वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ३. अरण्यकाण्ड - अध्याय २३ › ६. दिव्य आयुधांचा स्वीकार

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088086 · अभंग क्र. ६

6.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय सहावा ॥
कश्यपवंशवर्णन व अमृतहरणासाठी गरुडाचे प्रयाण

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अथ पंचवटीं गच्छन्नंतरा रघुनंदनः ।
आससाद महाकायं गृघ्नं भीमपराक्रमम् ॥१॥
तं दृष्टावा तौ महाभागौ वनस्थौ रामलक्ष्मणौ ।
मेनाते राक्षसं गृघ्नं ब्रुवाणौ को भवनिति ॥२॥
ततो मधुरया वाचा सौम्यया प्रीणयन्निव ।
उवाच वत्स मां विद्धि वयस्यं पितुरात्मनः ॥३॥

पंचवटीत संगमावर आश्रमयोजना :

पंचवटीं परम प्रयाण । श्रीराम सीता सह्लक्ष्मण ।
अगस्तीसी करोनि नमन । शीघ्र गमन तिही केले ॥१॥
रम्य रमणीय गंगातटी । पंचक्रोश पंचवटीं ।
उल्हास तिघांच्याही पोटी । उठाउठी निघालीं ॥२॥
अरुणावारुणासंगमप्राप्ती । मीनली प्राची सरस्वती ।
तीर्थ पावन त्रिजगती । आवडे वस्ती श्रीरमा ॥३॥
सुंदर आणि कपाळेश्वर । दोही तीरीं मनोहर ।
तीर्थे पावन परिकर । श्रीरामचंद्ररहिवास ॥४॥
पद्मपुरीं निशाचर । वसताती अति दुर्धर ।
तेणे भये ओस नगर । तीर्थपरिचार खुंटला ॥५॥
त्रिशिरा आणि खर दुषण । ओस करोनिया जनस्थान ।
राक्षस वसताती दुर्जन । तीर्था कोणी जाऊ न शके ॥६॥
तेथे करावया वस्ती । पंचवटिके सीतापती ।
स्वये धाडिला अगस्तीं । राक्षसघातकी श्रीराम ॥७॥
राक्षसांचे कुळनिर्दळण । समूळ करील रघुनंदन ।
यालागी पंचवटीस्थान । दिधले नेंमून अगस्तीनें ॥८॥

जटायूचे दर्शन व वृत्तांत समजला :

पंचवटीनंतर । श्रीराम चालिला सत्वर ।
पुढे जटायु गृध्र पर्वताकार । देखिला समोर श्रीरामे ॥९॥
डोळे आरक्त धगधगित । चांदुवडे समसमित ।
हा तंव राक्षस असे अदभुत । दोही निश्चित मानिला ॥१०॥
धनुष्य सज्जोनि मुष्टी । दोगे चालिले जगजेठी ।
रामे हाकिला शौर्यदृष्टी । बाण मुष्टी ओढी सज्जोनी ॥११॥
राहे साहें धरी धीर । गृध्ररुपिया तू निशाचर ।
मार्ग रोधिसी अति दुर्धर । बाणी सत्वर छेदीन ॥१२॥
माझे सुटलिया कुर्‍हाडे । तुझे पक्षबळ बापुडे ।
केउता पळसील मजपुढे । रणी रोकडें पाडीन ॥१३॥
गृध्ररुपी तू येथे कोण । मार्ग रोधावया काय कारण ।
समूळ सांगावे निजकथ्न । प्राण घेईन बोलता ॥१४॥
मी दाशरथी श्रीरघुनंदन । सीता कांता बंधु लक्ष्मण ।
पंचवटिके करितो गमन । मार्गरोधन का केले ॥१५॥
ऐकोनि श्रीरामाचे वचन । जटायु घाली लोटांगण ।
दाशरथी रघुनंदन । तुझे महिमान मी जाणे ॥१६॥
तुझे घ्यावया दर्शन । पंचवटिके वनसेवन ।
करु येईल रघुनंदन । बहुकाळ जाण मी तिष्ठत ॥१७॥
तुझा पिता जाण दशरथ । युद्धसखा माझा आप्त ।
स्वर्गा गेला इंद्रसाह्यार्थ । नमुचिघात जे केला ॥१८॥
मी आकाशी झडपोनि जाण । दैत्यांचे उडविलें शिरस्त्राण ।
दशरथें विंधोनिया बाण । दैत्य दारुण निर्दळिले ॥१९॥
त्याचा तू तंव ज्येष्ठ सुत । पूर्णब्रह्म श्रीरघुनाथ ।
तुझी सेवा करावया येथ । आलो निश्चित श्रीरामा ॥२०॥

