भाव धरी का रे साचा ।
3167.
भाव धरी का रे साचा । उच्चार करी नामाचा । पंथ विठोबाचा । दृढ धरी ॥१॥
विठ्ठल विठ्ठल वाचे । वदे का रे तू साचे । दोष जातील जन्माचें । संदेह नाही ॥२॥
आळस न करी क्षणभरी । वाचे उच्चार श्रीहरी । यमयातना बोहरी । तेणे होय ॥३॥
भक्ति दृढ धरी नामी । पडुं नको वाउगा श्रमीं । विठोबाचे नामी । विश्वास धरी ॥४॥
पतितपावन । नाम हे सत्व वचन । एका जनार्दनी चरणं । दृढ धरी ॥५॥
