वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ४८. अग्निपरीक्षा

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088182 · अभंग क्र. ४८

48.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय अठ्ठेचाळिसावा ॥
श्रीरामांच्या क्रोधाचे शमन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

भरतास वंदन करुन हनुमंताचे वृत्तांत-कथन :

देखोनि भरतप्रेमासी । नमन करोनि वेगेंसीं ।
सांगावया रामकथेसी । प्रेम कपीसी अनिवार ॥१॥
आम्हा निश्चयमनें । स्वये राम अनुभवणें ।
जगी रामरुप देखणे । भरतोल्लंघन केंवी घडे ॥२॥
बंधु धाकटा रामाचा । तोही आम्हा राम साचा ।
केंवी उल्लंघूं याची वाचा । लावीन कथेचा अन्वय ॥३॥
भरता ऐके सावधान । चित्रकुटी रघुनंदन ।
देवोनि तुम्हांसी समाधान । पुढारे गमन मांडिलें ॥४॥
घेवोनि अगस्तीची भेटी । सांगोनिया गुह्य गोष्टी ।
शरभंगऋषि जगजेठी । उठाउठी उद्धरिला ॥५॥
विराध येवोनि आडवा । सीता उचलोनि निघे तेधवां ।
रामे करोनि बाणलावा । महाबाहो मारिला ॥६॥
जटायुसीं सख्य पडिले । येवोनि पंचवटीसी राहिले ।
आश्रम मनोरम रचिले । राखण ठेविले जटायूसी ॥७॥
करिता वनविहारासी । सौ‍मित्रे मारिले शंबरासी ।
शूर्पणखा माता होय त्यासी । लक्ष्मणासी छळू आली ॥८॥
सौ‍मित्रे केले विंदान । सवेग छेदिले नाक कान ।
खरदूषणां गेली शरण । रामलक्ष्मण मारावया ॥९॥
चौदा सहस्र रक्षोगण । त्रिशिरा आणि खर दुषण ।
श्रीराम लक्षोनी आपण । दारुण रण करु आले ॥१०॥
एकलेनि रामे आपण । मारिले न लागता क्षण ।
मुक्त करोनि जनस्थान । द्विजां दान दिधले ॥११॥
ऐकोनिया हे मात । तळमळी लंकानाथ ।
सीताहरणासी उद्यत । छळणार्थ करु आला ॥१२॥
मृगवेष दिधला मारीचासी । देखता सीता उल्लासी ।
त्वचा मागे कांचोळीसीं । श्रीराम त्यासी मारुं गेला ॥१३॥
मायेचा मृग निघे बाहेरी । राम काढोनि नेला दूरी ।
जटाय़ू चरूं गेला वनांतरी । सीता सुंदरी एकली ॥१४॥
रक्षण ठेविला लक्ष्मण । ऐकोनि मायामृग वचन ।
त्याचे करोनिया छळण । दिला दवडोनि सीतेनें ॥१५॥
रावण येवोनि कपटेंकरीं । हरिली जानकी सुंदरी ।
जटायु धांवला झडकरी । त्यासी मारी रावण ॥१६॥
राम आला धांवोन । तंव जताय़ूसीं होता प्राणोत्क्रमण ।
करोनि त्याचे उद्धरण । पुढे आपण चालिला ॥१७॥
हातपायावीण मोधळा । कबंध गिळावया आला ।
रामे निजबाणें छेदिला । पाठविला वैकुंठा ॥१८॥
पंपातीरीं महावीर । आम्ही भेटलों वानर ।
स्वामी मिनला रामचंद्र । भाग्य थोर आमुचे ॥१९॥
वालिसुग्रीवा वैर भारी । दारराज्य हिरोनि झडकरी ।
आम्हा घालोनि बाहेरी । राज्य करी किष्किंधे ॥२०॥
शरण आलो रामासीं । रामे कुढाविलें आम्हासी ।
मारोनियां वाळीसी । सुग्रिवासी स्थापिले ॥२१॥
वालिसुत युवराजा । करोनि सीताशुद्धिचिये काजा ।
झडकरी पाठविला वोजा । सांगाते मज दिधले ॥२२॥
सीताशुद्धी आणिली तिही । मग निघाले लवलाही ।
कपिसैन्य चालवीत पाही । दोही बाही रघुराजा ॥२३॥
बिभीषण शिकवी रावणासी । न मानी तो त्याच्या वचनासी ।
लाता हाणितल्या त्यासी । तो आला रामापासी पै शरण ॥२४॥
वानरसैन्य अपरिमित । हाती पर्वत झेलित ।
सागरी गालिती त्वरित । हेळचि सेतू बांधिला ॥२५॥
करोनिया लंकालाग । वानर प्रवेशले दुर्ग ।
आगी लावोनि वस्तु सवेग । अनेक जाळिल्या ॥२६॥
राक्षससैन्य बहुसाल मरतां । कृपा उपजली भगवंता ।
एकाचिया अपराधता । लोका समस्ता केवी मारुं ॥२७॥
श्रीराम दीनदयाळ । श्रीराम स्वये स्नेहाळ ।
श्रीराम कृपाकल्लोळ । प्रणतपाळ श्रीराम ॥२८॥
राम कृपेचा कोंवळा । राम जीवींचा जिव्हाळा ।
राम कृपाळू कळवळा । लोका सकळा देखोनी ॥२९॥
रामे जगाची उत्पत्ती । रामे जगाची स्थितिगती ।
रामे जगाची विश्रांती । सच्चिन्मूर्ति श्रीराम ॥३०॥
निरपराधें केंवी मारुं । म्हणोनि मांडिला शिष्टाचारु ।
पाठविला अंगदवीरु । अति चतुर बोलका ॥३१॥
तेणे शिकविला बहुत रीती । ते न मानेचि लंकापती ।
मग मांडिली युद्धख्याती । केली शांती राक्षसा ॥३२॥
युद्ध झाले घोरांदर । मंत्री प्रहस्तादि महोदर ।
इंद्रजितादि महावीर । कुमरें कुमर मारिले ॥३३॥
महाबाहु कुंभकर्ण । उभा चिरिला बिंधोनि बाण ।
आधी नाक कान कापून । शिरःकमळ जाण छेदिलें ॥३४॥
बंधुपुत्रांचे दुःख भारी । दहाही मुखी शंख करी ।
रावणा दुर्दशा थोरी । सुरासुरी धाक त्याचा ॥३५॥
दुःखे आरंबळला बहुत । आतुर्बळी हा रघुनाथ ।
माझे काही न चले मत । दांत खात करकरा ॥३६॥
अदट वीर कुंभकर्ण । रामे मारिला विंधोन बाण ।
इंद्रजित महावीर दारुण । सौ‍मित्रे जाण निवटिला ॥३७॥
प्रधान मारिले आघवे । सैन्य सेनानी गेले जीवे ।
एकले म्या काय करावे । रणी नागवे रघुनाथा ॥३८॥
दांत करकरा खात । डोळे गरगरा भवंडित ।
रागे दोनी हात चुरित । शक्ति अद्‍भुत उचलिली ॥३९॥
शरणागत मारू आपण । त्याकारणें सांडितील हे प्राण ।
लक्षूनियां बिभीषण । शक्ति जाण हाणितली ॥४०॥
वेगी लक्ष्मण धांविन्नला । पाठीसी शरणागत घातला ।
शतधा शक्ति छेदून ठेला । गाढा दादुला सौ‍मित्र ॥४१॥
मंत्रीं खिळिल्या अति निगुतीं । परततां न ये मागुतीं ।
ऐसे विचारोनि चित्ती । आली काकुळती सौ‍मित्रा ॥४२॥
मज खिळिलें अभिमंत्रून । क्षीण माझी आंगवण ।
मागे सरता रावण । दंड संपूर्ण मज करील ॥४३॥
म्हणऊन तुज मी आले शरण । तू शरणागतशरण्य ।
नुपेक्षावें मजलागून । कन्या पूर्ण मी तुझी ॥४४॥
कन्या होवोनि शरण झाली । तेणे अत्यंत कृपा आली ।
सौ‍मित्र शरणागता माउली । अंगीकारिली ब्रह्मशक्ति ॥४५॥
कन्या झाली उपहत । जनक तिसी अंगीकारित ।
सौ‍मित्र अत्यंत कपाभित । थारा देत निजहृदयीं ॥४६॥
जरी उपेक्षूं इयेसी । तरी जगी होईन उपहासी ।
ब्रह्यवरद ये शक्तीसी । ब्राह्मण आम्हांसी निजपूज्य ॥४७॥
द्विजवचन उपेक्षितां । पूर्ण अपजयो बैसेल् माथा ।
वधिले जरी शरणागता । तरी अनर्थामाझारीं पडिजे ॥४८॥
जीवे जाता शरणागत । प्राण सांडील रघुनाथ ।
सुग्रीवादि कपि समस्त । प्राण निश्चित सांडितील ॥४९॥
मग माझे जिणें काय । वृथा भूमीसीं भार होय ।
चुकवावया सकल अपाय । जीवे पाहे विनटला ॥५०॥
संरक्षितां शरणागत । सुख वानरा समस्त ।
सुखावेल श्रीरघुनाथा । सुर समस्त सुखी होती ॥५१॥
राम वधील रावणा । अभिषेकील बिभीषणा ।
सिद्धी पावेल पूर्णपणा । वरदवचन रामाचे ॥५२॥
एकल्या माझ्या जीवासाठीं । उल्लासती ब्रह्मांडकोटी ।
राम विजयी सकळ सृष्टी । मजसाठीं होईल ॥५३॥
ऐसे विचारोनि चित्ती । पसरिली अंगाची वासती ।
हृदयी झेलिली ब्रह्मशक्ती । केली ख्याती सौ‍मित्रे ॥५४॥
शक्ति भेदितां लक्ष्मणा । गर्जे सिंहनादे रावण ।
त्यावरी चालिला रघुनंद । धनुष्यबाण सज्जूनी ॥५५॥
सोडूनियां निर्वाणबाण । तत्काळ मारावा राव ।
येरें साधिले विंदाण । पाठी देऊन पळाला ॥५६॥
पळाल्यावरी रामरावो । सर्वाथा न करी घावो ।
ऐसा जाणोनि दृढ भावो । रावण पाठी देवोनि पळाला ॥५७॥
पळवोनियां रावण । विजयी झाला रघुनंदन ।
पाहू आला लक्ष्मण । तंव मूर्च्छापन्न देखिला ॥५८॥
करवाळोनि अमृतहस्ती । केली निर्वीर्य ते शक्ती ।
विशल्य न करीच रघुपती । ब्रह्मवचनापुरती राखिली ॥५९॥
ब्राह्मणाचा अतिक्रम । सर्वथा न करी रघूत्तम ।
आदरिला लौकिक धर्म । बंधूत्तम उठावया ॥६०॥
बोलावोनि सुषेण वैद्यराज । पुसता झाला रघुराज ।
वेगी उपाव सांग मज । बंधुराज उठवावया ॥६१॥
सुषेण वैद्य सुबुद्धी । आणविल्या दिव्योषधी ।
शक्ति भेदली हृदयसंधी । ते त्रिशुद्धी विरावावया ॥६२॥
सुर्योदय न होता पहाहो । आणावा ओषधिसमुदावो ।
म्हणोनि मज धाडी रामरावो । महाबाहो परियेसीं ॥६३॥
मी आलो वेगवत्तर । नोळखें ओषधिभार ।
तेथे लागों पाहे उशीर । मग डोंगर उपडिला ॥६४॥
मार्गी जाता त्वरान्वित । तंव बाण रामनामांकित ।
देखोनि आलो येथ । तंव अद्‌भुत देखिले ॥६५॥
रामरुपें भ्रमलें चित्त । बोल बोलिलो बहुत ।
ते क्षमा करो रघुनाथ । मर्कट उद्धत अविवेकी ॥६६॥
देखोनि तुझा आश्रम । अत्यंत झाला विश्राम ।
मनें विसरलो गमनधर्म । सर्वांही सम रामसुख ॥६७॥
पक्षी सिद्धां बोल । तेणे लाजिला वेदांत ।
सरस्वतीचित्त भ्रमित । बृहस्पति तेथ वेडावला ॥६८॥
सांडून सकळ मत्सर । भरताश्रमीं निरंतर ।
भूते वर्तती एकत्र । निर्मत्सर रामनामे ॥६९॥

भरत - हनुमंताची तन्मयता :

वर्णिता श्रीरामाचे गुण । कपीस नाठवे कपिपण ।
हनुमान झाला मूर्च्छापन्न । देहाचे भान विसरला ॥७०॥
देखोनि कपीची अवस्था । भरत ओसंडला चित्ता ।
श्रीरामगुणकीर्ति ऐकता । विस्मित चित्ता होऊनी ॥७१॥
मन बुद्धी चितवृत्ती । अहंकाराची अहंकृती ।
रामी मिळाली निश्चिती । ब्रह्म स्फुर्ती विसरला ॥७२॥
अंग झाले रामांचित । वाचा झाली प्रेमसद्‌गदित ।
नेत्री आनंदाश्रु स्रवत । भरत मूर्च्छित पडियेला ॥७३॥
श्रवणी ऐकता श्रीरामचंद्रा । भरता लागली योगमुद्रा ।
विसरला तो निद्रा तंद्रा । कृपा रघुवीराची ऐसी ॥७४॥
नाठवे गेहदेहभान । रामरुपी जडला पूर्ण ।
खुंटला बोल तुटले मौन । भरतपण विसरला ॥७५॥
भरत विसरला भरतपण । हनुमान विसरला हनुमत्पण।
दोघांस नाठवे दोनीपण । तटस्थ पूर्ण श्रीरामे ॥७६॥
दोघे विसरले दोनीपण । कार्या आठव करी कोण ।
बाप कृपाळु रघुनंदन । चैतन्य पूर्ण चेतविलें ॥७७॥
जीवनकळा सावध केली । प्राणशक्ति परिचारिली ।
इंद्रिया पाटवता झाली । झांपडी उघडली नेत्रांची ॥७८॥
चित्त चेतनेते धरित । मन पूर्वसंकल्प आठवित ।
बुद्धि निश्चयातें अंगिकारित । रामकार्यार्थ साधावया ॥७९॥
अकस्मात सावध होये । म्हणे मज झाले काय ।
उगाचि येथ तटस्थ आहें । आठव नोहे स्वामिकाजा ॥८०॥
करु पाहे उड्डाण । भरतें घातले लोटागण ।
मज सनाथ न करिता पूर्ण । केंवी प्रयाण करु पाहसी ॥८१॥
भोजन करावे येथे । तीर्थप्रसाद द्यावा माते ।
उपेक्षूं नये आर्तातें । तुम्ही निजचित्तें कृपाळु ॥८२॥
घरा आलिया श्रीरामभक्त । पूजा न करिता जावूं देत ।
त्याच्या सकळ कर्मांचा घात । अधःपात तो भोगी ॥८३॥
ऐसी निजधर्मविवंचना । तू जाणतोसी कपिनंदना ।
सर्वथा उदास न करी मना । म्हणोनि चरणा लागलों ॥८४॥
येरें वारिला त्वरित । जैसा राम तैसा भरत ।
वेळोवेळा पाया लागत । हे अनुचित सर्वथा ॥८५॥
ऐकोनि कपीचें वचन । भरत झाला हास्यवदन ।
तुज सकळ धर्माचे निजज्ञान । मज चाळवण का करिसी ॥८६॥

ब्राह्मण कुलसम्पन्नं भक्तं विष्णोर्महात्मनः ।
आयांतं वीक्ष्य नोतिष्ठेत्स दुःखैः परिभूयते ॥१॥

सर्वांसीं अगजन्मा ब्राम्हण । कुळशीळसगुणगुण ।
वेदशास्त्रसंपन्न । आलिया आपण पूजावा ॥८७॥
भलतैसा हो का भक्त । श्रीरामभजनी रत ।
भगवद्‍बुद्धीने पूजा करीत । तोचि संत सर्वज्ञ ॥८८॥
ज्ञानी आत्मा विश्वाचा । भगवंतचि स्वये साचा ।
त्यासी पूजी तो दैवाचा । परमार्थाचा असेल भागी ॥८९॥
त्याचे करील जो उपेक्षण । तो महादुःखें दारुण ।
भोगी आकल्पांत पूर्ण । उर्ध्वगमन असेना ॥९०॥
तू तंव भजनभक्तीचें । केवळ हृदय श्रीरामाचे ।
सबाह्य अभ्यंतर साचे । निश्चयाचे रामभजन ॥९१॥
ज्ञान तरी अत्यद्‍भुत । जग ब्रह्मरुप देखत ।
ब्रह्मानंदे सदा डुल्लत । ब्रह्मभूत कपिनाथ ॥९२॥
ऐसियासी देखोन । जो न करी पूजन नमन ।
तो महापापी पूर्ण । रामदर्शन त्यास कैंचे ॥९३॥
राम साधूचिये दृष्टी । राम साधूचिये गांठी ।
राम साधूचिये पोटी । सज्जन भेटी राम भेटे ॥९४॥
राम साधूचिये वृत्तीं । राम साधूचिये स्थितीं ।
राम साधूचिये भक्ती । श्रीरामप्राप्ती सत्संगें ॥९५॥
राम सत्संगा आतुडला । राम सत्संगा विकला ।
राम सत्संगा लाधला । राम राहिला सत्संगें ॥९६॥
भक्ता सबाह्य श्रीरामरावो । कपि स्वये भक्तरावो ।
भाग्ये भेटला महारावो । सभाग्य पहा हो केवढा मी ॥९७॥
ऐकोनि भरताचे उत्तर । हनुमान झाला चिंतातुर ।
भरता नमूनि सत्वर । काय कपींद्र बोलिला ॥९८॥
श्रीरामानुजा तुझे वचन । सर्वथा नुल्लंघवे पूर्ण ।
संकोचित अंतःकरण । ते सावधान अवधारी ॥९९॥
सौ‍मित्र पडिला विसंज्ञ । नाही घेतलें जीवन ।
येथे मी करिता भोजन । तेंचि दूषण रामभजनीं ॥१००॥
श्रीराम बैसला सचिंत । वानरभार शोकाकुलित ।
बिभीषण दुःखे तळमळित । मजचि येथ आहार केंवी ॥१॥
स्वामी भरता विनंती ऐक । मज द्यावे चरणोदक ।
संभावना सकळिक । तेणे देख पावली ॥२॥
तुझे चरणतीर्थ घेता । विजयी होईन सर्वथा ।
सौ‍मित्रा उठवीन तत्वता । लंकानाथा जीवघात ॥३॥
उभवोनि रामराज्याची गुढी । तुटेल देवांची बांदवडी ।
सीता सोडवीन तांतडी । येथे रोकडी आणीन ॥४॥
म्हणोनि चरणी ठेविला माथा । तंव भरत म्हणे मागुता ।
कांही विनवीन कपिनाथा । ते तत्वता ऐकावे ॥५॥

भरताने हनुमंताची बाणावरुन रवानगी केली :

श्रीरामदर्शना चित्त । बहुत झाले उत्कंठित ।
आज्ञेस्तव आलो येथ । कांही मत चालेना ॥६॥
बाण तुज सवे देईन । त्यावरी करी आरोहण ।
माझे वरचें लोटांगण । श्रीरामा आपण करावे ॥७॥
इतुकेनि कृतकृत्य । झालों तुझेनि सनाथ ।
तू कृपाळू श्रीरामभक्त । मनोगता रक्षावें ॥८॥
श्रीरामनाम स्मरतां । तुज श्रम नाही सर्वथा ।
जाणोनि माझ्या मनोगता । वचनार्था संपादीं ॥९॥
ऐकोनि भरतवचन । हनुमंत विस्मयापन्न ।
कोण उल्लंघी तुझे वचन । म्हणोनि चरण वंदिले ॥१०॥
वाचेसीं पडिले महामौन । राहिला दोन्ही कर जोडून ।
येरे सज्जोनिया गुण । सीती बाण लाविला ॥११॥

श्रुत्वेति तस्य वचनं भरतः शराग्रे
सादिं कपिं समधिरोप्य गुणेन योज्य ।
मोघें धनुर्झटिति कुंडलितं चकार
तुष्टाव तं परमविस्मयमागतस्य ॥२॥

भरतप्रेंम अद्‍भुत । प्रेमे बांधला कपिनाथ ।
सर्वथा कांही न चले मात । बैसे पर्वतसह बाणाग्री ॥१२॥
करोनि प्रदक्षिणा नमन । घेतलें चरणतीर्थ मागोन ।
बाणी करिता आरोहण । येरें संधान योजिले ॥१३॥
वोढी काढोनि कानाडी । वरी बैसविला परवडी ।
गुणीं जोडून झडाडी । बाण प्रौढी सोडिला ॥१४॥
करोनिया रामस्मरण । भरतें सोडिला निजबाण ।
कपि करोनिया रामस्मरण । गगनी सबाण उसळला ॥१५॥
हनुमान जाता गगनांत । गगन अवघे लखलखित ।
दिव्य तेज अद्‍भुत । तेजे भास्वत आच्छादे ॥१६॥
दिव्य दुंदुभि सुरवरी । स्वर्गी त्राहाटिल्या भेरी ।
पुष्पवृष्टी सुरवरी । केली शिरी कपीच्या ॥१७॥
गंधर्वाचें गायन । सिद्धांचें जयजयकारें गर्जन ।
देवांगनांचे नर्तन । कपीचें गर्जन निजगजरें ॥१८॥
विजयी झाला कपींद्र । आता उठवील सौ‍मित्र ।
निवटून राक्षसभार । दशशिर मारील ॥१९॥
तुटेल देवांची बांधवडी । नृत्य करिती तांतडी ।
स्वर्गी उभवोनी गुढी । जयजयकारें गर्जताती ॥१२०॥
स्वर्गी हर्षित सुरगण । वेगी जातसे वायुनंदन ।
आकाशमार्गे शोभायमान । क्षणे गमन दिगंता ॥२१॥

हनुमंताला विलंब लागल्याने श्रीरामांना चिंता :

येरीकडे रघुनंदन । झाला अत्यंत उद्विग्न ।
सावध परी असावधपण । मार्गनिरिक्षण मांडिलें ॥२२॥
का पा न येचि कपिनंदन । का लागले विलंबन ।
न कळे कांही झाले विघ्न । राक्षसी छळून मारिला ॥२३॥
की सगळा पर्वतचि चुकला । आणखी पर्वतांतरासी गेला ।
कीम् जाता मार्गचि भुलला । वेडावला कपींद्र ॥२४॥
की नीट तेथेंचि गेला । पर्वतही ठाकिला ।
ओषधी नोळखेचि वहिला । की डोळा लागला पर्वती ॥२५॥
राक्षस कोणी निमले तेथ । तिही माया केली बहुत ।
गोंवून पाडिला आहे हनुमंत । कपिनाथ विटंबिला ॥२६॥
तो नभीं राक्षसांसी । नाकळे सर्वथा मायेसी ।
जिंतून माया राक्षसी । निजकार्यासी लाधेल ॥२७॥
ओषधीते राखण । गंधर्व असती तेथ ।
तिही देखिला कपिनाथ । ओषधी घेत पर्वती ॥२८॥
तिही कळी मांडिली तेथे । घेंवो न देती ओषधीतें ।
बळे मिसळोनि युद्धाते । तिही कपीतें गोविलें ॥२९॥
हेंही न घडे कपीसी । क्षणे मारील गंधर्वांसी ।
जगतीतळी हनुमंतासी । रणी युद्धासीं न भिडवे ॥१३०॥
चौदा सहस्र वनकर । ऐंशीं सहस्र किंकर ।
मारिला अखयाकुमार । अदट वीर हनुमंत ॥३१॥
अमित राक्षसांच्या पंक्ती । क्षणे मारिल्या मारुती ।
तेथे गंधर्व बापुडे किती । क्षणे कपिपति निवटील ॥३२॥
न कळे काय पडली गुंती । लोटोनि गेली मध्यराती ।
हनुमान न येचि शीघ्रगती । रघुपति सचिंत ॥३३॥
प्राणें वेंचल्या लक्ष्मण । ओषधीचे काय कारण ।
अश्रुपूर्ण झाले नयन । लक्ष्मण केवी वांचेल ॥३४॥

हा वीर सुमहाबाहो प्रतिवाक्यं प्रयच्छ मे ।
न त्वमर्हसि सौ‍मित्रे त्युत्कुं दुःखार्दितं हि माम् ॥३॥
अहा लक्ष्मणा काय केले । रणी युद्धाते सांडिलें ।
शक्तिभेदें शयन केले । मज मोकलिले संग्रामा ॥३५॥
त्वदियाग्निसमुत्थेन शोकेनाहं विदाहितः ।
करोम्यराक्षसामुर्वी त्रैलोक्यं च दहाम्यहम् ॥४॥

करोनि अद्‍भुत पुरुषार्थ । वांचविला शरणागत ।
शक्ति केली प्रतिहत । शरणागत तुज आली ॥३६॥
शरणागता शरण । साच एक लक्ष्मण ब्रीद दाविले साच करुन ।
शक्ति झेलून निजहृदयीं ॥३७॥
बिभीषण घातला पाठीसी । शक्ति धरिली पोटेसीं ।
सौ‍मिअत्रें ख्याति केली ऐसी । शरणागतासीं शरण्य ॥३८॥
येरयेरांच्या घाता वहिलीं । येरयेरें प्रवर्तलीं ।
येरयेरांच्या भयें भ्याली । दोनी आली तुज शरण ॥३९॥
बिभीषण पहिलें शरणार्थी । पाठीसी घातला निश्चिती ।
सवेंचि शरण आली शक्ती । ते ठेविली त्वरित हृदयेंसीं ॥१४०॥
प्राण जाईल सर्वथा । परी नुपेक्षावें शरणागता ।
सौ‍मित्रे साच केले आता । प्राणांतव्यथा साहोनी ॥४१॥
बैसोनि लक्ष्मणाजवळी । हात पिटित वक्षःस्थळीं ।
सौ‍मित्रे मांडिळी रांडोळी । मजसी का बोली बोलेना ॥४२॥
येरे येरे लक्ष्मणा । साद दे का बंधुरत्‍ना ।
मज सांडिलें माजी रणा । निष्ठुर मना करोनी ॥४३॥
मज सांडोनि दुःखार्दित । रणी निघालासि त्वरित ।
माझे अपराध बहुत । तुवा समस्त साहिले ॥४४॥
बहुसाल कष्टलासी वनी । कष्ट करिसी अनुदिनी ।
पोट आपुलें बांधोनी । फळे आणोनी मज देसी ॥४५॥
चरण क्षालन करिसी नित्य । चरण चुरिसी अहोरात्र ।
निद्रा न लगे अणुमात्र । सावचित्त रामभजनीं ॥४६॥
तुझे कष्ट आठवितां । मज होतसे दुःखावस्था ।
हृदयस्फोट होईल आता । न देखता सौ‍मित्र ॥४७॥
म्हणऊनि घाली लोटांगणी । सवेंचि सावध झाला मनी ।
मी भ्रांत काय म्हणोनी । कंदनालागोनी उठिला ॥४८॥

श्रीरामांचा आवेश व क्रोध :

म्हणे काय झाले येथे । कवण नेईल सौ‍मित्रातें ।
दमोनियां सकळ भूते । लोकपाळांतें दमीन ॥४९॥
पृथूनें दमियेली धरित्री । दुहिल्या ओषधी समग्री ।
मी त्याहून दमीन बाणाग्री । सौ‍मित्र शरीरी उठ जंव ॥१५०॥
अगस्तिऋषीनें निश्चिती । शोषियेला अपांपती ।
मी त्याहून करीन ख्याती । त्रिजगती कोरडी ॥५१॥
सौ‍मित्राची जीवनश्री । आणोनि देईल झडकरी ।
तंव करीन बोहरी । बाणधारी आपांची ॥५२॥
तेजे तेजेंचि शोषीन। जंव सतेज होय लक्ष्मण ।
अन्यथा महावात प्रेरीन । निःशेष शोषीन तेजासी ॥५३॥
बाणे महाशून्य भरडीन । प्राशीन सकळ प्रभंजन ।
जंव लक्ष्मणाचा निजप्राण । स्वये आपण आणून देई ॥५४॥
क्षोभवोनि चिदाकाश । घोटीन सगळेंचि आकाश ।
सौ‍मित्राचें हृदयाकाश । सावकाश जंव होय ॥५५॥
दमोनियां सकळ देव । उडवीन त्यांची माव ।
करिती सौ‍मित्रासी सावयव । ते लाघव करीन ॥५६॥
दमूनि दिशांची पोकळी । भरीन चिदानंद कल्लोळीं ।
जंव सौ‍मित्राचे कर्णबिळीं । आहाळ बाहळी निघे शब्द ॥५७॥
बाणे पाडोनियां सूर्यासी । खंडोनी उदयास्तांसी ।
घेईन होरोनि तेजासी । नेत्री लक्ष्मणासीं भरीन ॥५८॥
अश्विनीदेव दोनी । निरोध केला आहे घ्राणीं ।
त्यांचा कंदचि खणोनी । सौ‍मित्रघ्राणीं ओपीन ॥५९॥
वरुणाते गाळून घाणा । जेणे नीरस केली रसना ।
गोडी हिरोनि आणीन जाणा । चेतवीन सौ‍मित्राची ॥१६०॥
वायूने मांडली घसघस । केला सौ‍मित्र मंदस्पर्श ।
पिळोनि त्याचा प्राणांश । करीन सुस्पर्श सौ‍मित्र ॥६१॥
इंद्रे मांडिलें बंड । निर्वीर्य केले बाहुदंड ।
ठेंचोनियां त्याचे तोंड । सबळ भुजदंड करीन ॥६२॥
यम संचरे अधोगती । क्षीण केली शरीरशक्ती ।
त्यासी लावोनियां ख्याती । अक्षय निश्चिती सौ‍मित्र करीन ॥६३॥
ब्रह्मयाने केला निरोध । खुंटला रतिस्वानंद ।
त्याचा छेदोनियां बाध । अखंडानंद भरीन ॥६४॥
केली उपेंद्रें छळणोक्ती । खुंटली गमनागमनशक्ती ।
त्यासी लावोनियां ख्याती । ऊर्मिलापती उठवीन ॥६५॥
बळीनें द्वारपाळ केला । वामन त्रिविक्रम भला ।
खिळीन सौ‍मित्राच्या पाउला । चालवीन मग सुखे ॥६६॥
नभें मांडिले द्वंद्व । निःशेष खुंटला शब्द ।
उडवून त्याचा शून्यवाद । अनाहतशब्द काढीन ॥६७॥
चंद्र पीडिला क्षयरोगें । तरी निश्चळ न राहे उगे ।
सौ‍मित्राचें मन नेलें वेगे । मूर्च्छित करोनि राहिला ॥६८॥
ऐसे दंडीन मी त्यासी । स्वये विसरोनि निजधर्मासी ।
सांडून संकल्पविकल्पांसी । उठवीन सौ‍मित्रासी निर्विकल्प ॥६९॥
ब्रह्मयाने बुद्धि केली मंद । उडवीन त्याचे ब्रह्मपद ।
सौ‍मित्रासीं निर्विकल्प शुद्ध । स्वरुपावबोध जंव करी ॥१७०॥
रुद्रें अहंकार केला क्षीण । त्यासी सोहंमार करीन ।
संवर्तका संहारुन । धरी स्वरुपाभिमान जंव सौ‍मित्र ॥७१॥
विष्णु येवोनियां त्वरित । न करी सौ‍मित्रा सावचित्त ।
तरी तो करीन पदच्युत । सर्वगत देशधडी ॥७२॥
लक्ष्मणाचे विरहे जाण । पूर्ण क्षोभला रघुनंदन ।
अंतका अंतक होऊन । धनष्यबाण सज्जिले ॥७३॥
मारीन राक्षस सकळ । जाळीन हे जगतीतळ ।
झाला क्रोधाग्निकल्लोळ । काळा काळ रघुवीर ॥७४॥

एवमुक्त्वा महाबाहुः प्रगृहीतं च कार्मुकम् ।
ततः संत्रस्तमानसा वानरा भीमविक्रमा ॥५॥
किमेतदिति भाषंतः ससुग्रीवबिभीषणाः ।
प्रणिपत्याग्रतः स्थित्वा सर्वे प्रांजलयोऽब्‍रुवन् ॥६॥
एकस्यार्थे महाबाहो त्रैलोक्यं हंतुमिच्छसि ॥७॥

रामाच्या क्रोधाने लोकपाळ सचित व रामाचा अनुभव :

अकाळ मांडला युगांत । लोकपाळ हडबडित ।
राम होता क्रोधान्वित । डोळे झाकी प्रळयरुद्र ॥७५॥
ब्रह्मा म्हणे काय जाले । काळेंवीण प्रळयांत मांडिले ।
दुणे कष्ट मज ओढवले । पुन्हा कैसे सकळ ब्रह्मांड रचू ॥७६॥
होता सकळा आडदरा । पळती मर्कटें सैरा ।
ते देखोनि थोरथोरा । वानरवीर पुढे झाले ॥७७॥
नळनीळादि जांबवंत । अंगद सुग्रीव कपिनाथ ।
बिभीषण शरणागत । श्रीरघुनाथ प्रार्थिती ॥७८॥
पूर्णावतार रामरावो । अकाळी करु नये प्रळयो ।
कांपतसे ब्रह्मदेवो । नवी सृष्टी पहाहो करवेना ॥७९॥
अकाळ प्रळयो करिता । बोल लागेल निजव्रता ।
तू सकळांतें पाळिता । निरपराधें घातां नये करु ॥१८०॥
एकाचे अपराधासाठीं । संहारणें सकळ सृष्टी ।
ते प्रतिपालनाची गोष्टी । केंवी जगजेठी बोलावी ॥८१॥
तू जनक सकळांचा । पिता पितामहाचा ।
निरपराध निजबाळांचा । संहार कैसा करितोसी ॥८२॥
म्हणोनि धरिले दोनी चरण । नको प्रयोजूं गुणीं बाण ।
तू कृपाळु रघुनंदन । क्रोधोपशमन करी रामा ॥८३॥
भक्तजनांचा कृपाळ । श्रीराम दीनदयाळ ।
वोळला कृपाकल्लोळ । प्रणतपाळ श्रीराम ॥८४॥
तृषार्थ दीन चातक । देखतांचि एकाएक ।
वर्षोनिया कृपापीयूख । निवविले देख दयाळुत्वें ॥८५॥
निजभक्तांचें वचन । नुल्लुंघीत रघुनंदन् ।
केले क्रोधाचें उपशमन । भक्तावगणन न करीच ॥८६॥
एका एकपणाची दिठी । एका जरार्दनीं नाथिली गोष्टी ।
घालिता श्रीरामी मिठी । ब्रह्मत्वे सृष्टी हेलावे ॥८७॥
एका जनार्दना शरण । प्रार्थूनियां रघुनंदन ।
केले क्रोधाचें उपशमन । निजजनकृपाळु ॥१८८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां
रघुनाथक्रोधोपशमनं नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः ॥४८॥
ओंव्या ॥१८८॥ श्लोक ॥७॥ एवं ॥१९५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग