वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 7. संत एकनाथ भावार्थ रामायण › २. अयोध्याकाण्ड - अध्याय १८ › १०. श्रीरामाचा मातांना निरोप

॥ श्रीएकनाथमहाराजकृत

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088205 · अभंग क्र. १०

10.

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अयोध्याकाण्ड

॥ अध्याय दहावा ॥
दशरथाचे प्राणोत्क्रमण

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

गुहकाकडे सुमंताचा मुक्काम :

येरीकडे सुमंत गुहक । श्रीराम गेलियावरी देख ।
रामविरहे पावले दुःख । तोचि श्लोक अवधारा ॥१॥

कथयित्वा तु दुःखार्तः सुमंत्रेण चिरं सह ।
गंगपारे गते रामे जगाम स्वपुरं गुहः ॥१॥
भरद्वाजाभिगमनं प्रयागे च सभाजनम् ।
अगिरेर्गमनं तेषां तत्रस्थैरभिलक्षितम् ॥२॥
अनुज्ञातःसुमंत्रोथ योजयित्वा हयोत्तमान् ।
अयोध्यामेव नगरी प्रययौ गाढदुर्मनाः ॥३॥

पुसोनि सुमंता गुहकासी । श्रीराम बैसोनि नावेसी ।
गेलिया गंगापरतीरासी । लागली दोघांसी टकमक ॥२॥
न लागता पातया पातीं । दोघे श्रीरामासी पाहती ।
दृष्टी अंतरल्या रघुपती । दोघे पडती मूर्च्छित ॥३॥
जरी दोघे जाले सावधान । तरी रामविरहें अति दुर्मन ।
अश्रुधारा वाहती नयन । करिती स्मरण रामनामे ॥४॥
वाचे रामनामस्मरण । रामरूपी जडले नयन ।
हृदयी धरलिया रघुनंदन । दुर्मन ते सुमन होय श्रीरामे ॥५॥
गुहक म्हणे सुमंतासी । राम भेटल्या एक निशी ।
आम्हांसी अवस्था जालि ऐसी । मग अयोध्येसी काय होय ॥६॥

दूतांतर्फे श्रीरामाच्या निवासाची माहिती :

गुहकें धाडिलें दूतासी । श्रीराम कोणे वनवस्तीसी ।
स्थिर होईल वनप्रदेशीं । त्या वार्तेसी आणावया ॥७॥
गुहकें आपुलिया ग्रामासी । आदरे आणिले सुमंतासी ।
दूत आणितील वार्तेसी । तोंवरी त्यासी राहविलें ॥८॥
दूत सांगती गुहकासी । श्रीराम जावोनि प्रयागासी ।
भेटी देवोनि भारद्वाजासी । स्थिरनिवासी चित्रकूटीं ॥९॥
सुमंते ऐकोनि वार्ता । वेगी संजोगोनी रथा ।
गुहका पुसोनि तत्वता । होय निघता अयोध्येसी ॥१०॥

सुमंत्रमभिधावंतः शतशोऽध सहस्त्रशः ।
क्व राम इति पृच्छतः सूतमभ्यद्रवन्नराः ॥४॥

सुमंताचे अयोध्येत परत येणे, तेथील विलाप :