कश्यपवंशोत्पत्ती :

तू स्वामी मी तुझा दास । दृढ मानावा विश्वास ।
मज न म्हणावें राक्षस । माझा वंश कश्यपी ॥२१॥
काश्यपवंशीं माझी उत्पत्ति । त्या कश्यपाची वंशस्थिती ।
मी सांगेन श्रीरघुपति । विश्वासार्थी माझिया ॥२२॥
तू मज म्हणसी राक्षस । मी राक्षस नव्हे गा कश्यपवंश ।
माझी वंशावळी बहुवस । सावकाश अवधारी ॥२३॥
मनूपासाव उत्पत्ति जाण । क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण ।
वरकड सृष्टि कश्यपी जाण । तेंही लक्षण ऐके तू ॥२४॥
अदितीपासाव झाले देव । दितीचे दैत्य दनूचे दानव ।
मनूपासूनि झाले मानव । मानवी वैभव मनूचें ॥२५॥
स्वसेपासाव रुद्रोत्पत्ती । जे का रुद्रगण रुद्रानुवर्ती ।
भद्रेपासव गंधर्व जन्मती । जे गायन गाती अति मधुर ॥२६॥
उभयसंध्यामैथुनस्थितीं । येथ राक्षसा जन्मप्राप्ती ।
यालागी संध्येपासव उत्पत्ती । ज्ञाते बोलती राक्षसांची ॥२७॥
जे वेदशास्त्री अति व्युत्पत्ती । वादी ब्राह्मण निर्भर्त्सिती ।
ते ब्राह्मणद्वेषी ब्रह्मराक्ष होती । जाण निश्चिती श्रीरामा ॥२८॥
रावणा ब्रह्मराक्षसपण । व्हावया हेंचि कारण ।
तेणे शतसहस्र वेद विभागून । ऋषि सज्जन निभर्त्सिले॥२९॥
ज्ञानगर्वाची अति गती । ब्रह्मद्वेषाच्या अति युक्ती ।
ब्रह्मराक्षसत्वाची प्राप्ती । जाण निश्चिती श्रीरामा ॥३०॥
क्रोधवशेपासाव देख । सिंधब्याघ्रवराहादिक ।
मृग ससे वृक जंबुक । गौरादि अनेक श्वापदें जालीं ॥३१॥
वारणीपासाव उत्पत्ती । जन्म पावला ऐरावती ।
गजदिग्गजांची प्रसूती । जाण निश्चिती तिचेनि ॥३२॥
शरमेचें ज्येष्ठ सुत । श्याम शबल यमाचे दूत ।
श्वानमार्जारादि समस्त । तिचेनि होत श्रीरामा ॥३३॥
वृतेपासाव बहुवस । विद्याधर किन्नर किंपुरुष ।
तरस्वी दुर्धर असोस । बळे गहिस गरिष्ठ ॥३४॥
जागळेपासाव जाण । वने उपवनें कंतकी विपिन ।
विरुंध वल्ली औषधी तृण । दुर्धर वन ते व्याली ॥३५॥
