वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › ६. युद्धकाण्ड - अध्याय ८४ › ३२. लक्ष्मण-इंद्रजित युद्ध

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088181 · अभंग क्र. ३२

32.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

युद्धकांड

॥ अध्याय बत्तिसावा ॥
श्रीराम-लक्ष्मणांना शरबंधन

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

अतिकाय वधामुळे वानरसैन्यांत हर्षकल्लोळ व रावणाचा शोक :

अतिकाय तो अतिरथी । सौमित्र केवळ पदाती ।
तेणे त्यासी पाडिले क्षिती । वानर गर्जती हरिनामे ॥१॥

प्रहर्षयुक्ता बहवश्च वानराः प्रबुद्धपद्मप्रतिमाननास्तदा ।
अपूजयन्लक्ष्मणमिष्टभागिनं हते रिपौ भीमबले दुरासदे ॥१॥

जैसी उत्फुल्लित पद्मकमळें । तैसी वानरांचीं मुखकमळें ।
स्वानंदे शोभती प्रांजळें । अतिकाय बळे मारलिया ॥२॥
अतिकाय तो अतिरथी । लक्ष्मणे मारिला पदाती ।
ते देखोनि श्रीरघुपती । सौ‍मित्रा पूजित स्वानंदे ॥३॥
स्वर्गी गर्जतीं सुरवर । नामे गर्जती वानर ।
ऋषी करिती जयजयकार । विजयी सौ‍मित्र संग्रामी ॥४॥
रणी मारिता राक्षसभार । शेष उरले निशाचर ।
भेणे ठाकून लंकापुर । सांगती सत्वर लंकेशा ॥५॥
रडत पडत कुंथत । घायीं आले जर्जरित ।
येवोनियां सभेआंत । वृत्तांत सांगत लंकेशा ॥६॥
मागिल्या वीरांच्या कथा । त्वा ऐकिल्या लंकानाथा ।
अतिकाय मारिला आता । आम्हांदेखता सौ‍मित्रे ॥७॥
अतिकाय मारिला सौ‍मित्रे । हे ऐकोनि लंकेश्वरे ।
अति दुःखी दुःखभारें । काय उत्तर बोलत ॥८॥
मागिलें दुःख आठवून । स्वये अनुवादे रावण ।
समस्त वीर रणप्रवीण । मारिले स्वजन संग्रामी ॥९॥
धूम्राक्ष वज्रदंष्ट्र । अकंपन प्रहस्त धुर ।
कुंभकर्ण सहोदर । महोदर महापार्श्व ॥१०॥
माझिया कुमरां महावीरा । ज्यांचा धाक सुरावरा ।
जे नाटोपती इंद्रादि अमरां । त्या महाशूरां मारिले ॥११॥
देवांतक आणि त्रिशिरा । मारिले नरांतक वीरा ।
आक्रंदत रुदनद्वारा । दशशिरा अति दुःख ॥१२॥
भरंवशाचा कुंभकर्ण । कुमर मारिले प्रधान ।
आता त्या रामासी रण । करिल कोण संग्रामी ॥१३॥
सुग्रीवे मेळविलें दळ । श्रीरामे आश्वासिलें सकळ ।
वानरी करोनि रणकल्लोळ । धुराचि प्रबळ मारिल्या ॥१४॥
आमच्या वर्मीचे आघात । सांगावया बिभीषण तेथ ।
तेणे मांडिला कुळक्षयार्थ । अतिकायघात तेणे केला ॥१५॥
ब्रह्मास्त्रें अतिकाया मरण । हे वर्म सांगे बिभीषण ।
तेणे संग्रामी लक्ष्मण । झाला संपूर्ण निजविजयी ॥१६॥
श्रीराम आणि लक्ष्मण । अंगद सुग्रीव हनुमान जाण ।
यांसी कोण करील रण । रडे रावण आक्रोशे ॥१७॥

इंद्रजिताचे रावणाला आश्वासन :

ऐकोनि रावणाचे रुदन । इंद्रजित आला धांवोन ।
आपला पुरुषार्थ आपण । बोले गर्जोन ते ऐका ॥१८॥
इंद्रजित जीत असता । तुज दुःख कोण लंकानाथा ।
रामलक्ष्मणांच्या करीन घाता । आणि समस्ता वानरा ॥१९॥
तू राजा सर्वांर्थी प्रबळ । दुःखशोकाचा नव्हे काळ ।
आजि माझे पाहे बळ । रणकल्लोळ संग्रामी ॥२०॥
सुटल्या माझे निर्वाणबाण । सर्वांग बाणी खिळोन ।
मारीन रामलक्ष्मण । प्रतिज्ञा प्रमाण हे माझी ॥२१॥
वानरे कायसीं बापुडीं । बाणी विंधोनि निर्वडीं ।
पाडीन कपींचिया कोडी । रणधांदडीं संग्रामी ॥२२॥
ऐसी बोलोनि आंगवण । घेवोनिया अज्ञापन ।
करुन रावणासी नमन । रथारोहण केले ॥२३॥

इंद्रजिताचे रथामधून प्रयाण :

रथी जुंपोनि महाखर । वरी बैसला निशाचर ।
ध्वज पताका छत्र चामर । शस्त्रसंभार संयोगें ॥२४॥
वायुवेगें अत्यद्‍भुत । सबळ संजोगोनि रथ ।
इंद्रजित बैसोनियां तेथ । निघाला गर्जत संग्रामा ॥२५॥
जे रथी बैसला देख । समाधिसुखाहून अधिक ।
संग्रामी जयाचे वाढे सुख । तेणे संमुख युद्धा आला ॥२६॥
युद्धा निघतां इंद्रजित । सैन्य निघाले अत्यद्‍भुत ।
रथस्थ गजस्थ अश्वस्थ । निघाले समस्त गडगर्जे ॥२७॥
फरश पट्टिश तोमर । शूळ त्रिशूळ मुग्दर ।
अचुकसंधान धनुर्धर । सैन्यसंभार चालला ॥२८॥
जेंवी तमाबाहेर भास्कर । स्वये निघे तेजाकार ।
तेंवी इंद्रजित महावीर । निघे सत्वर लंकेआंतोनी ॥२९॥
शंख भेरी निशाण । वाजंत्रांचा नाद गहन ।
इंद्रजित निजतेंजें विराजमान । अपरभार रणरंगीं ॥३०॥
सूर्यतेज फांके गगनी । ह्याचें तेज संग्रामस्थानीं ।
इंद्र आणिला बांधोनी । रणांगणी जिणोनियां ॥३१॥

रावणाचा इंद्रजिताला आदेश :

सन्नद्ध सेनासंभार । युद्धा निघतां रावणकुमर ।
संतोषोनि दशशिर । काय उत्तर बोलत ॥३२॥
रणी जिणोनि इंद्रासी । बांधोनि आणिले मजपासीं ।
तैसेंचि रामलक्ष्मणासी । आणीं मजपासीं बांधोनी ॥३३॥
रणी न बाधवे रघुपती । दोघे मारावे रणव्युत्पत्तीं ।
तू तंव योद्धा महारथी । करावी ख्याती संग्रामी ॥३४॥
ऐकोनि पित्याचे वचन । करोनि प्रदक्षिणा नमन ।
इंद्रजित निघे आपण । घेवोनि सैन्यसंभारा ॥३५॥
दोघे निधडे राम सौ‍मित्र । भेणे कांपे इंद्रजितवीर ।
त्यांसी करावया अभिचार । गेला सत्वर निकुंबे ॥३६॥
निकुंबळा अटकगिरी । तेथे अभिचारसामग्री ।
इंद्रजित दुष्ट दुराचारी । करवी ती परी अवधारा ॥३७॥
इंद्रजित नव्हे निधडा वीर । कपटें करोनि अभिचार ।
रणी जिंतिले सुरासुर । तैसा रघुवीर न जिंकवे ॥३८॥

स्थापयामास रक्षांसि रथं प्रति समंतत ।
सर्वतोऽग्निं समास्तीर्य शस्त्रापात्रैः सतोमरैः ॥२॥
जुहाव रक्तं कृष्णस्य कंठाच्छागरय जीवतः ।
सकृदेव समिद्धस्य विधूम्रस्य महार्चिषः ॥३॥
ततस्तं हुतभोक्तांरं हुतभुक्सदृशप्रभः ।
जुहुवे राक्षसश्रेष्ठो विधिवन्मंत्रसत्तमैः ॥४॥
जहविर्लाजसत्कारैर्माल्यगंधसुसंयुतैः ।
जुहुवे पावकं तत्र राक्षसेद्रः प्रतापवान् ॥५॥

निकुंबिळेत इंद्रजिताचा अभिचार प्रयोग :

करावया अभिचारासी । इंद्रजित आला निकुंबळेसीं ।
तरी धाकत मानसी । कळल्या रामासी येईल धाडीं ॥३९॥
यालागी निकुंबळेपासीं । द्वारद्वार मार्गमार्गासीं ।
राखण ठेविले राक्षसांसी । ससैन्यासीं सावध ॥४०॥
श्रीरामाच्या कर्णपुटी । बिभीषण हे सांगता गोष्टी ।
वानरधाड येईल लाठी । हेंही पोटी धाकत ॥४१॥
वारयासी न फटे वाट । ऐसी राखणे ठेवोनि स्पष्ट ।
आपण सेविले यज्ञवाट । हव्यवाटप्रतिष्ठा ॥४२॥
नागबाण शिववरदोक्त । मागा बांधिले राजसुत ।
ते तैंच जाले भस्मांत । श्रीरघुनाथप्रतापें ॥४३॥
श्रीरामी मिनली शस्त्रदेवता । ते परतोन न येचि हाता ।
इंद्रजित होय कुसुमुसिता । गेले वृथा नागपाश ॥४४॥
वृथा गेले नागबंधन । आता उरले ब्रह्मवरदान ।
त्या ब्रह्मपाशाचें बंधन । सावधान अवधारा ॥४५॥
ब्रह्मवरदान इंद्रजितासी । होम करिता अभिचारासीं ।
होमदेवता तत्काळेसीं । होईल तुम्हांसी सुप्रसन्न ॥४६॥
मागा शरबंध – परिपाटीं । बंदी घातल्या देवकोटी ।
ते न चले श्रीरामी गोष्टी । सावधानदृष्टी शरबंधी ॥४७॥
श्रीरामी न चले अभिचारिक । येता देखे शरबंधासंमुख ।
इंद्रजित हो दशमुख । छेदील मस्तक राक्षसाचें ॥४८॥
यालागी शरबंधासमोर । येतांचि निशाचर ।
श्रीराम त्याचे छेदील वक्त्र । अतर्क्य शर वर्षोनी ॥४९॥
शस्त्रदेवतेसी देवोनि मान । शरबंधीं पडिले आपण ।
त्यांसी न लागे शरबंधन । नित्यसावधान श्रीराम ॥५०॥
हे ब्रह्मयाची ब्रह्मवरदोक्ती । पूर्वीच सांगितली होती ।
तोचि अभिचारस्थिती । आरंभी पुढती इंद्रजित ॥५१॥
रिघोनिया यज्ञवाटा । प्रतिष्ठोनि हव्यवाटा ।
होमसामग्रीची निष्ठा । निंद्य पापिष्ठा ते ऐका ॥५२॥
द्विजकपाळीची जाण । प्रणितापात्रें संपूर्ण ।
असितोमरादि धनुष्यबाण । परिस्तरण शस्त्रांचें ॥५३॥
मद्याचे परिसमूहन । मातंगमज्जाआघारण ।
अशुद्धाचा होम जाण । तोही सावधान अवधारा ॥५४॥
निखळकृष्णच्छाग खरा । तोही जीवंत असता पुरा ।
त्याचे कंठी देवोनि सुरा । धरिळें रुधिरा नरशिरीं ॥५५॥
स्त्रुक्स्त्रुवापात्रविचार । घडविलेसे अश्मसार ।
तेणे स्त्रुवेनें निशाचार । होमी रुधिर हुताशीं ॥५६॥
अस्त्रदेवता आव्हानून । मंत्रतंत्रक्रियाविधान ।
सर्व साधून सावधान । करी हवन इंद्रजित ॥५७॥
मातंगीचे आणून दर्शन । त्यांच्या लाह्या केल्या भाजून ।
गोरोचनाचें गंधविधान । सुमनें संपूर्ण करवीर ॥५८॥
सर्षपभल्लातकमद्येंसीं । काळीचिडी दिवाभीतांसी ।
जीतचि खिळणीं करोनि त्यांसी । होमिजे राक्षसी अभिचारिक ॥५९॥

इंद्रजिताला होम – समाप्तिनंतर ब्रह्मवरदानाची अदृश्य रथप्राप्ती :

होम करिता प्रधान । यज्ञभोक्ता जो हुताशन ।
संतोषोनि आपण । ब्रह्मवरदान देता जाला ॥६०॥

सोऽस्त्रमाहारयामास ब्राह्ममस्त्रविदां वरः ।
धनुः शरान्‍रथं चैव सर्वं तत्राभ्यमंत्रयत् ॥६॥
तस्मिन्नाहूयमाने‍ऽस्त्रे हूयमाने च पावके ।
सार्कं ग्रहेंदुनक्षत्रं वितत्रास नभ स्थलम् ॥७॥
स पावकं पावकदीप्ततेजा । हत्वा महेंद्रप्रतिमप्रभावः ।
स चापबाणासिरथाश्वशूलः । खें‍ऽतर्दधेऽत्मानमचिंत्यरुपः ॥८॥

ब्रह्मवरदाचें वरदान । करिता ब्रह्मास्त्र‍आवाहन ।
स्वये शस्त्रदेवता येऊन । सुप्रसन्न होसरली ॥६१॥
त्याचेनि मंत्रोदकें जाण । रथखड्गादि धनुष्यबाण ।
अवघी अभिमंत्री आपण । इंद्रजित जाण मंत्रोक्त ॥६२॥
होम करिता प्रधान । मंत्रोदकें अभिषिंचन ।
रथाश्व सारथि चाप बाण । अंतर्धान पावलीं ॥६३॥
देवता अंतर्धानगती । इंद्रजित हरिखला चित्ती ।
सांडून सैन्यभारसंपत्ती । बैसला रथी साटोपे ॥६४॥
अंतर्धानाचे लक्षण । रथाश्व सारथि चापबाण ।
स्वये इंद्रजित आपण । कोणासी जाण न दिसती ॥६५॥

इंद्रजिताला वरदान मिळाल्याने देवादिकाना चिंता :

ऐसिये अदृश्यगतीं । देखोनि इंद्र चंद्र बृहस्पती ।
सूर्य वरुण ग्रहपंक्ती । धरा कांपती सपर्वत ॥६६॥
इंद्रजिताची अदृश्य गती । कैसेनि वांचे रघुपती ।
स्वर्गी सुरवर गजबजिती । ऋषी धाकती ससिद्ध ॥६७॥

इंद्रजिताचे अदृश्यगतीने आक्रमण :

ऐसिये अदृश्यगतीं । इंद्रजित बैसोनियां रथी ।
धनुष्य वाहोनिया हाती । वानरांप्रती शर वर्षे ॥६८॥

ततः सरक्षोऽधिपतिर्महात्मा । सर्वा दिशो बाणगणैः शिताग्रैः।
प्रच्छादयामास रविप्रकाशैर्विद्रावयामास च वानरेंद्रान् ॥९॥
सशूलनिस्त्रिंशपरश्वधानि । दीप्तानलार्कद्युतिसन्निभानि ।
सविस्फुलिंगोज्‍ज्वलपावकानि । ववर्ष तस्मिन्प्लवगेंद्रसैन्ये ॥१०॥

अदृश्यगतीं निशाचर । बाण वर्षे शरधार ।
आच्छादोनि रवि चंद्र । दिशा समग्र बाणाकुळित ॥६९॥
बाण येता न दिसती । अवचितें अंगी आदळती ।
तेणे वानरा खडतरती । रणी पडती आक्रंद्रें ॥७०॥
वानरांची जाति व्यक्ती । रणी खिळले शरसंपाती ।
अदृश्य गतीची व्युत्पत्ती । वानरा ख्याती लाविली ॥७१॥
संमुख योद्धा न दिसे जाण । कोणासी हाणूं द्रुमपाषाण ।
कोणासीं करु आंगवण । म्हणतांचि बाण खडतरती ॥७२॥
ऐसे वर्षोनि शरजाळ । वानरांचे प्रबळ दळ ।
रणी खिळोनियां ते सकळ । पाडिलें विकळ रणभूमीं ॥७३॥
अदृश्यगति सस्त्रसंभार । परशु पट्टिश गदा मुद्‌गर ।
शूळ परिघ तोमर । रणी वानर खोंचले ॥७४॥
अदृश्य विंधी वानरवीरां । लाविला मेघनादें दरारा ।
विंधिल्या मुख्य धुरा । त्याही अवधारा सांगेन ॥७५॥
अदृश्य विंधी इंद्रजित । खवळोनि अत्यद्‍भुत ।
मुख्य धुरांचा करित घात । अकस्मात अतर्क्य ॥७६॥
अदृश्य रथाश्वसारथी । अदृश्य इंद्रजित महारथी ।
बाण येता न दिसती । अंगी वाजती अतर्क्य ॥७७॥
सुग्रीव राजा हनुमंत । अंगद नळ नीळ जांबवंत ।
रणी पाडिले मूर्च्छित । अतर्क्य घात महावीरां ॥७८॥
येता न दिसती बाण । जरी करावे निवारण ।
योद्धा संमुख न दिसे जाण । आंगवण करावया ॥७९॥
मैंद द्विविद गंधमादन । केसरी दधिमुख सुषेण ।
कुमुद कुमुदाक्ष जाण । मूर्च्छापन्न पाडिले ॥८०॥
गज गवय गवाक्ष । हरिलोमा पावकाक्ष ।
विद्युज्जिव्ह उल्कामुख । पाडिले असंख्य मूर्च्छित ॥८१॥
असंग वेगवंत पनस । धूम्र शतबली ज्योतिर्मुख ।
सूर्यानळ आणि सुमुख । बाणी असंख्य पाडिले ॥८२॥
करावया इंद्रजितसंहार । तार तरळ हरि वानर ।
गगना उसळले सत्वर । रावणकुमर वधावया ॥८३॥
अतर्क्य बाणांचा आघात । शर भेदले हृदयांत ।
तेंही घायीं विव्हळत । मूर्च्छान्वित पाडिले ॥८४॥
अतर्क्य शरांचा महामार । आणिकही वानरवीर ।
पाडून शरबंधी समग्र । हर्षे निर्भर इंद्रजित ॥८५॥
शरबंधी वानरमात्र । रणी पाडिले समग्र ।
आता वधावया रामसौ‍मित्र । निशाचर खवळला ॥८६॥
संमुख देखता रघुनाथ । निमिषार्धे करील घात ।
अतर्क्य ब्रह्मवरदांत । भोगी पुरुषार्थ इंद्रजित ॥८७॥

इंद्रजिताचे श्रीरामांवर शरसंधान :

ब्रह्मवरदाचें ब्रह्मास्त्र । होमी साधून अभिचार ।
तेणे बळे इंद्रजितवीर । रणी वानर पाडिले ॥८८॥
होमी तोषवोनि हुताशन । लावोनियां वरद बाण ।
घेवोनि ब्रह्मास्त्राचें वरदान । वानरसैन्य पाडिलें ॥८९॥
सौ‍मित्रा सांगे रघुनंदन । पूर्विलाऐसे शरबंन ।
कराया इंद्रजित आपण । वरदबाण वर्षत ॥९०॥
वानर माझेनि वीर्यवंत । माझेनि धैर्ये धैर्यवंत ।
माझेनि प्रतापें प्रतापवंत । ब्रह्मवरदें समस्त पडले ॥९१॥
वरदबाण अति गुप्त । अंगी लागती अकस्मात ।
तेणे घाये कपि समस्त । रणी हुंबत पाडिले ॥९२॥
अतर्क्य ब्रह्मवरदविंदान । न दिसे योद्धा न दिसती बाण ।
अदृश्य शस्त्री वानरगण । शरबंधनी जाण बांधिले ॥९३॥

श्रीरामांच्या सूचनेप्रमाणे इंद्रजिताच्या बाणांचे निवारणार्थ धरणीवर पडले :

मंत्र अस्त्र ब्रह्मास्त्रदेवो । मिळोनि तिहींचा समुदावो ।
कपि शरबंधी बांधिले पहाहो । सांगे रघुरावो सौ‍मित्रा ॥९४॥
ब्रह्मवरदबाणधारा । शरबंधी बांधल्या वानरा ।
मुख्य उरल्या दोन धुरा । बांधावया शरा वषर्त ॥९५॥
आम्हा उभे असता दोन्ही । इंद्रजित विंधील विकट बाणी ।
ते निवरावया धरणी । शरबंधनी पहुडावें ॥९६॥
मागा सहिलें शिववरदान । तैसेंच सहावे ब्रह्मवरदान ।
मिथ्या करिता ब्रह्मवचन । दोष दारुण सौ‍मित्रा ॥९७॥
मिथ्या करिता नये ब्रह्मवचन । दोष ब्रह्महत्येसमान ।
यालागी ब्रह्मवरदान । स्वये आपण पाळावें ॥९८॥
अवमानितां ब्राह्मणासी । क्षोभ उपजेल भगवंतासीं ।
मिथ्या करिता ब्रह्मवरदासी । परम दोषी होइजें ॥९९॥
समूळ मूळीचें लक्षण । आम्हा दोघांसी नाही मरण ।
साहतां ब्रह्मशरबंधन । संदेह कोण सौ‍मित्रा ॥१००॥
ऐकता श्रीरामाचे वचन । शरबंधी पहुडे लक्ष्मण ।
त्याची सवे रघुनंदन । शरबंधी जाण पहुडला ॥१॥

रामलक्ष्मण शरबंधनात पडलेले पाहून इंद्रजिताचे लंकेत आगमन :

सव्यहस्तें धनुष्यबाण । दोघे देखोनि विसंज्ञ ।
इंद्रजित हरिखला संपूर्ण । भेरी निशाण त्राहाटिले ॥२॥
करोनिया वाजंत्राचा गजर । पुढे नाचती निशाचर ।
रणी जिंतिले रामसौ‍मित्र । सांगे समग्र लंकेशा ॥३॥

संस्तूयमानः स तु यातुधानै पित्रे च सर्वं हृषितोऽभ्युवाच ।
तयोस्तदासादितयो रणाग्रे मुमोह सैन्यं हरियूथपानाम् ॥११॥
सरामसौ‍मित्रिमथाप्रमेयं विव्याध सर्वं सहसा रणाग्रे ।
सर्वे विषण्णा विगतप्रभाश्च न चापि किंचित्प्रतिपेदिरे स्म ॥१२॥

शरबंधेंसीं बांधोनी वैरी । इंद्रजित प्रवेशतां नगरी ।
भाट गर्जाती कैंवारी । निशाचरी स्तुतिवाद ॥४॥
शरबंधी रामसौ‍मित्र । बांधिले वानर समग्र ।
इंद्रजित हर्षे निर्भेर । सांगे सत्वर लंकेशा ॥५॥
शरबंधी बांधितां जाण । वीर्यधैर्यक्षीण ।
मुख्य करोनी रामलक्ष्मण । आंगवण न करवे ॥६॥
शरबंधाचें लक्षण । लागतांचि सूर्यकिरण ।
अवघियांचे जातील प्राण । कोणासी कोण सोडवील ॥७॥
श्रीरामकटकीं शरपंजर । शरबंधी बांधले वानर ।
इंद्रजित विजयी महावीर । वर्षे निर्भर लंकेश ॥८॥
एका जनार्दना शरण । मिथ्या शरबंधी रामलक्ष्मण ।
स्वये पडोनि आपण । ब्रह्मवरदान प्रतिपाळिती ॥१०९॥
स्वति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे । एकाकारटीकायां
रामलक्ष्मणशरबंधनं नाम द्वात्रिंशत्तमोऽध्यायः ॥३२॥
ओंव्या ॥१०९॥ श्लोक ॥१२॥ एवं ॥१२१॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग