वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ३. अरण्यकाण्ड - अध्याय २३ › १०. खर-दूषण यांची तयारी

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088085 · अभंग क्र. १०

10.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय दहावा ॥
दूषण राक्षसाचा वध

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

युद्धार्थी चालिला खर । देखोनि उभा श्रीरघुवीर ।
अवघे खवळले निशाचर । शस्त्रसंभार सुटले ॥१॥

ततस्ते कूरकर्माणं क्रुद्धाः सर्वे निशाचराः ।
रामं नानाविधैःशस्त्रैरभ्यवर्षन्त दुर्जयम् ॥१॥

श्रीरामांचे युद्धकौशल्य :

श्रीराम रणरंगधीर । क्रूरकर्मी निशाचर ।
मोळोनि समग्र सैन्यसंभार । शस्त्रे अपार वर्षले ॥२॥
गदा मुग्दल तोमर त्रिशूळ । परशु पट्टिश महाशूळ ।
कातिया कुर्‍हाडी परिघ मुसळ । लहुडी स्थूळ महाघात ॥३॥
खड्ग हाणिती खणखणां । बाण सुटती सणसणा ।
वोडणें वाजती दणदणां । लागली निशाणां एक घाई ॥४॥
श्रीराम एकाकी एकला । गेला तुटला निवटला ।
शस्त्रसंपाती आटला । म्हणती निमाला निःशेष ॥५॥
एक म्हणती खडविखंड । एक म्हणती नवखंड ।
एक म्हणती शतखंड । शस्त्री उदंड दंडिला ॥६॥
महावीरांचा घडघडाट । आणि शस्त्रांचा कडकडाट ।
नाही पळावयालागी वाट । झाला सपाट श्रीराम ॥७॥
रुधिर प्राशावया अति प्रीती । शूर्पणखा येथे आली होती ।
तिच्या तोंडी पडली माती । अशद्ध क्षिती आटले ॥८॥
श्रीराम निमाला निःशेष । वृथा घाय हाणिती राक्षस ।
रणकाविरें लागले त्यांस । ऐसे बहुवस जल्पती ॥९॥
जेंवी पर्जन्याच्या धारा । झांकोळती गिरिवरा ।
तेंवी झांकिलें श्रीरामचंद्रा । शस्त्रसंभारीं राक्षसी ॥१०॥
श्रीराम चित्पर्वत अमोघ । राक्षसमंडळी महामेघ ।
शस्त्रधारांनीं झाकोळलें सर्वांग । लौकिकी सांग दिसेना ॥११॥
श्रीराम चिदादित्य तेज गाढे । राक्षससेना ते महामेहुडें ।
झांकोळला चहूंकडे । ते यश मूढें मिरविती ॥१२॥
जेंवी हृदयी आत्मा गुप्त । की अभ्रांमाजी भास्वत ।
तेवी शस्त्रांमाजी श्रीरघुनाथ । सावचित्त धनुष्येसीं ॥१३॥
झांकोळिल्या अभ्रघन । जेंवी तोडी प्रभंजन ।
तेंवी राक्षसशस्त्रांतें छेदोन । राम चिद्भानु प्रकटला ॥१४॥

राक्षसांचा संहार :