उत्पत्ति सुरभीपासोन । तेथे जन्मली कामधेन ।
गाई बैल आदिकरोन । उत्पत्तिस्थान पशूंचें ॥३६॥
वडवेपासाव अश्वसंभूती । उच्चैःश्रवा स्वर्गसंपत्ती ।
श्यामकर्णादि नाना जाती । अश्वोपत्ति तिचेनि ॥३७॥
तिचे ठायी दुर्धर । भारवाहक खरोष्ट्र ।
जन्म पावले अपार । वेसर खराश्वयोगे ॥३८॥
गृध्री श्येन धृतराष्ट्री । शुकी कौंची ऐशा पंच नारी ।
पक्षी जन्मले यांच्या उदरी । मत्स्यादि मगरी जळचरें ॥३९॥
गृध्रीपासाव गीध घार । उलूक वाघुळा अपार ।
गंडभैरवादि दुर्धर । अति क्रूर प्रसवली ॥४०॥
श्येनीपासाव जन्मले देख । श्येन तित्तिर लावक ।
कपोता कोकिळ कुक्कुट काक । सरड बेडूक जन्मले ॥४१॥
जन्मला कौंचीच्या उदरी । ढोंक टिटवी कांकणघारी ।
भोरड्या जन्मलिया घुमरी । अहोरात्री किळकिळती ॥४२॥
शक्रीपासाव शुक सारिका । चाप भारद्वाज मयूर देखा ।
चिड्या काळचिड्या अनेका । पिंगळा बोलला भविष्योत्तरीं ॥४३॥
धृतराष्टीचे पुत्र चोख । हंस बक कारंडक ।
चकोर आणि चक्रवाक । मत्स्यादि अनेक जळचरे व्याली ॥४४॥
कद्रू पासाव अनेक । काळ कर्कोट्क भुजंग ।
शेष वासुकि नाना नाग । पाताळपन्नग ते व्याली ॥४५॥
कश्यपापासाव नर किन्नर । कश्यपापासाव चराचर ।
सृष्टि समग्र कश्यपी ॥४६॥
अंडज स्वेद् जरायुज । जे का जन्मले उद्भिज्ज ।
ते हे कश्यपाचें निजबीज । दुर्धर तेज कश्यपीं ॥४७॥
जळचर भूचर खेचर । जे जे भासे चराचर ।
ते ते कश्यपी चरित्र । परम पवित्र श्रीरामा ॥४८॥
ज्यांचे नाठवे कुळगोत्र । त्यां कश्यपांत लावित ।
ते तत्काळ होती पुनित । जगी विख्यात कश्यप ॥४९॥
जो कश्यपीं लागला । तो मुक्तीच्या घरासी आला ।
भुक्तिमुक्तींचा दादुला । वाखाणिला कश्यप ॥५०॥
सृष्टीचा कर्ता सृष्टीचा हर्ता । येव्हढी कश्यपाची सत्ता ।
यालागी भुक्तिमुक्तींचा दाता । जाण तत्वता कश्यप ॥५१॥
कश्यपी सृष्टी वर्णीं । ऐसा वक्ता नाही कोणी ।
मी बोलिलो संकळोनी । क्षमा सज्जनीं करावी ॥५२॥

जटायू हा कश्यपाचा नातू :

त्या कश्यपाचा मी नातू । जतायुनामे विख्यातू ।
ऐक माझा वृत्तांतू । समूळ साद्यंतू सांगेन ॥५३॥
कश्यपासी बहुत पत्‍नी । मुख्य अदिती दिती दनी ।
चौथी माझ्या पित्याची जननी । विनतानम्नी पतिव्रता ॥५४॥

कश्यपाची भार्या विनता, तिचे मुलगे अरुण व गरुड व अरुणाचे दोन पुत्र जटायू व संपाती :

विनतेचे दोघे कुमर । अरुण आणि गरुड सुपुत्र ।
भगवद्भजनीं अति पवित्र । त्यांचे चरित्र अवधारी ॥५५॥
अरुण रविरथीं सावधान । गरुड श्रीविष्णूचें वाहन ।
गरुडाची ख्याति अति गहन । अमृत हिरोन आणिता ॥५६॥
गरुडे जाणोनि आपण । का केले अमृतहरण ।
ऐसे पुसतां श्रीरघुनंदन । समूळ कथन जटायु वदे ॥५७॥

अमृतहरणाची पूर्वकथा, विनता व कद्रूमध्ये पैज :

विनता कद्रु दोगी सवती । सवतीमत्सराच्या छळणोक्ती ।
कद्रु पुसे विनतेप्रती । सूर्याचे रथी वारु कैसे ॥५८॥
विनता म्हणे वारु धवळ । कद्रु म्हणे वारु सुनीळ ।
बोलता वाढलें सळ । पैजेचा प्रबळ पण केला ॥५९॥
कद्रु म्ह्णे श्वेत पारु जरी । तरी घडा घेवोनिया शिरी ।
दिव्य सहस्त्र वर्षेंवरी । पाणी तुझ्या घरी वाहीन ॥६०॥
विनता बोले तये काळी । जै वारुवांची प्रभा निळी ।
तै मी घेवोनि घागरी चुंबळी । दिव्याब्दमेळीं जळदासी तुझी ॥६१॥
दोघींचें परम प्रमाण । भाषाबंधें केला पण ।
कद्रुनें करावया छळण । कपट संपूर्ण मांडिलें ॥६२॥

कद्रूसाठी सूर्याच्या घोड्यांचा रंग विषप्रयोगाने निराळा करणे :

अरुणें सांगितले विनतेसी । श्वेत वारु सूर्यरथासी ।
त्याचा अति विश्वास तिसी । विकल्प मानसी असेना ॥६३॥
कद्रु सर्पांतें पुसे । सूर्यरथी वारु कैसे ।
ते सांगती शुभ्र वेषे । मग कद्रु मानसें अति दुःखी ॥६४॥
पुत्रांसी सांगे पणाची थोरी । दिव्य सहस्र वर्षेंवरी ।
मी दासी जाले विनतेघरीं । जळपरिचारी जळदासी ॥६५॥
नकळता निजनिर्धारु । त्वा का नेमिलें निळे वारु ।
करिता सवतीमत्सरु । मत्सरें दुस्तरु भोग आला ॥६६॥
विनता सती पतिव्रता । तू का मत्सरु करिसी वृथा ।
मत्सरें दासीत्व बैसलें माथा । त्यासी काय आता चालेल ॥६७॥
न करा मातेचा कैवार । पुत्र जन्मलेति तुम्ही पाथर ।
अवघे झोंबोनि विखार । निळे सत्वर करा वारु ॥६८॥
सर्प म्हणती करिता कपट । होईल अवघियांचे तळपट ।
वंश होईल सपाट । करिता कपट भलें नव्हे ॥६९॥
ऐकोनि पुत्रांचे वचन । कद्रु झाली कोपायमान ।
मग शाप दिधला दारुण । अग्निदहनें भस्म व्हाल पै ॥७०॥
तंव सर्प झोंबोनि सकळ । विषें वारु केले सुनीळ ।
मग मातेसी सांगती उतावेळ । दावी तू तत्काळ विनतेसी ॥७१॥
विलंब करिता या कार्यासी । सूर्य शोषील या विषासी ।
मग दाविल्या विनतेसी । जयो आहांसी पै न ये ॥७२॥
कापट्याच्या कृतकार्यासी । तत्काळ साधावें वेगेंसीं ।
विलंब करिता कपटासी । जयो आम्हांसी पै नाही ॥७३॥

कपटाचा उपयोग केल्यामुळे विनता पण हरते :

