॥ श्रीएकनाथमहाराजकृत
3.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय तिसरा ॥
॥ श्रीसद्गुरु रामचंद्राय नमः ॥
कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांच्याकडून प्रसाद भक्षण :
कैकेयी धरोनि पोटेसीं । कौसल्या संबोखी तियेसी ।
तू का व्यर्थ दुःखी होसी । आम्हा दोघींसी दुःख एक ॥१॥
एकोदरा सख्या बहिणी । दो दुस्सर पाटणी नांदती सख्या ॥२॥
दोघीं नाही नित्य भेटी । दोघी नाही नित्य गोष्टी ।
दोघीं नाही नित्य दृष्टी । मिथा चावटी सख्यत्वाची ॥३॥
दोघी नाही नित्य संबंध । दोघीं नाही नित्य संवाद ।
दोघीं नाही नित्य बोध । तो सख्यसंबंध अति मिथ्या ॥४॥
दोघीं नाही एक सुख । त्या सख्या मानिती मूर्ख ।
तू एक करिसी व्यर्थ दुःख । आम्हा निजसुख एकत्वे ॥५॥
आम्हा तुम्हा एक आहेवपण । आम्हा तुम्हा एक निजभूषण ।
आम्हा तुम्हा एक निजमंडन सख्यपण एकत्वे आम्हा तुम्हा ॥६॥
आम्हा तुम्हा एक सांगात । आम्हा तुम्हा एक भोगार्थ ।
आम्हा तुम्हा एक कांत । सख्य सख्यार्थ आम्हा तुम्हा ॥७॥
आम्हा तुम्हा एक नाहो । आम्हा तुम्हा एक सद्भावो ।
आम्हा तुम्हा एकात्मस्नेहो । सत्य साख्यान्वयो आम्हा तुम्हा ॥८॥
आम्हा तुम्हा एक निवासस्थान । आम्हा तुम्हा एक भोग भुवन
आम्ही एके सुखें संपन्न । सत्य सखेपण आम्हा तुम्हा ॥९॥
आम्हा नित्यत्वे चाळिता । आम्हा एक नित्यत्वें प्रतिपाळिता ।
आम्हा एक नित्यत्वें न्याहाळिता । हे नित्य सख्यता आम्हा तुम्हा ॥१०॥
आम्हा तुम्हा एक गोसावी । आम्हा तुम्हा एक निववी ।
आम्हा तुम्हा एक जीववी । हे सत्य पदवी सख्याची ॥११॥
आम्हा तुम्हा एक पांचभौतिक । एकचि हस्तपादादिक ।
आम्हा तुम्हा देखणे एक । हे अलोलिक निजसख्य ॥१२॥
आम्हा तुम्हा एक नाथ । सत्यत्वे जाण दशरथ ।
तू खेद करितेसी व्यर्थ । ऐक वृत्तांत साजणी ॥१३॥
पुढिलांचे देखोनि दुःख । सुख मानिता परम मूर्ख ।
परांचे निरसोनि असुख । द्यावे सुख शुद्धत्वें ॥१४॥
परदुःखें होय सुखी । तो ब्रह्मराक्षस तिही लोकी ।
सदा निंद्य शास्त्रमुखीं । शुद्ध सात्विकी तो नव्हे ॥१५॥
तू राहसी अपुत्रपणीं । आम्ही सुख पावों पुत्रपणीं ।
तै पूर्वज पडती पतनी । तो दोष त्रिभुवनी न समाये ॥१६॥
उपजला पुत्र देऊ जाता । तो पोसणा म्हणती तत्त्वता ।
साधू दोघींच्या निजस्वार्था । अवंचकता परमार्थ ॥१७॥
उदकस्य रसः चैत्यं अन्नस्य स्वादरो रसः ।
आनुकूल्यं रसः स्त्रीणां मित्रस्य अवंचको रसः ॥१॥
उदकाची गोडी शीतळता । अन्नाची गोडी आर्द्रता ।
स्त्रियांची गोडी अनुकूलता । अवंचकता मित्रगोडी ॥१८॥
आम्ही तुम्ही सख्या बहिणी । ऐसी बोलिजे कहाणी ।
ते करून दावावी करणी । येर बोलणी अति मिथ्या ॥१९॥
जैसे बोले तैसे करी । त्याते वंदिजे हरहरीं ।
येर ते व्यर्थ बोलाची ज्ञानफरारी । तो संसारी पढतमूर्ख ॥२०॥
जैसा बोले तैसा क्रियार्थ । या नांव मुख्य परमार्थ ।
येर बोलणें ते व्यर्थ । विषयस्वार्थ परमार्थी ॥२१॥
कौसल्या व सुमित्रा स्वतःच्या प्रसादातील अर्धा भाग कैकेयीला देतात :
माझे बोलणे सत्य सांग । माझ्या भागाचा अर्धभाग ।
साजणी गुएई वो सवेग । दोघींचे अभंग सख्यत्व येणे ॥२२॥
ऐकता कौसल्येचे वचन । कैकेयीस जाले समाधान ।
करूनि सुद्धाचमन । भागार्थ घे आपण स्वानंदे ॥२३॥
मृत पावे अमृतपान । तृषिता मुखी निज जीवन ।
अंधा उघडले लोचन । तैसे वचन कौसल्येचें ॥२४॥
रंका लाधले निधान । अकर्मी पावे ब्रह्मज्ञान ।
दुष्काळिया मिळे मिष्टान्न । तैसे वचन कौसल्येचें ॥२५॥
कौसल्येची बुद्धि समान । समत्वें भागविभाग आपण ।
कैकेयीसी दे विभागून । सुखसंपन्न समत्वें ॥२६॥
भाग देता कैकेयीसी । कौसल्या अति उल्हासी ।
सवतीभाव नाही मानसी । देत उल्हासीं निजभाग ॥२७॥
जैसी कौसल्येची विधी । तैसीच सुमित्रेची सद्बुगद्धी ।
बाप सत्संगाची सिद्धी । दे अर्धार्ध निजभाग ॥२८॥
सत्संगाचे निजमहिमान । कौसल्या देत आपणासमान ।
कौसल्येसंगें सुमित्रा जाण । दे आपण भागार्ध ॥२९॥
सुष्ठु मैत्री कौसल्येसीं । म्हणोनि सुमित्रा म्हणणे तियेसी ।
तेणे सुमित्रा भावेंसी । दे कैकेयीसी भागार्ध ॥३०॥
जैसा संग होय ज्यासी । तैसी बुद्धि होय त्यासी ।
कौसल्यासंगे सुमित्रा तैसी । दे कैकेयीसी भागार्ध ॥३१॥
ऋषींना आनंद :
ऐकोनि कौसल्येचा वचनार्थ । देखोनि भागदानींच नि स्वार्थ ।
वसिष्ठ आनंदें नाचत । स्वयेंडुल्लत स्वानंदे ॥३२॥
करिता भागप्राशन । उदरा आला रघुनंदन ।
धन्य अयोध्या-राजभुवन । तेथे स्वानंदघन क्रीडेल ॥३३॥
उभवोनी स्वानंदाची गुढी । नारदाची पडे उडी ।
नाचूं लागे आवडी । सूर्यवंशा गाढी दशा आली ॥३४॥
सुटेल देवांची बांधवडी । तुटेल नवग्रहांची बेडी ।
मुक्ति सुरवाडेल गाढी । सुख सुरवाडी पाल्हेजेल ॥३५॥
माझ्या वाल्मीकीचे वचन । जाले प्रत्यक्षप्रमाण ।
राम प्रगटला निजनिधान । धन्य जन अयोध्येचे ॥३६॥
लंकेपुडें युद्ध दारुण । राम करील रणकंदन ।
ते मी देखेन आपण । हरिखें उड्डाण करी नारद ॥३७॥
जेविव्याची चवी जेविता जाणे । तेवीं वसिष्ठनारदांचे नाचणें ।
ते सुख तिहींच भोगणें । येरी पाहणें टकमकां ॥३८॥
विभांडक आनंए मनी । कौसल्या सत्वशिरोमणी ।
इचेनि पावन जाली अवनी । धन्य त्रिभुवनी कौसल्या ॥३९॥
जृष्यशृंग तये वेळीं । सुखावला सुखकल्लोळीं ।
उड्डाण करोनि दे आर्ळी । कौसल्या भूतळीं आणील राम ॥४०॥
कौसल्येचा शुद्ध भावो । ते भावीं प्रकटला रामरावों ।
धन्य दशरथ महाबाहों । गर्भान्वयो अलोलिक ॥४१॥
विस्मय करिती ऋषीश्वर । तटस्थठेले सुरवर ।
अवघे करिती जयजयकार । भागिला रघुवीर चतुर्थ भागीं ॥४२॥
मुख्य द्वेष सवतीमत्सरासी । तो मत्सर नाही कौसल्येसी।
म्हणोनि श्रीराम आला कुसी । त्या गर्भासी अवधारा ॥४३॥
सवती मत्सर कैकेयीसी । म्हणोनि हारविलें निजभागासी ।
शुद्ध भाव कौसल्येसी । तिच्या गर्भासी श्रीराम ॥४४॥
एक ताट आले जञशेषी । तेथेचि गर्भ निश्चयेसी ।
तो विभागला चतुर्थ भागेंसी । चतुर्विध त्यासी बोलिजे ॥४५॥
मुख्यार्थ कौसल्येपासी । तद्भंजनार्ध जाणा सुमित्रेसी ।
दोनी अर्धार्ध कैकेयीसी । स्वतंत्र भाग तिसी असेचिना ॥४६॥
पुढा पोटी होती पुत्र । ते तिचे नव्हती स्वतंत्र ।
यालागी बोलिजे परतंत्र । कैकेयीचरित्र नावडे त्यांसीं ॥४७॥
असो पुढील कथेसी । वसिष्ठे पाचारोनि तिघींसी ।
देवोनि भाग विभागासी । म्हणे विलंबासी करू नये ॥४८॥
कैकेयीचा उद्वेग व याचे परिणाम :
दोघीं निजभागप्राशन । केले न लगतां दर्शन ।
कैकेयी भागप्राशन । करिता उद्विग्न ते जाली ॥४९॥
दोनी अर्ध जंव घोंटी । तंव ते बैसले कंठी ।
गिळू जाता अति संकष्टीं । गोंटितां घोटी गोंटेना ॥५०॥
भाग तिचे नव्हते स्वतंत्र । परभाग गिळू न शके वक्त्र ।
पांढरे जाले तिचे नेत्र । वमनोद्गार ते जाली ॥५१॥
पराचें ओझे वाहणें । ते आपणासी होय उबगवाणें ।
तेवीं परभाग घोंटिता तिणें । जीवे प्राणें घोंटेना ॥५२॥
विभागें रोधली तिची घांटी । ऐसे वसिष्ठे देखिली दृष्टी ।
मंत्रोदक देऊन उठाउठी । तेणे घोटी विभाग ॥५३॥
सेविता ते मंत्रोदक । फिटली शंका पावली सुख ।
पुत्रगर्भाचा संतोष । आत्यंतिक ते पावे ॥५४॥
साधु सतां निजनिकट । भलतें निवारे संकट ।
गर्भमंडित जाले पोट । सुख उद्भ ट कैकेयीसी ॥५५॥
हरपले सांपडे रत्न । मरत्या घडे अमृतपान ।
तेवीं वसिष्ठोदकें जाण । सुख परम कैएयीसी ॥५६॥
सत्संगमहिमा :
यालागी सत्संगती । दुःख नव्हे ना अधोगती ।
सत्संगाची परम ख्याती । नेणो किती उद्धरले ॥५७॥
सत्संगेन हि दैतेया यातुधानाः खगा मृगाः ।
गंधर्वा राक्षसा नागां सिद्धचारणगुह्यकाः ॥२॥
दैत्यदानव राक्षसृष्टी । गण गंधर्व मृग पक्षी पुष्टी ।
सिद्ध चारण गुह्यक कोटी । उद्धरले सृष्टी सत्संगें ॥५८॥
मनुष्यलोकींची गोष्टी । सत्संग लाधल्यापाठीं ।
उद्धरले कोट्यनुकोटी । सभाग्य सृष्टी सत्संगें ॥५९॥
धन्य धन्य तो दशरथ । ज्यासी सत्संग पुरोहित ।
त्याची काठी मानी आदित्य । तो घरांत निजसखा ॥६०॥
तेणे विसिष्ठें आपण । तिघींस करविलें पिंडप्राशन ।
एका विनवी जनार्दन । गर्भावधारण अवधारा ॥६१॥
स्वस्ति श्री भावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
पिंडप्राशनं नाम तृतीयोधायः ॥
॥ श्लोक २ ॥ ओंव्या ६२ ॥ एवं ६४ ॥