देखोनि राक्षसांचे बळ । रामे सोडिले शरजाळ ।
त्यांची शस्त्रे छेदानि सकळ । वीर प्रबळ खोंचले ॥१५॥
एक बाण ओढिता ओढी । बाण सुटती लक्षकोडी ।
शत्रूंचीं शस्त्रे छेदोनिया गाढीं । वीरमुरकुंडी पाडिल्या ॥१६॥
उरी शिरी दोही करी । बाण भेदले भुजांवरी ।
सपिच्छी बुडाले शरीरी । वीरां महामारी श्रीराम ॥१७॥
वल्गती मेला गेला निमाला । तंव तो श्रीराम दादुल्यांचा दादुला ।
वीरां निवटीत उठिला अंत पुरला राक्षसांचा ॥१८॥
करु जाता राक्षस घाता । शस्त्रे छेदोनी तोडी हाता ।
वीर मिरविती पुरुषार्था । तंव करी निःपाता बाणाग्रें ॥१९॥
मागे वीर सरों जाता । तंव बाण वाज्ती त्यांचे माथा ।
सन्मुख होता श्रीरघुनाथा । जीवघाता करितसे ॥२०॥
राहे साहें वीर गर्जत । त्यांची जिव्हा छेदी सदंत ।
ऐसा बाणे मांडिला आकांत । वीर विख्यात श्रीराम ॥२१॥
कंकपत्र बर्हपत्र । हंसपत्र सुवर्णपत्र ।
बाणे भेदिले वीर विचित्र । रणी मयूर नाचती ॥२२॥
भोंवतां बाणांचा वळसा । सैन्य पाडिलें धारसा ।
महावीर पावले त्रासा । उरी राक्षसा उरो नेदी ॥२३॥
श्रीरामाचा निजबाण । राक्षसरुधिरीं करोनि स्नान ।
देतसे मोक्षाचें दान । पापी पावन त्याचेनि ॥२४॥
श्रीराम रणरंगधीर । राक्षससैन्या केला भार ।
रणी उठिला हाहाकार । देखोनि खर कोपला ॥२५॥

तुं दृष्टवा सगुणं चापमुद्यभ्य करनिःस्वनम् ।
रामस्याभिमुखं सूतं चोद्यतामित्यचोदयत्॥२॥
स खरस्याज्ञया सूतस्तुरगान्समचोदयत् ।
यत्र रामो महाबाहुरेको धुन्वन्धनुः स्थितः ॥३॥

खर व बारा वीर पुढे येतात :

देखोनि श्रीरामपुरुषार्थ । खर सारथियाते म्हणत ।
वेगे प्रेरींगा माझा रथ् । जेथे रघुनाथ रणरंगीं उभा ॥२६॥
कोप चढला चतुर्गुण । वेगे धनुष्या वाहिला गुण ।
आजी रामासीं करीन रण । आंगवण पहा माझी ॥२७॥
देखोनि धुरेचा कडकडाट । सारथिये वारुवां दिधला साट ।
रथ चालिला घडघडाट । तंव देखिला पुढे उद्भट श्रीराम ॥२८॥
आजनुबाहु धनुर्धारी । वीरांतें करित महामारी ।
असो खर देखोनि रहंवरी । श्रीराम टणत्कारी धनुष्यातें ॥२९॥
श्रीरामधनुष्याच्या टणत्कारे । दुमदुमिलीं गिरिकंदरें ।
नादें कोंदलें अंबर । निशाचरें भयभीत ॥३०॥
एक ती केवळ बापुडी । एकांची वळली मुरकुंडी ।
नांदें पाडापाडी मांडिली ॥३१॥
ऐसा देखोनि श्रीरघुवीर । खरासी ओढवले दुस्तर ।
त्याचे कैवारी अति दुर्धर । बाराही वीर धांविन्नले ॥३२॥
नावनिगे राक्षसांत । ज्यांसी नित्य कांपिजे कृतांत ।
तिही पडखळिला रघुनाथ । स्वामिकार्यार्थ दृढयोद्धे ॥३३॥
वोढण खांडे घेवोनि जाण । उग्रनामा आला आपण ।
स्वामिकार्यी वेंचावया प्राण । रणप्रवीण बाराही ॥३४॥
पृथलव यज्ञभक्तां । महाविष दुर्जय चोथा ।
धनुष्यबाण सज्जोनि हाता । युद्धी रघुनाथा सन्मुख ॥३५॥
परवीरघ्न पुरुषबळी । काळकार्मुक मेघमाळी ।
चवघे वीर आतुर्बळी । शूळत्रिशूळी महायोद्धें ॥३६॥
महाबाहु लोहितांबर । महाआस्य अति दुर्धर ।
गदार मुग्दल घेवोनि तोमर । रणी रघुवीर पडखळिला ॥३७॥
गदा मुग्दल परशु पट्टिश । बाण मोकलिले बहुवस ।
शस्त्रे सोडिलीं असमसाहस । श्रीराम राजस देखोनी ॥३८॥
बारा जण कपटरासी । म्हणोनि आवडती खरासी ।
कैसे कपट तयांपासीं । सावकासी अवधारा ॥३९॥
गुप्तघाती आकाशपाती । एक ते अतर्क्यविघाती ।
एम मारक निमेषस्थिती । प्राणवृत्ति पांचवी ॥४०॥
संचरोनि नेत्रांतरी । शूळे जिव्हार विदारीं ।
एक रिघोनि कर्णकुहरीं । वर्मी मारी शस्त्रातें ॥४१॥
एक तो खड्ग हातवसी । अंतरी संचरे मनोवेगेंसीं ।
शस्त्रे हाणोनी हृदयासी । मारी वीरांसी अति दृष्ट ॥४२॥
तो चौघे उरले कपटराशी । वीर वेढोनि चौपासी ।
गुप्तशस्त्रें कासाविसी । करोनि वीरासी मारिती ॥४३॥
ऐसे हे वीर बारा जण । कपटयोद्धे प्रवीण ।
रामासी मारावया जाण । अवघे जाण चालिले ॥४४॥
त्यांचा धरोनि आधार । चालिला राक्षसांचा संभार ।
धरा मारा गर्जती थोर । श्रीरामासमोर लोटले ॥४५॥

कपटप्रवीण बारा राक्षसांचा दमनीशक्तीने केलेला संहार, त्यामुळे राक्षसांची दाणादाण :

श्रीराम धनुर्धारी विचक्षण । मारावया बारा जण ।
दमनी निजशक्ती दारुण । अभिमंत्रोन सोडिली ॥४६॥
कपटी निर्दाळावया निश्चिती । अनिवार शस्त्र दमनी चिच्छक्ती ।
रामे सोडिली अलक्षगती । शस्त्रे ख्याती लाविली ॥४७॥
दमनी चिच्छक्ती देखोनी । कपटियां पडली मोहिनी ।
जाली बाराही जणा भंगाणी । प्रताप रणी चालेना ॥४८॥
बाण भरले नाकीं वदनी । बाण भरले कानी नयनी ।
बाण भरले हृदयभुवनीं । बाणी खिळोनी पाडिले ॥४९॥
श्रीरामाच्या बाणांपुढें । केउते पळतील बापुडे ।
वाट न दिसे मागेंपुढे । जीवी कुर्‍हाडे पै भेदिले ॥५०॥
वोडणें खिळिलीं उरासीं । कटी छेदिल्या कटारांसीं ।
शिरे छेदिली मुकुटासीं । हात सस्त्रेसीं छेदिले ॥५१॥
छेदिले स्थूळ लिंग कारण । श्रीरामे छेदिले महाकारण ।
जीवे मारोनि संपूर्ण । बाराही जण निर्दळिले ॥५२॥
कपटें जिंतितां श्रीरामासी । कपटें मारिले कपट्यांसी ।
श्रीराम प्रतापाची राशी । राक्षसांसी नाटोपे ॥५३॥
करोनि बारांचा निःपात । मग मिसळला सैन्यांत ।
भोंवता बाणांचा आवर्त । आला अंत राक्षसांसी ॥५४॥
रणी खवळला श्रीरघुनाथ । अनिवार बांणसंपात ।
जेथींचा तेथे राक्षसघात । रणी आवर्त वीरांसी ॥५५॥
एक खोंचले सन्मुख घायीं । एक पडिले ठायींच्या ठायी ।
एक सपाट छेदोनि पायी । पडिल्या भुई वीरश्रेणी ॥५६॥
शिरे छेदोनि चेंडूफळी करणे । खेळतु रुधिराचें शिंपणें ।
रणवसंतु माजवणें । किंशुक फुलणे बाणांचे ॥५७॥
वीर कुंथती अपार । तेवीच कोकिळापंचमस्वर ।
श्रीरामे केला महामार । लहान थोर कुंथती ॥५८॥
न साहवती श्रीरामबाण । राक्षससेना पलायमान ।
देखोनि धांविन्नला दुषण । अश्वासून सैन्यातें ॥५९॥

तान्सर्वान्धनुरादाय समाश्वास्य च दुषणः ।
अभ्यधावत्सुसंकुद्धः कुद्धं क्रुद्ध इवान्तकः ॥४॥
निवृत्तास्तु पुनः सर्वे दूषणाश्रयनिर्भयाः ।
राममेवाभ्यधावन्त सालतालशिलायुधाः ॥५॥

रणातून पळणार्‍या राक्षससैन्यास दूषणाचे आश्वासन :

दूषण म्हणे राक्षसदळा । रण देखोनी केंवी पळा ।
आश्वासोनियां सकळा । सन्नद्ध केला दळभार ॥६०॥
दूषण अवलोकी राक्षसांसी । म्हणे तुम्ही राहावे माझे पाठीसी ।
मी वधीन श्रीरामासी । अति आवेशी धांविन्नला ॥६१॥
धरोनि दूषणाचें बळ । परतले राक्षसदळ ।
श्रीराम शस्त्रे छेदावया सकळ । शाळताळशिळायोद्धे ॥६२॥
श्रीरामासी युद्ध करी दूषण । राक्षय वर्षती पाषाण ।
शाळताळवृक्ष जाण । अति सत्राणे हाणिती ॥६३॥

श्रीरामांनी दूषणाचा रथ, घोडे व सारथी यांना मारले :

श्रीराम रणरंगी प्रवीण । लघुलाघवे वर्ष बाण ।
तोडून शाळ ताळ पाषाण । बाणे दूषण केला कासाविस ॥६४॥
बाणांमागें येती बाण । घेतला राक्षसांचा प्राण ।
मूर्च्छित पाडीला दूषण । रणकंदन वीरांसी ॥६६॥
केव्हा भात्याचा बाण काढी । केव्हा जोडी केव्हा सोडी ।
अलक्ष्य लक्ष्याची परवडी । रणी करवडी पाडिली ॥६७॥
वीर खोंचले वितंड । मिथ्या दूषणाचें बळ बंड ।
एकही साहों न शके कांड । काळे तोंड दूषणाचें ॥६८॥
ऐकोनि वीरांचे वचन । दूषण झाला लज्जायमान ।
सामर्थ्ये मूर्च्छा सांवरोन । रथारोहण तेणे केले ॥६९॥

राक्षसांस्तान्रणे भग्नान्दृष्ट्वा रामेण धीमता ।
रथस्थो दूषणो रामं शरवर्षैरवाकिरत् ॥६॥

दूषणाशी भयंकर रणकंदन व त्याच्याच शस्त्राने त्याचा वध :

राक्षससेना देखोनि भग्न । दूषण झाला कोपायमान ।
रागे रथावरी बैसोनि जाण । वर्षे बाण अनिवार ॥७०॥
शतसहस्त्र लक्षकोडी । बाणांमागें बाण सोडी ।
श्रीराम निमेषार्धे तोडी । धनुष्य पाडी छेदोनी ॥७१॥
क्रोधे तप्त झाला दूषण । शक्ति गदा पडताळोन ।
सवेंचि रामे दहा बाण । अति दारुण सोडिले ॥७२॥
चारी वारु चहू बाणी । विंधोनि पाडिले धरणी ।
तोडोनि सांटा चाकें दोनी । तीन बाणी छेदिलीं ॥७३॥
एके ध्वज पाडिला क्षिती । एके सारथी ।
श्रीरामे लाविली ख्याती । केला विरथी दूषण ॥७४॥
छेदोनियां रथ सारथी । रणी दूषण केला पदाती ।
कोपे गदा घेवोनि हाती । श्रीरामाप्रती धांविन्नला ॥७५॥
जाणोनि राक्षसांच्या अति मदा । मिरविशी यशाच्या आनंदा ।
माझी साहें पाहे गदा । तरी मी योद्धा तुज मानी ॥७६॥
दूषणासीं करिता रण । रणी रामाचा गेईन प्राण ।
झाडीन वाढिवेचा अभिमान । गदा घेवोनि चालिला ॥७७॥
श्रीराम म्हणे नांव दूषण । सांगता न लाजसी आपण ।
दूषण खरासी भूषण । निंद्य वदन दोगांचे ॥७८॥
धर्में दूषण कर्मे दूषण । नामे दूषण कामे दूषण ।
दूषणासी बळ दूषण । आंगवण तुज कैचीं ॥७९॥
दूषण म्हणे जल्पसी किती । गदा घेवोनिया हाती ।
पतंग धांवे दीपाप्रती । तैसे गती धांवला ॥८०॥
गदा हाणितांचि दारुण । विंधोनि सुवर्णपत्री बाण ।
श्रीरामे गदा केली शतचूर्ण । रागे दूषण दांत खाय ॥८१॥
दांत खावोनि करकरा । शूळ घेवोनि धांवे सामोरा ।
घाये मारीन रघुवीरा । क्रोधे थरथरा कांपत ॥८२॥
बाण सोडोनि तिधारा । शूळ उडविला अंबरा ।
करोनिया शकले बारा । श्रीराम निशाचरावरी पाडी ॥८३॥
श्रीरामे सर्व शस्त्रे केली मोघ । देखोनी दूषणा आला राग ।
वज्रपाय घेतला परिघ । अति दूर्धर रणमारा । ८४ ॥
वीरभद्राचें वरद पूर्ण । परिघ सोडिल्या हरी प्राण ।
त्यासी न चले निवारण । ते निर्वाण शस्त्रांचें ॥८५॥
अष्टौ धंटा घवघवित । वीररक्तें अति आरक्त ।
दूषण धांवे परिघहस्त । श्रीरघुनाथ वधावया ॥८६॥
परिघ देखोनि अनिवार । स्वर्गी देवा हाहाकार ।
सुरनरांलागीं विचार थोर । केवी रघुवीर वांचेल ॥८७॥
श्रीराम धुनर्वाडा निजगडी । दूषण परिघ जंव सोडी ।
तंव परिघेंसीं बाहु खुडी । बाण निर्वडीं विंधोनी ॥८८॥
परिघासह बाहु खुडून । तोचि परतोनिया बाण ।
हृदयी भेदोनिया पूर्ण । रणी दूषण पाडिला ॥८९॥
दूषण पडता भूमिगत । परिघें वरिला श्रीरघुनाथ ।
येवोनि राहिला भात्याआंत । रणी प्रमाथा वधावया ॥९०॥
वीरभद्रशस्त्रदेवता । तीही प्रसन्न श्रीरघुनाथा ।
अमोघ परिघ आला हाता । रणी प्रमाथा वधावया ॥९१॥
दूषण पडतांचि रणी । हाहाकार गर्जे गगनी ।
धाके कांपती वीरश्रेणी । श्रीराम रणी रणरुद्र ॥९२॥

दूषणाचा वध झालेला पाहून त्याचे तिघे साथीदार पुढे आले :

रणी पडता दूषण । त्याचे कैवारी तिघे जण ।
श्रीरामासी करावया रण । अति दारुण चालिले ॥९३॥
महाकपाळ आणि स्थूळाक्ष । तिसरा प्रमाथी राक्षस ।
युद्धी हांकिती श्रीरामास । अति कर्कश चालिले ॥९४॥
राक्षसांमाजी अति दुर्धर । शूळ पट्टिश परशु थोर ।
तिघां हाती हतियार । श्रीरामासमोर लोटले ॥९५॥
आमुचा स्वामी पाडिला ठायी । तुजही पाडू शस्त्रघाय़ीं ।
शस्त्रे सोडिलीं लावलाहीं । त्रिपुटी पाही तिघांची ॥९६॥
एक तो चालिला सन्मुख । एक पाठीसी हाणी विमुख ।
एक तो आकाशी देख । शस्त्रे अनेक वर्षती ॥९७॥
श्रीराम पाठिमोरा देखणा । हे विंदान न कळे कोणा ।
विंधोनिया विकट बाणा । आणिला रणा प्रमाथी ॥९८॥

महाकपाळ, स्थूळाक्ष व प्रमाथी या तिघांना श्रीरामानी ठार केले :

हाती घेंवोनिया शूळ । सन्मुख आला महाकपाळ ।
शूळ छेदोनि तत्काळ । कंठनाळ निवटिले ॥९९॥
गगनी गर्जता स्थूळाक्ष । त्याचे बाणी छेदोनि अक्ष ।
तळी पाडोनियां देख । घायीं निःशेख मारिला ॥१००॥
वक्री शनि भौम केतू । सूर्योदयीं होती अस्तु ।
तैसा राक्षसांसी अंतु । श्रीरघुनाथा रणरंगीं ॥१॥
गृहस्थ अतिथी सन्मान । तैसेचि श्रीराम आपण ।
तिघां देवोनि शरासन । तिघे जण सुखी केले ॥२॥
सुवर्णपत्री सोडोनि शर । प्रमथा मथन केले थोर ।
दहा बाणी त्रासिले महावीर । निशाचर पळताती ॥३॥

सहकारी राक्षसांचा विध्वंस :

एके बाणे शतानुशत वीर । पांच बाणी मारी सहस्त्र ।
दहा बाणी दहा सहस्त्र । घोरांदर राक्षसा ॥४॥
सकुंडल छेदोनि शिर । आयुधांसहित ताडिले कर ।
कवचेंसी भेदिले शरीर । पाडिले वीर ब्रीदाचे ॥५॥
बाबरझोटीचे अपार । बाणी पाडिले महावीर ।
वाहती रुधिराचे पूर । श्रीरामचंद्र क्षोभला ॥६॥
श्रीरामबाणांच्या कडाडीं । राक्षसे पळती भयें बापुडीं ।
अति दीन होवोनि वेडीं । बाणझडाडी चरफडती॥७॥

चतुर्दशसहस्त्राणि रक्षसां भीमकर्मणाम् ।
हतान्येकेन रामेण मानुषेण पदातिना ॥७॥

रथेंवीण पायी रघुवीर । चवदा सहस्त्र निशाचर ।
रणी मारिले अति दुर्धर । जयांसी सुरनर कांपती ॥८॥
राक्षसांमाजी बळी दूषण । त्यासी भीतसे रावण ।
परिघ अनिवार दारुण । रामे आपण निर्दळिला ॥९॥
रणी निर्दळिले निशाचर । दूषण मारिला महावीर ।
श्रीराम धनुर्वाडा दुर्धर । कोण समोर राहिल ॥११०॥
राक्षसा जाला थोर मार । कोपे चालिला पै खर ।
त्रिशिरा कोपला दुर्धर । तेणे रघुवीर पडखळिला ॥११॥
करोनिया राक्षसघाता । केउता जासील तू आता ।
राहे साहें श्रीरघुनाथा । शस्त्रसंपाता पेटला ॥१२॥
निर्दळोनियां निशाचरां । रणी पाडोनियां मुख्य धुरा ।
गर्व धरिसी श्रीरघुवीरा । तो मी त्रिशिरा झाडीन ॥१३॥
श्रीरामत्रिशिरां झाली भेटी । दोघे महाक्रोधदृष्टी ।
दोघीं धनुष्य हट्टी महावीर ॥१४॥
एकाजनार्दना शरण त्रिशिर्‍याचे युद्ध दारुण ।
श्रीरामरण अति पावन । मोक्षसाधन साधका ॥१५॥
श्रीरामकथेचे अक्षर । क्षराक्षरातीत पर ।
मुक्त करावया निशाचर । कृपेनें दुर्धर कोपला श्रीराम ॥१६॥
श्रीरामकथा पवित्र तीर्थ । श्रोते वक्ते नित्यमुक्त ।
एकाजनार्दनीं निर्मुक्त । कथामृत श्रीराम ॥११७॥
स्वस्ति श्रीभावार्थ – रामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
दूषणवधो नाम दशमोऽध्यायः ॥१०॥
॥ ओव्या ११७ ॥ श्लोक ७ ॥ एवं १२४ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग