(श्लोकरचनाआहे)
3381.
(श्लोकरचनाआहे)
मना सांडि हे वासना दुष्ट खोडी । मती मानसी एक हे व्यर्थ गोडी ।
असे हीत माझे तुज काही एक । धरी विठ्ठली प्रेम हे पायि सूख ॥१॥
असा सर्वभावे तुज शरण आलो । देहृदुःख हे भोगिता फार भ्यालो ।
भवतारिते दूसरे नाहि कोणी । गुरु होत का देव आणिक तीन्ही ॥२॥
जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती तेचि सोये ।
करी सर्व संगी परि त्यागु ठायी । तुका विनवी ठेवुनि शीर पायी ॥३॥
अर्थ :
हे मना तू वासना, दुष्ट खोडी टाकून दे आणि बुध्दीमध्ये त्याविषयीची गोडी ठेवणे हे एक व्यर्थ खोडी आहे. अरे मना तू माझे एक म्हणणे ऐक ते म्हणजे माझे सगळे हित तुझ्याजवळ आहे त्यामुळे तू विठ्ठलाविषयी प्रेम धर आणि त्याच्या पायी सुख आहे हे मान्य कर. अरे मना मी देहाचे दु:ख भोगताना फार भयभीत झालो आहे त्यामुळे मी तुला सर्वभावे शरण आलो आहे. अरे मना तुझ्यावाचून हा भवसागर मी तरुन जाऊ शकत नाही मग मला गुरु ब्रम्हा, विष्णू, महेश हे तीनही देव जरी आले तरी तुझ्यावाचून भवसागर तरुन जाणे शक्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे मना लोकांना धनाची फार वासना आहे आणि तुला देखील त्यांची संगती करणे योग्य वाटते. अरे मुख्यत: तू सर्वसंग परित्याग कर हीच विनंती मी तुझ्या पायावर माथा ठेवून करीत आहे.
