शतावती श्रवण अधिक पै
2696.
शतावती श्रवण अधिक पै जाले । तेणे अंगा आले जाणणेपण ॥१॥
पुराण श्रवण लौकिक प्रतिष्ठा । विचार चोहटा जाणिवेचा ॥२॥
श्रवण तो लौकिक मनी नाही विवेक । बुद्धीसी परिपाक कैसेनि होय ॥३॥
मी एक ज्ञाता मिरवीलौकिक । म्हणोनि आक्षेपक सभेमाजीं ॥४॥
नानापरी व्यक्ति मिरवी लोकांप्रती । वाढवितो महंती मानालागीं ॥५॥
मी एक स्वयपांकी मिरवे लौकिकी । इतर कर्मासी शुद्धी नाही ॥६॥
कर्माकर्मीं कांही न धरी कंटाळा । मानितो विटाळा ब्राह्मणाच्या ॥७॥
मजहुनी ज्ञाता आणिक तो नाही । ऐसे जाणिवेचे डोहीं गर्वें गेला ॥८॥
नित्य पुढिलाचें गुण दोष आरोपिती । श्रवणाची निष्पत्ति फळली ऐशी ॥९॥
लौकिक प्रतिष्ठा धनावरी आस्था । वरी वरी हरिकथा काय करिसी ॥१०॥
एका जनार्दनी साच न रिघे मन । तंववरी समाधान केवी होय ॥११॥
