐक्या आणोनि पिंडब्रह्मांड । बाळकांड संपविले ॥५॥
साधिली शस्त्रास्त्रविद्या उदंड । गुरुयाग सिद्धी नेला प्रचंड ।
झाडोनि अहल्यापापखंड । बाळकांड संपविले ॥६॥
ताटिका सुबाहु केलीं दुखंड । राजे लाजवूनी उदंड ।
मारीचाचें ठेंचोनि तोंड । बाळकांड संपविले ॥७॥
भंगोनि शिवाचे कोदंड । सीता संशया देवोनि दंड ।
अहंरावनाचें काळे तोंड । करूनि बाळकांड संपविलें ॥८॥
परशुरामप्रताप प्रचम्ड । तो करोनि खंडविखंड ।
विष्णुचापाचें दमुनि बंड । बाळकांड संपविले ॥९॥
यापरी संपलें बाळकांड । पुढे रामप्रताप प्रचंड ।
राक्षस वधिजेतील वितंड । ते कांडे आंड अवधारा ॥११०॥
एकाजनार्दना शरण । कथा रम्य रामायण ।
जाले बाळकांड संपूर्ण । कृपा पूर्ण संतांची ॥११॥
संतकृपा परिपूर्ण । अगाध कृपा रामायण ।
ते मी वदावया अतिदीन । श्रीजनार्दन स्वये वदवी ॥१२॥
स्वये श्रीरामचि ग्रंथ कथिता । श्रीरामचि ग्रंथकर्ता ।
श्रीराम ग्रंथ लिहविता । वननीं वदविता श्रीराम ॥१३॥
एकाजनार्दना शरण । यापरी श्रीराम आपण ।
कथा करवी रामायण । केले संपूर्ण बालकांड ॥१४॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
श्रीरामजानकी अयोध्याप्रवेशो नाम सप्तविंशतितोमोध्यायं ॥२७॥
॥ ओंव्या ११४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग