नवांची खाणी दहाव्यान
761.
नवांची खाणी दहाव्याने शोकिली ।
अकराव्याने जाली देशधडी ॥१॥
ते ब्रह्मपंथी माखले ब्रह्मपंथी माखले ।
मरोनी जागृत जाले मन गे माये ॥२॥
अवघे अंबर माझे तिंबले ।
ब्रह्मरसे पिळिले वो रंग नव्हे ॥३॥
सारवियोगे माझे कर्म बुडाले ।
निष्कर्म जाले म्हणोनी नातळे ॥४॥
जागृति स्वप्न बुडाली ।
रखुमादेविवरे सहित गिळिली ॥५॥
अर्थ :
श्रोत्र इंद्रियावांचून बाकीची नव इंद्रियांची खाण दहाव्या श्रोत्र इंद्रियाने महावाक्यश्रवण करून शोषण करून टाकले. आणि अकरावे जे मन त्याने तर या देहभावाला देशोधडीला लावले. अशारितीने या ब्रह्मपंथात मारले जाऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन जागे झाले. माझे मनरूपी वस्त्र हे ब्रह्मरसामध्ये पिळले. परंतु कसलाही रंग आला नाही. अज्ञानी जीवांनी साररूप मानलेला जो प्रपंच त्याचा माझा वियोग झाल्यामुळे त्याचे पोषक जे कर्म ते बुडाले. म्हणजे संचित क्रियामाण या सर्व कर्माचा दाह होऊन मी निष्कर्म म्हणजे परमात्मरुप झाले. म्हणून लोकदृष्ट्या कर्माचा भोग असला तरी त्यात मी गुंतत नाही. आता माझी जागृती, स्वप्न, सुषुप्ति हे सर्व बुडाली. म्हणजे रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांनी देहासहित गिळून टाकले. असे माऊली सांगतात.
