(सीताशोक)
3643.
(सीताशोक)
राम म्हणता रामचि होईजे । पदी बैसोन पदवी घेईजे ॥१॥
ऐसे सुख वचनी आहे । विश्वासे अनुभव पाहे ॥धृपद॥
रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवी ॥२॥
तुका म्हणे चाखोनि सांगे । मज अनुभव आहे अंगे ॥३॥
अर्थ :
राम म्हटले की मनुष्य रामच होतो त्यामुळे राम नाम उच्चार करुन रामाच्या पदी बसून रामाचीच पदवी मनुष्याने घ्यावी. खरोखरच रामनामामध्ये अशा प्रकारचे सुख आहे की मनुष्य त्याच्याच पदवीवर आरुढ होतो त्यामुळे तुम्ही देखील विश्वास ठेवून अनुभव घेऊन पाहा. रामरसाची चव जर एकदा घेतली तर त्या रसापुढे इतर कोणतेही रस कोणालाही आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, रामरसाची चव मी चाखून पाहिलेली आहे आणि त्याचा अनुभव मला आलेला आहे व तोच अनुभव मी तुम्हाला सांगत आहे.