सुमंत आला देखोन । धार्विनले नागरिक जन ।
सांग रामा कोणे स्थळी सोडून । तुझे आगमन सुमंता ॥११॥
सुमंत एकासी सांगे गोष्टी । तंव आले शतसहस्त्र लक्षकोटी ।
रिता रथ देखोनि दृष्टी । पडिले सृष्टी मूर्च्छित ॥१२॥
नरनारी आक्रदंत । सुमंत नव्हे हा कुमंत ।
वनी सांडोनि रघुनाथ । आला येथे काळतोंडा ॥१३॥
सुमंत आलियावरी । आकांत मांडिला नगरी ।
चरफडित नरनारी । घरोघरी आरडती ॥१४॥
जळॊ याचे काळे मुख । आला नगरा द्यावया दुःख ।
निंदिती सकळ लोक सन्मुख । अधोमुख सुमंत ॥१५॥
राजपत्‍न्या शते सात । रिता देखोनिया रथ ।
त्याही सुमंताते निंदित । सोडोनि रघुनाथ हा का आला ॥१६॥
रामापासून उफराटा । मी का आलो करंटा ।
दुखें पिटित ललाटा । धिक् धिक् अद्दष्टा निर्लज्जा ॥१७॥
श्रीराम सांडिलियापाठीं । निंद्य होइजे सकळ सृष्टी ।
रामरूपी चळल्या द्दष्टी । पापे कोटी पदोपदी ॥१८॥

सुमंताला पाहून राजा बेशुद्ध :

निजनिंद्यत्वें स्वये निंदित । तेणेंचि दुःखे अति दुःखित ।
महाद्वारी सोडून रथ । आला सुमंत राजभवना ॥१९॥
पुत्रदुःखे दुःखी पूर्ण । गेली कळा हीनदीन ।
कृष्णवर्ण दिसे विवर्ण । अति उद्विग्न नृपनाथ ॥२०॥
एकला देखोनि सुमंत । म्हणे नयेचि का रघुनाथ ।
ऐसे बोलोनिया दशरथ । पडे मूर्च्छित धरणीये ॥२१॥

सुमंताकडून राजाला निवेदन :

मग सुमंतें आश्वासोन । राजा केला सावधान ।
आला सुमंत देखोन । काय आपण बोलत ॥२२॥

राजा तु रजसा सूतं ध्वस्तांगं समुपस्थितम् ।
अश्रुपूर्णमुखं दीनमुवाच परर्मातवत् ॥५॥
क्क नु वत्स्यति धर्मात्मा वृक्षमूलमुपाश्रितः ।
किमुवाच वचा रामः किमुवाच च लक्ष्मणः ॥६॥
सुमंत्र वनमासाद्य किमुवाच च मैथिली ।
आसितं शयितं भुक्तं सूत रामस्य कीर्तय ॥७॥

राजा म्हणे सुमंतासी । कोणे ठायी कोणे वस्तीसीं ।
राम काय बोलुनी तुजपासी । तुज मजपासीं पाठविले ॥२३॥
काय बोलली सती सीता । श्रीरामाची अति पढियंता ।
लक्ष्मण काय जाला बोलता । ते समूळ कथा मज सांगे ॥२४॥
सांडोनि राजभोग निजकांता । सांडोनिया मातापिता ।
वनी सेवूं गेला रघुनाथा । त्या लक्ष्मणापरता धन्य नाही ॥२५॥
धन्य ते सती सीता । धन्य तो लक्ष्मण भ्राता ।
धन्य जन्म श्रीरघुनाथा । पितृवचनार्था प्रतिपाळी ॥२६॥
त्यांसी कोठे मिळाले अन्न । तिही कोठे केले भोजन ।
अश्रुधारा गळती नयन । मूर्च्छापन्न पुनः पुनः ॥२७॥
तिही कोठे केले शयन । काय आस्तरण प्रावरण ।
कोणे केले चरणसंवाहन । प्रातर्बोधन कोणी केले ॥२८॥
त्यांची समूळ सांगे वार्ता । मी काय करू रे सुमंता ।
धीर न धरवे माझ्या चित्ता । श्रीरघुनाथावांचोनी ॥२९॥
श्रीराम सीता चालती चरणी । हे म्या विरुद्ध केली करणी ।
म्हणोनि गडबडा लोळें धरणी । कैकेयीवैरिणी वैर केले ॥३०॥
जंव जंव आठवी रघुनाथा । तंव तंव उभड न धरवे चित्ता ।
धीर न धरवे सर्वथा । हृदयस्फोटता होऊं पाहे ॥३१॥
त्यांचे वनवासाची वार्ता । वेंगी सांग रे सुमंता ।
काही सुख होईल चित्ता । श्रीरामकथा परिसोनी ॥३२॥

उत्तीर्णायां तु गंगायामहमामंत्र्य राघवम् ।
अनुज्ञातो निवृत्तोऽस्मि धार्मिकेण महात्मना ॥८॥

सुमंत सांगे रायासी । श्रीराम उतरतां गंगेसीं ।
रथ पाठविला तुम्हांपासीं । आपण वनवासी पदाभिगमन ॥३३॥
माझा पित अति वृद्ध जाण । माझे वियोगें दुःखे अति निमग्न ।
सुमंता त्यासी द्यावे आश्वासन । शीघ्र आगमन नेमांती ॥३४॥
चवदा वर्षे वनवासांती । मी येईन शीघ्र गती ।
ऐसे सांगविलें तुम्हांप्रती । मजहाती श्रीरामे ॥३५॥

वनवासात निराहार राहून तीन रात्र जलपान :

त्यांचे वनवासलक्षण । तृपर्णांचें आस्तरण ।
वल्कमांचे प्रावरण । प्रातर्बोधन पक्ष्यांचे ॥३६॥
तिही नाही केले भोजन । नाही केले फळभक्षण ।
त्रिरात्रीं तिघें जण । केले जळपान दिनांती ॥३७॥

दशराथाचा प्राणान्त करणारा विलाप :

ऐसी ऐकतांची गोष्टी । राय मूर्च्छित पडिला सृष्टी ।
दुःखे होत हृदयस्फोटी । ललाट पिटी आक्राशें ॥३८॥
गळी अडकला जेंवी मासा । तो जीवे न मरे चरफडी जैसा ।
दशरथाची तैसी दशा । मोहफांसीं विलपत ॥३९॥
सुमंता माझा पूर्वोपकार । तुज झाला असेल साचार ।
तरी रथी घालोनि रघुवीर । आणीं सत्वर मजपासीं ॥४०॥
श्रीराम भाक न सांडी सर्वथा । तो परतोनि न ये मागुता ।
मजचि वाहोनिया रथा । नेई तत्वता वनवासा ॥४१॥
काय करू मी सुमंता । श्रीरामासवे गेली गती ।
श्रीरामासवे गेली चित्तवृत्ती ।
श्रीरामासवे गेली मती । प्राण रामाप्रती जाऊ पाहे ॥४३॥
रामरूपी जडेल नयन । रामरूंपीं जडेल मन ।
रामापासी जातील प्राण । सत्य जाण सुमंता ॥४४॥

दशरथाचे ’राम राम’ म्हणतच दुःखद निधन :

श्रीरामाचे रुप गुण । आठवितां मूर्च्छा आली पूर्ण ।
मूर्च्छेसवें गेला प्राण । रामस्मरण करीतचि ॥४५॥
राम राम करिता स्मरण । स्वये दशरथे सांडिला प्राण ।
मन बुद्धि इंद्रिये जाण । रामार्पण तेणे केलीं ॥४६॥
आवडी श्रीरामी धरोइ पोटी । राम राम जपतां वाक्पुटी ।
देह त्यजोनि रामसृष्टीं । रिघे वैकुंठी दशरथ ॥४७॥
सप्रेम आवडी धरिला राम । दृष्टी न सोडी श्रीरामप्रेम ।
वाचे स्मरता श्रीरामनाम । मरणधर्म दशरथा ॥४८॥
मनी राम ध्यानी राम । नयनी राम वदनी राम ।
ऐसा स्मरता राम राम । प्राणोत्क्रमण रायासी ॥४९॥
करिता श्रीरामाचे स्मरण । विस्मरणासी आले स्मरण ।
तंव श्रीरामी जडला प्राण । देहनिर्वाण दशरथा ॥५०॥
श्रीरामाच्या अति प्रीती । देह त्यागिला भूपतीं ।
कौसल्या सुमित्रा जंव पाहती । तंव मरणप्राप्ती दशरथा ॥५१॥
जेंवी आरसा पालथा करिता । प्रतिरूप न दिसे पाहता ।
तेंवी श्रीराम वना जाता । राया दशरथा निजमृत्यु ॥५२॥
निःशेष पाझरलिया घटजळ । जेवी घटचंद्र लोपे तत्काळ ।
न देखता श्रीराममुखकमळ । मरे तत्काळ दशरथ ॥५३॥
सूर्य पावतां अस्तमाना । जेंवी अंधकार कोंदे गगना ।
तेंवी अंतरता रघुनंदना । पावला मरणा दशरथ ॥५४॥

कौसल्येचा विलाप :

रामविरहें उठाउठी । दशरथें सांडिली सृष्टी ।
राणिवसां बोंब उठी । कपाळ पिटी कौसल्या ॥५५॥
राम धाडिला वनसंकटीं । राय निघाला वैकुंठीं ।
कैकेयी पावली सुखसंतुष्टी । राज्यपटीं ते बैसो ॥५६॥
वना दवडिला श्रीरघुनाथा । निःशेष निमाला दशरथ ।
कैकेयीचा मनोरथ । सुखस्वार्थ पावला ॥५७॥

कैकेयीचा धिक्कार :

राज्यलोभें परम दुःख । त्याचा कैकेयीस हरिख ।
क्षुरे अभिषेका समस्तक । राज्यसुख भोगावया ॥५८॥
पतिअंतकाळीं काळे वक्त्र । त्यावरी मस्तकी धरा छत्र ।
शीस बोडोनि साचार । युग्मचामरें ढाळावीं ॥५९॥
पतीस आगी घालोनि आधी । कैकेयी बैसवावी गजस्कंधीं ।
हाका बोंबांचिये पै नादीं । राज्यपदीं अभिषेका ॥६०॥
पुत्र भोंवंडूनी दोन्ही । कैकेयी बैसवावी सिंहासनी ।
रायासी पिंडदान देऊनी । राजभवनी कैकेयी ॥६१॥
रायासी करोनि घटस्फोट । कैकेयीस विस्तारावें ताट ।
बत्तिस वाटियांचे उभ्दट । चोखट षड्रसीं ॥६२॥
रायासी देता तिळोदक । गोत्रकुंटुंबासी दुःख ।
तंव तंव कैकेयीस हरिख । राज्यसुख भोगावया ॥६३॥
असो हे कैकेयीचें कथन । वना गेला रघुनंदन ।
राजा पावलासे निधन । सहगमन करीन मी ॥६४॥
कैकेयी राहील राज्यभोगासी । मी जाईन पतीसरसीं ।
क्षणार्ध राहता वैधव्यांसी । पापरासी पदोपदी ॥६५॥
पति जळतां धडाधडां । आगीं न रिघती रांडवा मूढा ।
तोडावी गळसरी फोडावा चुडा । सुखभोग पुढा तो ऐका ॥६६॥
काजळ कुंकूं नाही चंदन । दावू नये काळे वदन ।
मासमासासी मूंडण । अति दंडण लाजेचें ॥६७॥
विधवा शोभनीं अशोभन । जीतप्रेत ते विधवा प्राण ।
विधवा मुख्य अपशकुन । सुख कोण जिण्याचे ॥६८॥
केवळ देहलोभासठीं । जे जे बैसे रांड पटी ।
स्वप्नीं सुखासी नाही भेटी । दुःखकोटी अनिवार ॥६९॥
वैधव्याचे महादुःख । सोसूं शके कैकेयी एक ।
भोगावया राज्यसुख । अति कौतुक वैधव्या ॥७०॥

कौसल्या सहगमनार्थ सिद्ध , राण्यांचा शोक :

वैधव्यांचें दुःख दारुण । ते मी न साहे अर्धक्षण ।
करिता राजदेहदहन । सहगमन करीन मी ॥७१॥
देखोनि कौसल्येचे रुदन । राजपत्‍न्या घेती वदन ।
दुःखे तोडिती केश कान । मूर्च्छापन्न पै एकी ॥७२॥
एकी कपाळ स्वये घेती । एकी वक्षःस्थळ पिटिती ।
एकी अति दुःखे पडती । एकी रडती अति शोकें ॥७३॥
एक दुःखवियोग रघुनाथा । दुसरे मरण राया दशरथा ।
तिसरें वैधव्य आले माथा । मूळ अनर्था कैकेयी ॥७४॥
भोगावया राज्यपटा । कैकेयीची वरदनिष्ठा ।
तिघां केलिया ती वाटा । या मुख्य चेष्टा मंथरेच्या ॥७५॥
श्रीरामासी वनप्रयाण । दशरथासी त्वरित मरण ।
यासी मंथरा मुख्य कारण । तिचे कान नाक छेदावे ॥७६॥
राजपत्‍न्या अति प्रवळ । दुःखे करिती हलकल्लोल ।
आले नागरिक सहळ । अति कोलाहल नगरांत ॥७७॥
आक्रंदोनि नरनारी । शोक करिती घरोघरी ।
बोंब पडली राजद्वारी । सेनानी मंत्री चरफडती ॥७८॥

नागरिकांकडून कैकेयीचा धिक्कार :

श्रीराम घालिता बाहेरी । अवदसा आली नगराभीतरीं ।
राजा निमाला दुखेंकरीं । घरोघरी आकांत ॥७९॥
कैकेयीचें काळे तोंड । तिणें वाढविलें वरदबंड ।
तीस मंथरा मिळोनि लंड । दुःख वितंड वाढविलें ॥८०॥
जिचेनि निमाला निजकांत । ते कैकेयीचा करावा घात ।
मंथरा घालोनि चुनखडियांत । राज्य़ीं रघुनाथ अभिषेकाचा ॥८१॥
वेगी लक्ष्मण आणा येथ । तो साधील सर्वकार्यार्थ ।
ऐसे बोलती जन समस्त । तळमळीत अति दुःखे ॥८२॥
निर्लज्ज कैकेयीचा वृत्तांत । ना राम ना दशरथ ।
शेखी ईसी त्यजील भरत । वृथा अनर्थ इणें केला ॥८३॥
भरत स्वधर्मशीळ सात्विक । सप्रेम श्रीरामाचा सेवक ।
तो न पाहे इचें काळे मुख । त्यासही दुःख इयें दिधले ॥८४॥
कैकेयीनें केले जे चरित्र । भरत मानील अपवित्र ।
पति निमाला त्यजील पुत्र । सखे सावत्र दुःखी केले ॥८५॥
श्रीराम गेला वनांतरीं । हे वार्ता ऐकिल्यावरी ।
भरत न राहेल क्षणभरी । तोही रानभरी इयें केला ॥८६॥
जळो तिचे काळे मुख । निजपति मारिला निःशेख ।
पुत्र दुराविले निर्दोष । जगासी दुःख इचेनि ॥८७॥
कैकेयी पाहे ज्या समोर । ते म्हणती झांकीं मुख अपवित्र ।
सन्मुख थुंकती सर्वत्र । करिती मरमर नरनारी ॥८८॥
अवो रांडे अवो मूढे । अवो कैकेयी काळतोंडे ।
म्हणॊनि तिचे नांवे फोडिती धोंडे । अति उदंड निंदीती ॥८९॥
कैकेयी पावली परम दुःख । जगी दाखवू न शके मुख ।
दीवाभीताऐसीं देख । लपे निःशंक अंधारी ॥९०॥
राजगृहीं कोलाहल । नरनारी दुःखी प्रबळ ।
तेथे पावले सुहृद सकळ । आले तत्काळ ऋषिवर्य ॥९१॥

मार्कंडेयोऽथ मौदल्यो वामदेवश्च कश्यपः ।
कात्यायनस्तु जाबालिगौतमश्च महायशाः ॥९॥

राजाच्या निधनानंतर अनेक ऋषींचे आगमन :

दशरथे थोर थोर । नगरी राहविलें ऋषीश्वर ।
ते समस्त आले सत्वर । अति पवित्र ते ऐका ॥९२॥
मार्कंडेय मौद्रल्या उत्तम । कात्यायन जाबालि गौतम ।
कश्यप वामदेव परम । पवित्र नामे जयांची ॥९३॥
ते समस्तही ऋषी । वेगी आले राजसभेसी ।
प्रधान आले तयांपाशी । राजदेहासी दहनार्थ ॥९४॥
एक म्हणती करावे दहन । एक म्हणती पुतत्रेंवीण ।
कोण देईल दाहो जीवन । अधिकार पूर्ण पुत्रासी ॥९५॥

प्रधानादिकांचे आगमन , दहनविधीची चर्चा :

रायाचे जे प्रधान । ते राजपुत्रासमान ।
निःसंतानियाचें दहन । अयोग्य प्रधान सपुत्रिका ॥९६॥
सिद्ध असता धर्मपत्‍नी । तीस योग्यता पतिदहनीं ।
हा अधिकार वंध्येलागोनी । नाही पुत्रजननीस पै योग्य ॥९७॥
ऋषी बोलती सज्ञान । येथ वसिष्ठाचे प्राधान्य ।
तो काही न बोले वचन । राजदहनसंस्कारा ॥९८॥
बुद्धिंवत बोलती गाढे । कैकेयीपुत्र येईल पुढे ।
तंव राजदेहा पडती किडे । दहन रोकडे करावे ॥९९॥
ऐसे ऋषींचे अनुवाद । करिती संवादविवाद ।
वसिष्ठ मर्यादा अगाध । कार्यावबोध तो जाणे ॥१००॥
जाणे कर्मधर्मज्ञान । जाणे वेधशास्त्र विधान ।
जाणे ब्रह्मसमाधान । त्यासमान आन नाही ॥१॥
जयाच्या वचनासाठी । सूर्यमंडळीं तपे छाटी ।
त्याचे ज्ञानाची अगाध गोष्टी । दुजा सृष्टी असेना ॥२॥

वसिष्ठांनी तेलाने भरलेल्या नौकेत राजाचा देह ठेवला :

तेणे वसिष्ठें येवोनि आपण । तैलद्रोणींत राजा घालोन ।
जेणे देह निर्विकार जाण । केले रक्षण अति यत्‍ने ॥३॥
शीघ्र भरताचे आगमन । यदर्थीं सुमंत अति सज्ञान ।
वसिष्ठें देवोनि सन्मान । त्वरे प्रयाण करवित ॥४॥

भरताला आणण्यास सुमंताला पाठविले :

सुमंता तुंवा येचि काळी । तू आप्त एक रायाजवळी ।
भरत आणावा तत्काळी । मायामातुळीं जो आहे ॥५॥
शीघ्र बैसोनिया रथासी । जावे गिरिव्रज नगरासी ।
भेटोनि कैकय भूपतीसी । भरत रातोराती आणावा ॥६॥
करोनि वसिष्ठासी नमन । सुमंतें शीघ्र केले गमन ।
मार्गी आठवितां श्रीरामाचे गुण । करी रुदन पुनः पुनः ॥७॥
श्रीरामाचे रूप गुण । आठवितां विरह पूर्ण ।
एकाजनर्दना शरण । पुढील निरूपण अवधारा ॥८॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अयोध्याकांडे एकाकारटीकायां
दशरथप्राणोत्क्रमणं नाम दशमोऽधायः ॥१०॥
॥ ओव्या १०८ ॥ श्लोक ९ ॥ एवं ११७ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग