धरावा तो बरा । ठाव व
2615.
धरावा तो बरा । ठाव वसतीचा थारा ॥१॥
निजलिया जागविती । निज पुरवूनि देती ॥धृपद॥
एक वेवसाव । त्यांचा संग त्याचा जीव ॥२॥
हिते कळे हित । ग्वाही एक एका चित्त ॥३॥
विषमाचे काही । आड तया एक नाही ॥४॥
तुका म्हणे बरी । घरा येतील त्या परी ॥५॥
अर्थ :
जेथे संतांचे राहण्याचे ठिकाण आहे तेथेच आपण ठाव धरावा हेच चांगले आहे. मग संत जे अज्ञानामुळे झोपी गेले आहेत त्यांना जागवतात आणि हरीच्या नीजस्वरुपाची प्राप्ती करुन देतात. संतांचा व आपला एकच व्यवसाय पाहिजे संतांची संगती आणि आपला जीव एकच झाला पाहिजे. संतांची संगती केली की त्यांच्या हितातच आपले हित आहे म्हणजेच त्यांनी सांगितलेले साधन हिताचेच आहे व ते केल्याने आपले हितच होते हे असे कळून येते आणि हे समजून आले की त्याविषयी संत आणि आपले चित्तच हे एकमेकाला साक्ष असतात. संत आणि आपल्यामध्ये भेद केव्हाही आडवा येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, जी युक्ती केल्याने संत आपल्या घरी येतात ती युक्ती बरी आहे.
