॥ श्रीएकनाथमहाराजकृत
3.
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
अयोध्याकाण्ड
॥ अध्याय तिसरा ॥
दुष्ट मंथरेचा कैकेयीवर प्रभाव
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
रामराज्याभिषेक निश्चितीमुळे इंद्रादिकास चिंता, त्या देवांची ब्रह्मदेवाला विनंती :
श्रीरामराज्यभिषिंचन । तेणे इंद्रादिका चिंता गहन ।
समस्त देवी मिळॊनि जाण । चतुरानन विनविला ॥१॥
देव म्हणती ब्रह्मयासी । तुझे आश्वासन आम्हांसी ।
राम अवतरला सूर्यवंशी । तो रावणासी वधील ॥२॥
सपुत्र सबंधु सप्रधान । राम करील राक्षसकंदन ।
तेणे देवांस बंधमोचन । ते मिथ्या वचन होऊ पाहे ॥३॥
सत्य करी आपुलें वचन । आमुचे करी बंधमोचन ।
आमचे आपत्तीचे विंदान । सावधान अवधारी ॥४॥
इंद्र बारी चंद्र छत्रधारी । यम पाणी वाहे घरी ।
वायु सर्वदा पूजे ओसरी । विधि तेथे दळकांडा ॥५॥
अश्विनी सूनू दोनी । तिही परिमळ द्यावे स्त्रियांलागुनी ।
विलंब होता अर्ध क्षणी । दासी धांवोनि धुमसिती ॥६॥
माको असे तराळी । सटवी बाळती प्रक्षाळी ।
रात्री जागर घाली कराळी । मेसको वळी शोभनिका ॥७॥
मैराळ देव कानडे । करिती राक्षसांच्या दाढ्याखाडें ।
आरसा न दाविती जयापुढें । तोचि रोकडे बुकाळी ॥८॥
नवग्रहांची पीडा गाढी । ते रावणे घातले बांधवडी ।
पायी घालोनिया बडी । पायरीबुडीं अडकविले ॥९॥
राहू केतू शनि अंगारी । त्यांची पीडा सुरासुरी ।
रावणे करूनियां पायरी । मंचकावरी वेंधतू ॥१०॥
विघ्न राहू न शके जयापुढें । तो गणेश होवोनि बापुडे ।
गाढवांचे कळप गाढे । चहूकडे वळीतसे ॥११॥
अग्नीस पापदा बहुवस । रावणाचे मैळे असोस ।
नानापरींचे स्पर्शदोष । धूत अहिर्निशीं धुपधुपित ॥१२॥
उदकक्रिया वरुणाहाती । व्यजनसेवा नित्य वसंती ।
निरोप सांगावया बृहस्पती । प्रजापति शांतिपाठक ॥१३॥
ऐसे आम्ही देव समस्त । रावणाचे नित्यांकित ।
लंकेसि आलिया रघुनाथ । बंधनिर्मुक्त करील ॥१४॥
राघवासी राज्याभिषिंचन । तै त्यासी न घडे लंकागमन ।
आमचें नव्हे बंधमोचन । अति दीन वदताती ॥१५॥
विघ्न करण्यासठी ब्रह्मदेवाची विकल्पास आज्ञा :
ऐकोनि देवाची विनंती । ब्रह्मा विचारी नि्जचित्तीं ।
राज्याभिषेकासी विघ्नप्राप्ती । ते दृढयुक्ती योजिली ॥१६॥
अविद्येचा अति लाकडा । कार्यनाशासी अति नेटका ।
विघ्न करावया रामाभिषेका । विकल्प देखा धाडिला ॥१७॥
विकल्पाच्या अडचणी :
विकल्प म्हणे ब्रह्मदेवा । पट्टाभिषेक श्रीराघवा ।
तेणे माझा कोण केवा । सर्वथा रिघावा नव्हे माझा ॥१८॥
जेथे श्रीरामाचे नाम । ते स्थान मजसी अति दुर्गम ।
रामराज्यासी विघ्न परम । ते कर्म मज ठाकेना ॥१९॥
श्रीरामाचे राज्य जेथ । विकल्प केंवी रिघे तेथ ।
श्रेष्ठा सर्वज्ञा तू समर्थ । श्रीरामी पुरुषार्थ न चले माझा ॥२०॥
ब्रह्मदेवाचे रहस्यकथन :
ब्रह्मा सांगे गुह्य गोष्टी । न पडोनि श्रीरामाचे दृष्टी ।
रिघावे मंथरेचे पोटी । विकल्पपुष्टी तीमाजी ॥२१॥
मंथरा कैकेयीची आंदणी दासी । ते दासी भरतराज्या अभिलाषी ।
ते सदा श्रीरामाते द्वेषी । सापत्नभावेंसी अति दृष्ट ॥२२॥
जेंथे श्रीरामाचा द्वेष । तेथे विकल्पवस्ती सावकाश ।
तीमाती करोनिया प्रवेश । करी विध्वंस अभिषेका ॥२३॥
विध्वंसोनि अभिषेकासी । राज्याभिषेक भरतासी ।
श्रीराम करावा वनवासी । या कार्यार्थासी शीघ्र करी ॥२४॥
कलिंगणफळाच्या द्वारे मंथरेच्या शरीरात प्रवेश, विकल्पाचा तिच्यावर प्रभाव :
विकल्प म्हणे वचन सत्य । मंथरा वसे अयोध्येआंत ।
माझा प्रवेश नव्हे तेथ । केंवी कार्यार्थ साधेल ॥२५॥
ब्रह्मा सांगे विकल्पासी । नगराबाहेरवनक्रीडेसी ।
मंथरा येईल आरामासीं । तुझ्या प्रवेशासी तेथे संधी ॥२६॥
विकल्प लागे ब्रह्मयापायीं । प्रवेशेन मंथरादेहीं ।
वश्य करोन कैकेयी । तरी राज्य नाही भरतासी ॥२७॥
श्रीराम ज्येष्ठ भरत कनिष्ठ । कैसेनि घडेल राज्यपट ।
वचन न मानिती वरिष्ठ । ज्येष्ठ श्रेष्ठ निजज्ञाते ॥२८॥
ब्रह्मा म्हणे विकल्पासी । तू सर्वज्ञ ज्ञात होसी ।
भरत पावे रघुराज्यासी । त्या वर्माची मी सांगेन ॥२९॥
दशरथें निजभाकेसीं । दोन वर दिधले कैकेयीसी ।
एके वरें श्रीराम वनवासी । एके भरतासी राज्यपट ॥३०॥
ऐकोनि ब्रह्मयाची गोष्टी । विकल्प बांधी शकुनगांठी ।
संचरावया मंथरेपोटी । अति संकटी चालिला ॥३१॥
अयोध्या देखोनि रामप्रतापें । विकल्प धाके चळी कापें ।
तेथींचा तेथे स्वये लपे । श्रीरामदर्पें साशंक ॥३२॥
गुप्त रहावया बुडी । लपे हिवराचिया खोडीं ।
निळीची सुनीळ झाडी । देवोनि दडी स्वये राहे ॥३३॥
म्हणॊनि ती झाडे जाण । अपवित्र म्हणती सज्जन ।
ते ते विकल्पाचे स्थान । विध्वंसन शुभकार्या ॥३४॥
या झाडा वेगळें काही । विकल्प स्पर्शावया ठाव नाही ।
यालागी ती निंद्य पाही । सर्व कार्यासी अपवित्र ॥३५॥
कलिंगफळी अपवित्र वस्ती । जे सेविती त्यां विकल्पप्राप्ती ।
मंथरेची त्या फळाची प्रीती । देखे अवसिती आरामीं ॥३६॥
मंथरा आली आरामासी । देखोनि कलिंगफळासी ।
ते जाले अति उल्लासी । सेवावयासी सादर ॥३७॥
कलिंगफळ आवडे भारी । सेविता अति प्रीतिकरी ।
विकल्प संचरला भीतरी । क्षणामाझारी व्यापिली ॥३८॥
मग विचारी हृदयांत अर्थ । पढियंतीचा सुत भरत ।
मागे अभिषेकी रघुनाथ ।
केवळ कुडा हा दशरथ । अति अनर्थ हा आम्हा ॥४०॥
राज्य आल्या श्रीरामासी । भरत होईल परदेशी ।
कैकेयी होईल कौसल्येची दासी । मग आम्हांसी सुख कैचें ॥४१॥
मंथरेचा रामाविषयी मत्सर, कुब्जा का म्हणतात ? :
ऐसी भावना भावूनी । रामराज्याचा द्वेष मनी ।
मंथरा क्रोधाग्नि होऊनी । कैकेयीभवनीं प्रवेशलीं ॥४२॥
मंथरा सहज श्रीरामाते द्वेषी । आंगण झाडी द्वेषभावेसीं ।
पुढे असता श्रीरामासी । रज त्यापासी लोटिलें ॥४३॥
श्रीराम म्हणे मंथरेसी । द्वेषे वरते का न पाहासी ।
ते तू अधोमुखी कुब्जा होसी । श्रीरामे तिसी शापिलें ॥४४॥
त्या शापाचे प्राप्तीसीं । पावली सत्वर आघातासी ।
यालागी कुब्जा हो तिसी । स्वभावेंसीं निजनाम ॥४५॥
रामराज्याचा आनंदसोहळा पाहून मंथरेचा थयथयाट :
रामराज्याचा सोहळा । जंव जंव मंथरा देखे डोळा ।
तंव तंव क्रोध चढे बळा । द्वेषाचा आगळा आक्रोश ॥४६॥
कैकेयीचे निजभवनीं । रामराज्याचा उल्लास मनी ।
गुढिया तोरणे ध्वजा सुमनीं । मंथरा देखोनि अति तप्त ॥४७॥
श्रीरामराज्यें उल्लासोनी । कैकेयी अलंकारभूषणीं ।
पर्यंकी विश्रांत ओटांगणी । दोघी जणी विडिया देती ॥४८॥
एकी घालिती विंजवणारा । तंव तेथे आली मंथरा ।
क्रोधे नेत्रे भोवंडी गरगरा द्वेषे थरथरां कांपत ॥४९॥
मंथरोवाच -
उत्तिष्ठ मूढे कि शेषे सौभाग्यबलगर्विते ।
उपप्लुतमद्यौघेन नात्मानमवबुध्यसे ॥१॥
अनिष्टे सुभगाकारे सौभाग्येन विकत्थसे ।
चलितं तव सौभाग्यं नद्याः स्त्रोत इवोष्णगे ॥२॥
मंथरा कैकेयीकडे जाते, क्रोधाचा अविष्कार :
मंथरा अति क्रोधेसीं । काय बोले कैकेयीसी ।
उठी मूढे काय जिनसी । सुख मानिसी ते दुःख ॥५०॥
रामराज्याचें मानिसी सुख । गुढियातोरणे अति हरिख ।
तेंचि तुज होय महादुःख । परी तू मूर्ख नेणसी ॥५१॥
मी रायाची पढियंती । रेणें गर्वे तुज पडली भ्रांती ।
सुभाग्य गेले कौसल्येप्रति । ते तू निश्चितिं नेणसी ॥५२॥
जळे केळी पोफळी वाढती । ते जळस्त्रोत आलिया मूळाप्रती ।
तेणेंचि ते वृक्ष उलथती । ते नाशस्थिति तुज आली ॥५३॥
ऐकोनि मंथरेची उग्रवाणी । कैकेयी सौभाग्यशिरोमणी ।
तिसी पुसे आश्वासोनी । क्रोध कैसेनि तुज आला ॥५४॥
कैकेय्युवाच-
कैकेयी त्वब्रवीत्कुब्जां कश्चित्क्षेमं न मंथरे ।
विषण्णवदनां हि त्वां लक्षये भृशदुःखिताम् ॥३॥
कैकेयीला आश्चर्य व जिज्ञासा :
कोणे तुज काय अपमानिलें । तुज कोणे काय गांजिलें ।
तुज कोणी काय बोलिलें । ते मज वहिले सांग पा ॥५५॥
तु माझी जिवलग होसी । कधी क्रोध न देखे तुजपासी ।
क्रोध सांडावा मज सांगसी । ते तू दुःखी होसी अति क्रोधे ॥५६॥
तुझे ठायी चिंता दरुण । चिंतेने मुख दिसे मळिण ।
ऐसे तुज दुःख कोण । ते मज संपूर्ण सांग पा ॥५७॥
तुज कोण बोलिलें दुष्ट मात । कोणे तुजकडे उचलिला हात ।
त्याचा करीन मी घात । समूळ वृत्तांत मज सांगे ॥५८॥
मंथरा तु वचः श्रुत्वा कैकेय्या मधुराक्षरम् ।
उवाच क्रोधसंयुक्ता वाक्यं वाक्यविशारदा ॥४॥
सास्म्यगाधे भय मग्ना दुःखशोकसमन्विता ।
दह्यमानानलेनेव त्वद्धितार्थमिहागता ॥५॥
मंथरेचे रामासंबंधी द्वेषाविष्करण :
ऐकोनि कैकेयीचें वचन । मंथरा जाली क्रोधायमान ।
तुज आले हो दारुण विघ्न । ते तू आपण नेणसी ॥५९॥
राजा दशरथ आपण । तुज छळितो संपूर्ण ।
त्याचे तू तेणसी लक्षण । पढियंतीपणें अति गर्वी ॥६०॥
तू गर्वित जे राज्यवैभवेंसीं । ते राज्य राजा देतो श्रीरामासी ।
वैभव गेले कौसल्येपासीं । तू नेणसी मूर्खत्वें ॥६१॥
तुज आले दुःख गहन । त्यामाजी मी अति निमग्न ।
तुझेनि दुःखे दह्यमान । तुझे मूर्खपण देखोनी॥६२॥
तुझिया वृद्धीं मी वर्धमान । तुझेनि सुखें मी सुखसंपन्न ।
तुझेनि दुःखे दुःखायमान । तुझेनि जाण अति संतप्त ॥६३॥
राजा वैभवलोभें तुजशीं । तेणेंचि राये तू ठकिजेसी ।
भरत दवडोनि मातुळासी । मागे रामासी राज्यपट ॥६४॥
राज्य दिधलिया श्रीरामासी । दास्यभोग तो भरतासी ।
सत्तासामर्थ्य कौसल्येसी । तू श्लाघसी मूर्खत्वें ॥६५॥
तू माझे वाक्य विवेके विवरी । होई भरतासी साहाकारी ।
आपले हित आपण करी । गर्वावारी ठकू नको ॥६६॥
भरतराज्यभिषेकाबद्दल कैकयीस परमानंद :
ऐकोनि मंथरेचें वचन । कैकेयी झाली सुखसंप्पन्न ।
रत्नखचित कंठाभरण । दिधले दान मंथरेसी ॥६७॥
कंठींचें पदक अमोलिक । मंथरेसी देवोनियां देख ।
रामराज्याचें सर्वासी सुख । तूंचि का दुःख मानिसी ॥६८॥
रामे वा भरते वाहं विशेषं नोपलक्षये ।
तस्मातुष्टास्मि यद् राजा रामं राज्योभिषेक्ष्यति ॥६॥
भरताहुनियां अधिक । राम प्रिय मज आत्यंतिक ।
तू मूर्खत्वें मानसी दुःख । मज महासुख रामराज्यें ॥६९॥
भरत इष्ट राम अनिष्ट । ऐंसे मानिती ते महापापिष्ठ ।
राम ज्येष्ठां अति श्रेष्ठ । राज्याभीष्ट श्रीराम ॥७०॥
जैसा भरत तैसाचि राम । मज तंव दोन्ही समसमान ।
कुब्जे तू का मानिसी विषम । मूर्ख परम तू एकी ॥७१॥
मंथरा कैकयीचा संवाद :
ऐकोनि कैकेयीचें वचन । कुब्जा क्रोधे मुर्च्छापन्न ।
कंठीचें काढोनि आभरण । दिधले टाकोन अति रागे ॥७२॥
राज्य गेले श्रीरामासी । वैभव गेले कौसल्येसी ।
ठकिले दशरथें तुजसी । सुख मानिसी मूर्खत्वे ॥७३॥
कुब्जा अति क्रोधे बोलत । कएकेयी तीतें संबोधित ।
राम रायाचा ज्येष्ठ सुत । अधिकार प्राप्त राज्याचा ॥७४॥
राम गुणी गुणगंभीर । त्रैलोक्यामाजी महाशूर ।
त्यासी राज्याच अधिकार । तू पामर रामद्वेषी ॥७५॥
राम भरतासी करील वोखटें । हे तंव काळ्त्रय़ीं न घटे ।
कुब्जे बोलसी तितुके खोटे । श्रीराम तू हट्टें द्वेषिसी ॥७६॥
ऐकोनि कैकेयीची गोष्टी । कुब्जा रागे कपाळ पिटी ।
तू एक मूढ या सृष्टी । राम राज्यपटीं बैसविसि ॥७७॥
कैकेयी नायके आपुले बोला । ऐसा मंथरेने निश्चय केला ।
तुणें दुःख न देखवे मजला । प्राण आपुला मी त्यागीन ॥७८॥
म्हणोनि गडबडा लोळे । केश सुटले मोकळे ।
कैकयी उठोवोनि तये वेळे । भावबळें आलिंगी ॥७९॥
क्षेम देता नवलपरी । विकल्प् होत मंथेरेउदरीं ।
तो रिघाला कैकेयीमझारीं । क्षणाभीतरीं अति वेगे ॥८०॥
हृदया हृदय लागता देख । दोही ठायी विकल्प् एक ।
वाढिन्नला आत्यंतिक । रामाभिषेकद्रुढद्वेषी ॥८१॥
मंथरा बोले कैकेयीप्रती । रामराज्य तुज अपघाती ।
ते तू न मानसी चित्ती । म्या तुज किती शिकवावें ॥८२॥
दास दासी तुज अनेक । परी ते दशरथी सेवक ।
तुज आत्पत्वे मीच एक । मजही मूर्ख तू म्हणसी ॥८३॥
सापत्नभावाचे शब्दचित्र :
सांपत्न ते केवळ शत्रु । तू हा न मानसी माझा मंत्रू ।
येचविषयीं शास्त्रविचारू । पूर्वापारूं सांगेन ॥८४॥
कश्यपापासूनि संभूत । सापत्नबंधु देवदैत्य ।
ते येरयेरांचा करिती घात । पुराणार्थ गर्जती ॥८५॥
येची अर्थीं वेदोक्ती । याज्ञवल्की महामूर्ती ।
बोलिला उपनिषदाप्रती । ते प्रचीति अवधारी ॥८६॥
देवासुरविमर्दाश्च श्नुता बहुविधा त्वया ।
स्वार्थास्वार्थं स्वमुद्दिश्य भ्रात्रा भ्राता बहिष्कृतः ॥७॥
भ्रातृणां एकजातानां एकद्रव्याभिलाषिणाम् ।
पिशुनानां न पश्यामि सौभ्रात्रं क्वचिदप्यहम् ॥८॥
एवं वेदशास्त्रविचारीं । सापत्न ते मुख्य वैरी ।
तुवांही पुराण परिसिलें घरी । ते तुज गर्वैकरीं नाठवे ॥८७॥
देव आपले स्वार्थसिद्धी । दैत्यांतें मारिती महायुद्धीं ।
दैत्य आपले हितावबोधीं । देवा ग्रासूं पाहती ॥८८॥
पाहे पा श्वानचियेपरी । भांडूं लागती एकाहारी ।
तैसा कलहो राजपुत्रीं । कैंची मैत्री सापत्नीं ॥८९॥
इंद्राचे दितीशी कपटवर्तन :
दिति देवांची सापत्नमाता । तिसी गरोदर असता ।
तिच्या गर्भाच्या करावया घाता । इंद्र विनीत सेवा करी ॥९०॥
पाहोनिया विषम संधी । इंद्र तिचा गर्भ वधी ।
वज्रें सप्तसप्तधा छेदी । केले विशुद्ध मरुद्रण ॥९१॥
यालागी सापत्नांसी थोर । स्वभावे सदा नित्य वैर ।
हा नेणसी तू विचार । मजचि पामर तू म्हणसी । ॥९२॥
कैकेयीवर झालेला विपरीत परिणाम :
ऐकोनि मंथरेचिया बोला । कैकेयीसी उल्लास जाला ।
राज्याभिषेक नव्हे भला । श्रीरामी धरिला दृढ द्वेष ॥९३॥
राम ज्येष्ठ भरत कनिष्ठ । कनिष्ठासी राज्यपट ।
वचन न मानी हे स्वये वसिष्ठ । तोही अति श्रेष्ठ निजज्ञानें ॥९४॥
जरी म्या राजा वश्य केला । तरी वसिष्ठ नायके माझ्या बोला ।
कनिष्ठा राज्यापट वाहिला । नाही बोलिला शास्त्रार्थैं ॥९५॥
वसुष्ठ सांगेल शास्त्रार्थ । तेथे काय करील दशरथ ।
अटक पडलिया वेदोक्त । राज्य भरत केंवी पावे ॥९६॥
मंथरेने सुचविलेली युक्ती :
मंथरा सांगे कैकेयीसी । जरी तू माझा बोल करिसी ।
राज्य साधीन भरतासी । क्षणार्धेसीं मी एक ॥९७॥
कैकेयी बोले पुढती । कोणे युक्ती राज्य भरतीं ।
साधिसील ते उपप्पती । यथानिगुतीं । मज सांगे ॥९८॥
वसिष्ठवामदेवादि ॠषी । राज्या मानितील भरतासी ।
ते तुज युक्ती आही कैसी । यथार्थेंसईं मज सांगे ॥९९॥
पूर्वीच्या दोन वरांची आठवण :
मंथरा बोले आपण । तुझी तुज नाही आठवण ।
राये करूनि भाषप्रमाण । दोन वर पूर्ण दिधले ॥१००॥
ते दोन वर रायापसीं । मागावे ये संधीसीं ।
एके राम वनवासी । एके भरतासी राज्यपद ॥१०१॥
पूर्वदत्त मागतां आम्हासीं । कांही न बोलवे वसिष्ठासि ।
नेदीं न म्हणवे दशरथासी । नजभाकेसी गुंतला ॥२॥
ऐकोनि मंथरेचें वचन । कैकेयीसी विस्मय पूर्ण ।
कुब्जे तुं तंव अति सज्ञान । वरद स्फुरण तुज आले ॥३॥
मज रायाचे वरदान । परी माझी मज नाही आठवण ।
त्याचे समयी स्फुरलें ज्ञान । अति सज्ञान तू कुब्जे ॥४॥
मंथरा म्हणे कैकेयीसी । तुझेनि विजयो दशरथासी ।
हात घातला रथांकासी । केंवी दुःखासी साहवलें ॥५॥
संग्रामी रथचक्राच लोट । तुझा बाहू व्हावा पीठ ।
कैसेनि धरवला नेट । ते मज स्पष्ट सांगा पा ॥६॥
कैकेयीला बालवयात अवमानित ऋषिकडून शाप व उःशाप :
ऐकता मंथरेचा प्रश्न । कैकेयी उल्लासे संपूर्ण ।
सांगे ऋषीचें शापवचन । आणि वरदान तयाचे ॥७॥
पितृगृहीं मज बाळपण । तेथे आला ॠषि सज्ञान ।
कुशासन कुशावरण । आणि आभरण कुशांचें ॥८॥
दृद्ध जटिल रोमांचित । म्या तेथे केले वो अनुचित ।
वाकुल्या दाविल्या अति निंदित । तरी क्षमायुक्त महाऋषि ॥९॥
उगे देखोनिया ऋषींसीं । म्या त्यचिये नाकी लाविली मसी ।
क्षोम पावोनिया तापसी । अति आवेशी शापिलें ॥११०॥
नानापरी तू मज निंदिसी । ते तू जगी निंद्य होसी ।
उश्शाप मागावया त्यासी । बाळभावेंसीं मि नेणे ॥११॥
मसी लाविली माझे तोंडी । ते तू जगी होसील काळतोंडी ।
अपेशाची उभवोनि गुढी । निंद्यत्वें रोकडी नादशील ॥१२॥
देवपूजा विसरला शोभोक्तीं । ते म्या दिधली त्याचे हाती ।
तेणे वदला तो वरदोक्ती । ऐक तुजप्रती सांगते ॥१३॥
येणेंचि हातें भ्रतारासी । संग्रामी तू साह्त होसी ।
वररद्वय पतिपासीं । तू पावसी राजबळें ॥१४॥
रथचक्री तुझा हात । संग्रामी न होईल व्यथाभूत ।
होईल विजयी तुझा कांत । ऐसा वरदार्थ वदला ऋषी ॥१५॥
याउपरी मज आता । पुढे काय कर्तव्यता ।
मंथरे सांगसी ज्या ज्या अर्था । तो तो सत्वता मी करीन ॥१६॥
कुब्जेकडून कैकेयीला शिकवण :
ऐकोनि कैकेयीचे बोल । कुब्जा विचार सांगे सखोल ।
तुवाम् कोप करावा प्रबळ । मुख्यत्वें केवळ रायावरी ॥१७॥
सांडोनिया दिव्याभरणासी । मुक्तकेश मळिणवासी ।
तुवा रिघावे प्रायोपवेशीं । वरद्वयासी मागावया ॥१८॥
राजा येईल तुजपासी । मुख न दाखवावे तयासी ।
काही न बोलावे तयासीं । अति निश्चयेंसी क्षोभवावें ॥१९॥
राजा देईल सुवर्णमेरू । अथवा रत्नांचा सागरू ।
ते तू न करींच अंगीकारूं । वरदविचारू सांडोनी ॥१२०॥
राज्यपट द्यावा भरता । वनवास द्यावा श्रीरघुनाथा ।
त्याही वनवासाची कथा । ऐक आता सांगेन ॥२१॥
अयोध्येनिकट वनाआंत । वनवासी जलिया रघुनाथ ।
प्रजा समस्त जातील तेथ । उद्वसी भरत केवी राजा ॥२२॥
राम अति प्रिय प्रजांसी । राम आवडे प्रधानांसी ।
अवघे जातील तयापासी । मग भरतासी राज्य कैचें ॥२३॥
दंडकारण्य दूर देशी । गंगातीरी राम वनवासी ।
श्रीरामाची वार्ता अयोध्येसी । कदाकाळेंसी न यावी ॥२४॥
अयोध्येची कथावार्ता । रामे नायकावी सर्वथा ।
ऐसे जालिया तत्वता । राज्य भरता भोगेल ॥२५॥
मंथरेला इनाम :
ऐकोनि मंथरेची युक्ती । उल्लास कैकेयीच्या चित्ती ।
आलिंगली दोही हाती । अति प्रीती सद्भावे ॥२६॥
रागे सांडिलें होते पदक । ते स्वये लेवविलें देख ।
कानींची कुंडले अमोलिक । दिधली आवश्यक अति प्रीती ॥२७॥
भरता अभिषेकिलियापाठीं । सुवर्णे मढीन तुझी पृष्ठी ।
रत्नखचित टिळक ललाटीं । घालीन कंठी मुक्तामाळा ॥२८॥
कैकेयीचा क्रोधागारात प्रवेश :
अनुमोदूनि मंथरेसी । कैकेयी निघाली प्रायोपवेशीं ।
सांडोनि अलंकारवस्त्रांसी । मळिणवासासीं भूमिशय्या ॥२९॥
आता येवोनि दशरथ । पुसेल कैकेयीचा स्वार्थ ।
वना निघेल रघुनाथ । तोही कथार्थ अवधारा ॥३०॥
एकाजनार्दना शरण । देवकार्यार्थ संपूर्ण ।
वना निघेल रघुनंदन । दशवदनवधार्थ ॥१३१॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकाया
कैकेय्या मंथरोपदेशो नाम तृतीयोऽध्यायः ॥३॥
॥ ओंव्या १३१ ॥ श्लोक ८ ॥ एवं १३९ ॥
