(फुगड्या)
3680.
(फुगड्या)
फुगडी फू फुगडी घालिता उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥१॥
फुगडी गे अवघे मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥धृपद॥
मागे जे शिकलीस होतीस पोटी । तेचि विचारूनि आता उच्चारी ओठी ॥२॥
त्रिगुणाची वेणी तुझे उडते पाठी । सावरूनि धरी घाली मूळबंदी गाठी ॥३॥
आगळे पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥४॥
तुका म्हणे तुजमजमध्ये एक भाव । सम तुके बार घेऊ पावो उंच ठाव ॥५॥
अर्थ :
संसाराची फुगड़ी खेळतांना (प्रपंचिक क्रिया) मोकळी, मुक्त रहा. सर्व लाज सोडून एकातत एकालाच पहा. अगं, सर्व संसाराची फुगड़ी 'फु' करून मोडून टाक. तू जर संसार तोडुन टाकला तर खेळात खरी गोडी आहे. मातेच्या पोटात असताना जे काही शिकलिस, ते आठव, त्याचा उच्चार कर. तुझ्या पाठीवर त्रिगुणवृत्तिचि वेणी उडत आहे. तिला सावरुन धर. मुळबंधाजवळ तिची गाठ बांध. पुढे पाउल टाकत एक- एक भूमिका जींकुन घे, म्हणजे तेथे तुला मान मिळेल. तिन्ही लिकांत तुला मान मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या-माझ्यात एकच भाव आहे, अशा सम स्तितिमध्ये आपण उच्च स्थनी पोहचु.