पुत्रवचनें उतावेळ । कद्रु विनता आणी तत्काळ ।
सूर्यरथींचे वारु सुनीळ । देख समूळ नीळवर्ण ॥७४॥
कद्रु म्हणे विनतेसी । म्या जिंतलें निजपैजेसी ।
तू जालीस माझी दासी । अति उल्लासीं आली घरा ॥७५॥
आल्हाद देखोनि मातेसी । सर्प मागती उःशापासी ।
कद्रु हरिखली मानसी । उःशापासी स्वये वदे ॥७६॥
कन्या जरत्कारीचे उदरी । जरत्कारवीर्येकरीं ।
आस्तीक जन्मेल ब्रह्मचारी । तो शापजोहरीं रक्षील ॥७७॥

कद्रूचा शाप व उःशाप :

दुर्धरशापाग्नीआंत । सर्प जळता समस्त ।
आस्तीक पावोनिया तेथ । देह दहनांत रक्षील ॥७८॥
मातृपक्षाचें कुळ सकळ । शापाग्नींत जळतां मातुळ ।
आस्तीक रक्षील तत्काळ । तपोबळप्रतापें ॥७९॥
उःशापें तुष्टली माता । तेणे आल्हाद सर्पा समस्ता ।
कद्रूसी परम चिंता । सुख सर्वथा असेना ॥८०॥

कद्रू सचिंत :

कपटे जिंतिली विनता । कपट करील पुत्रघाता ।
ते कद्रूसी दुस्तर चिंता । सुख सर्वथा असेना ॥८१॥
जरी कपटे जय पावला कपटी । तरी धाके धुकधुकी पोटी ।
कपटघातकी शेवटी । कपटें कपटी अति दुःखी ॥८२॥
निजकपटाची अति चिंता । बैसली कद्रूचिया माथा ।
पुढे विनतेची कथा । बंधमोचनता अवधारा ॥८३॥
विनता पुसे अरुणाप्रती । श्वेत वारु सूर्याचे रथी ।
त्वा का सांगितले मज निश्चिती । नीळप्रतीति मज आली ॥८४॥
नीळिमा चढला आश्वांसी । तेणे मी जाले कद्रूची दासी ।
घडा घेवोनिया शिसी । अहर्निशी जळ वाही ॥८५॥
तंव अरुण म्हणे सर्पी देख । चढवोनियां निजविष ।
निळे वारु केले निःशंक । परी कपटें दुःख पावती ॥८६॥

सूर्यकोपामुळे सर्पाचे पक्ष व पादच्छेदन :

सुनीळ देखोनि वारुसी । कोप आला सूर्यासी ।
मग उपटोनि सर्पांच्या पंखासी । आणि पायांसी निवटिले ॥८७॥
पूर्वी पक्ष होते सर्पांसी । गोमीच्या ऐसे पाय त्यांसी ।
सूर्य कोपोनि मानसी । पक्षपायांसी छेदिले ॥८८॥

उगर व श्यामकर्ण :

पाय निवटिल्या मग । उरें चलों लागले नाग ।
यालागी त्यासी उरग । हा दुःखभोग कपटाचा ॥८९॥
सूर्ये शापिलें सर्पांसी । उदरी धरिले कपटासी ।
तोचि उदरशूळ तुम्हांसी । अहर्निशी भोगाल ॥९०॥
मुकले पक्षां आणि पायांसी । उदरी शूळ अहर्निशी ।
कपटाची दशा ऐसी । कपटापासीं अति दुःख ॥९१॥
इतुके जाले उठाउठी । तरी कपट न सोडी पाठी ।
आगी घालील शेवटी । कपतें कपटी अति दुःखी ॥९२॥
सूर्य अश्वविष आकशून । कर्णी राखिलें निर्विष करुन ।
तेणे जाले शोभायमान । श्यामकर्ण जगद्वंद्य ॥९३॥
तैंपासोनियां जाण । वारु जाले श्यामकर्ण ।
जगी यागीं अति पावन । शोभायमान तिही लोकी ॥९४॥
अरुण सांगे मातेप्रती । मजअधीन सूर्याची गती ।
मी जेवोनियां बैसेन रथी । बंधनिर्मुक्ती गरुडाधीन ॥९५॥
आकळावया त्रिजगती । गरुडापासीं सामर्थ्यशक्ती ।
त्यांचे अंगी सहिष्णुता शांती । बंधनिर्मुक्ती तो करील ॥९६॥
सूर्याची आज्ञा मज तत्वता । उदयीं वंदावीं मातापिता ।
म्हणोनि आलो मी वंदनार्था । जाईन मागुती रथगती ॥९७॥
बंधमोचन गरुडाहातीं । बुद्धि सांगोन मातेप्रती ।
अरुण बैसला सूर्यरथीं । मातृभक्ति गरुडा गाढी ॥९८॥
विनता सांगे गरुडापासीं । कपटें जिंतोनि पैजेसीं ।
कद्रुनें मज केले दासी । सहस्त्र वर्षी जळ वाही जळ वाही ॥९९॥
अरुणें सांगितले मजप्रती । बंधमोचन गरुडाहातीं ।
तरी करिसील कैसी युक्ती । ते यथार्थ गती मज सांगे ॥१००॥
तेव्हा गरुड क्षोभला उद्भट । तुज जिंतिले करोनि कपट ।
कपटें कपटियाचें तळपट । करीन सपाट सर्पाचें ॥१॥
मातेसी द्यावया समाान । कोप केला उपशमन ।
वंदोनि मातेचे चरण । काय वचन बोलत ॥२॥

सुटका करण्यासाठी कद्रूकडून अमृताची मागणी :

तुझ्या बंधमोचनासी । पालत पुसे तू कद्रूसी ।
जरी मागेल उत्तम पदार्थासी । तरी मी आणून तिसी देईन ॥३॥
मातृबंधमोचनार्थ । अति दुर्लभ मागेल अर्थ ।
तो तो देईन पदार्थ । मोचनार्थ पुसें वेगी ॥४॥
मग विनता सांगे स्वये कद्रूसी । गरुडे पाठविले तुजपासी ।
पालट बंधमोचनासी । जे मागसी ते देईन ॥५॥
निजमातेच्या बंधमोचनीं । कल्पतरु चिंतामणी ।
देईन कामधेनु आणोनी । आवडे मनी ते मागे ॥६॥
मग कद्रु विचारी चित्ती । परम सामर्थ्य गरुडापतिही ।
अति उद्भट याची शक्ती । अमृतप्राप्ती त्या मागूं ॥७॥
माझेनि माझ्या पुत्रां शापबंधन । तिही केलिया अमृतपान ।
मग न बाधी जरा जन्ममरण । निर्धारोन तेंचिं मागूं ॥८॥
कद्रु सांगे विनतेपासीं । निश्चये पुसावे गरुडासी ।
परमामृत देवविसी । तै तू होसी बंधमुक्त ॥९॥
माझे पुत्र पाताळवासी । अखंड राखण अमृतासी ।
तरी प्राप्ति नाही त्यांसी । ते तू देसी तै मुक्त ॥१०॥

पाच प्रकारचे अमृत :

स्वादामृत उन्मादामृत । सुप्तामृत तृप्तामृत ।
ये अमृतें प्रलोभार्थ । परमामृत पांचवें ॥११॥
स्वादामृत अप्सरांसी । तेणे त्या स्वादिष्ठ सर्वांसी ।
तृत्प्यमृत ते देवांसी । क्षुधा त्यांसी बाधेना ॥१२॥
उन्मादामृत दैत्यांसी । तेणे ते उन्मत्त अहर्निशी ।
सुष्त्प्यामृत ते दिग्गजांसी । तेणे सुखेंसी डुल्लत ॥१३॥
डुकल्या येती निद्रिस्थांसी । तेंवी डुल्लणें दिग्गजांसी ।
ये तंव अमृतें वायसी । देवे सर्वांसी चाळविले ॥१४॥
समुद्र मंथिला समस्ती । जाली अमृताची प्राप्ती ।
कललो करिता देवीं दैत्यीं । मोहिनीहातीं दीधलें ॥१५॥
मोहिनीरुपे श्रीविष्णू जाण । तेणे अमृत विभागून ।
इतरां अमृत वाढोन । राखिलें आपण परमामृत ॥१६॥
जेणे चुके जरा मरण । ते परमामृत विष्णुअधीन ।
ते जै देसील आणून । बंधमोचन तै तुज ॥१७॥
ऐकोनि कद्रुची कथा । गरुडापासीं आली विनता ।
आणोनि द्यावे परमामृत । बंधमोचनता तै मज ॥१८॥

अमृतहरणासाठी गरुडाचे प्रयाण, कश्यपांचा शुभाशीर्वाद :

परिसोनि मातेचे वचन । तिचे करावया बंधमोचन ।
वंदोनि मातेचे चरण । अमृतार्थी आपण उडों पाहे ॥१९॥
तंव कृपा उपजली मातेसी । मग हाती धरिले गरुडासी ।
आणिलासें कश्यपापासीं । वृत्तांत त्यासी सांगितला ॥१२०॥
मातृभक्ति गरुडासी । देखोनि सुख कश्यपासी ।
कृपें अभिषेकून त्यासी । धरी पोटी स्वानंदे ॥२१॥
हरिखें वर देत त्यासी । प्रतपें पावसी परमामृतासी ।
युद्धी विष्णुभक्त होसी । मुक्त करिसी निजमाता ॥२२॥
परमामृत विष्णूआधीन । त्याचे करावे नामस्मरण ।
नामापासी विजय पूर्ण । निश्चये जाण हरिभक्ता ॥२३॥
अच्युतनामाच्या आवृत्ती । तया प्रळयीं नव्हे च्युती ।
अच्युतपदाची निजप्राप्ती । युद्धसामर्थ्यी पावसी ॥२४॥
ऐसी कश्यपे परम कृपा करुनी । अच्युतनाम उपदेशूनी ।
गरुड धाडिला अमृतहरणीं । नामस्मरणीं निजविजयो ॥२५॥
मातापित्यासीं करोनि नमन । तीर्थ घेतलें प्रार्थून ।
हरिनामीं नित्य सावधान । क्रमावया गगन आल्हाद ॥२६॥
नकुळा दासी विनतेघरीं । नकुळ जन्मला तिचे उदरी ।
तो गरुडासी साहाकारी । होऊनि सर्पारि चालिला ॥२७॥
आरंभूनि त्या दिवसासी । वर सर्पामुंगसांसीं ।
भेटी होता येरयेरासी । निजप्राणांसी सर्प सांडी ॥२८॥
मुखीं नामाची आवृत्ती । गरुड निघाला अमृतार्थीं ।
कश्यपउपदेशाची युक्ती । विष्णुप्राप्ती संग्रामी ॥२९॥
एकाजनार्दना शरण । करिता श्रीरामनामस्मरण ।
भगवत्प्राप्ति अलोट ज्ञान । हे महिमान नामाचे ॥१३०॥
नामापासी भक्तिमुक्ति । नामापासीं यश कीर्ति ।
नामापासीं विजयप्राप्ति । कर्मनिर्मुक्ति हरिनामें ॥३१॥
नामापासीं नित्य निवृत्ती । नामापासीं नित्य शांती ।
नाम वंदिजे सर्वांग मतीं । ब्रह्मप्राप्ति हरिनामें ॥३२॥
एकाजनार्दना शरण । नामे पातकी परम पावन ।
नामे प्रपंच ब्रह्मपूर्ण । नाम ते जाण परब्रह्म ॥३३॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणें अरण्यकांडे एकाकारटीकायां
कश्यपवंशवर्णनगरुडपरमामृताभिगमनं नामा षष्ठोऽध्यायः ॥६॥
॥ ओंव्या १३३ ॥ श्लोक ३ ॥ एवं १३६ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग