वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › ७, विरहिणी अभंग ८७६ ते ९१३

जागृती पुसे साजणी ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074676 · अभंग क्र. ९०७

907.
जागृती पुसे साजणी ।
कवण बोलिले अंगणी ।
निरखिता वो नयनी ।
वृंदावनी देखियला ॥१॥
मनी वेधु वो तयाचा ।
पंढरीरायाचा ॥२॥
स्वप्न सांगे सुषुप्ति ।
असे ममता हे चित्ती ।
विठ्ठल होईल प्रतीती ।
मग गर्जती तुर्ये ॥३॥
मज बोलो नये ऐसे केले ।
मन उन्मनी बोधले ।
बापरखुमादेविवरू विठ्ठले ।
थिते नेले मी माझे ॥४॥

अर्थ :
स्वरूप स्थितीला पोहोचलेली एक गौळण म्हणते मी जागृत अवस्थेमध्ये परमात्म्याचे चिंतन करून श्रीकृष्णपरमात्मा कोठे आहे म्हणून माझ्या सखीला विचारू लागले तेवढ्यांत अंगणांत कोणी तरी बोलत आहे असे माझ्या कानांवर आले. ते पाहण्याकरिता ती अंगणांत आली व तिने श्रीकृष्णास पाहिले. मात्र तो वृंदावनात आणि पंढरीस असणारा असे तिने ओळखले. आणि त्या पंढरीच्या राजाचा म्हणजे श्रीपांडुरंगाचा वेध तिच्या मनास लागला. आणि मन पांडुरंगच होऊन गेले, आणि ज्या भक्ताचे अंतःकरणांत खरा खरा पांडुरंगाचा जागृतीत वेध लागला असेल त्याचे स्वप्नांत तरी दुसरे काय येणार? श्रीपांडुरंगच येणार असा ज्याला अनुभव आला आहे. त्यास श्रीतुकोबारांयानी पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी । जागृति स्वप्नी पांडुरंग' तो या अभंगात सांगितला आहे. त्याचप्रमाणे गौळणीची जी जागृतीत स्थिती तीच स्वप्नांत होऊन ती स्वप्नावस्था सुषुप्ति अवस्थेत सांगते की माझ्या चित्तात त्या शामसुंदर श्रीकृष्णाविषयी फार प्रेम आहे. तेच प्रेम तुझ्यांत लीनरूपाने असणार अशी स्थिति झाली म्हणजे चतुर्थ तुर्या अवस्थेत म्हणजे समाधीअवस्थेत श्रीविठ्ठलाच्या पारमार्थिक स्वरूपाची प्रतीति होईल. याप्रमाणे त्या गौळणीची स्थिती झाली. म्हणून ती गर्जना करून बोलू लागली. काही बोलू नये ऐसे मला केले. मन आपले चांचल्य सोडून परमात्मरूप झाले, अशी स्थिति मला प्राप्त झाली आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्याने माझ्या ठिकाणचा वास्तविक नसलेला मी व माझेपणाचा भाव नाहीसा करून टाकला. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग