ऐसा नित्यानित्य चालत
891.
ऐसा नित्यानित्य चालता सुपंथी | पदोपदी कीर्ति नामघोष ॥१॥
आला आळंकापुरी इंद्रायणी-तीरी | स्नानसंध्या करी देवपूजा ॥२॥
देखोनी सुब्राह्मण केलेसे नमन | वंदिले चरण सिदोपंती ॥३॥
कोण तुमचा गाव आलेति कोठुन | काय अभिधान गमन कोठे ॥४॥
विठ्ठलाचे नाम रामेश्वरी भाव | वृत्ति आपेगाव गोदातीरी ॥५॥
मातापिता वृद्ध वसताती तेथे | द्वारकादि तीर्थे करुनी आलो ॥६॥
आजि धन्य भाग्य स्वामीचे आगमन | आश्रम पावन कीजे माझा ॥७॥
आणुनी मंदिरी सारुनी भोजन | निद्रा करविली पूर्ण तया हाती ॥८॥
तव स्वप्न अवस्थेमाजी येउनी पंढरीनाथ | म्हणे कन्या सालंकृत द्यावी यासी ॥९॥
प्रात:काळ जाला नित्यनेमु सारिला | मग नमस्कार केला सिदोपंती ॥१०॥
वंदोनिया चरण सांगितले स्वप्न | कन्या पाणिग्रहण कीजे तुम्ही ॥११॥
हासोनी उत्तर बोले पै सारांशे | आज्ञा श्रीनिवासे केली नाही ॥१२॥
आजिचा सुदिन स्वस्थ करुनी मन | वंदिले चरण सिदोपंती ॥१३॥
ऐसे सुसंकल्प हेलावती मनी | तुळसी वृंदावनी निद्रा केली ॥१४॥
मग विश्वी विश्वंभर व्यापुनिया स्थानी | येऊनिया स्वप्नी काय बोले ॥१५॥
भक्ति आणि ज्ञान वैराग्य आवडी | हे वसती उघडी तुझ्या अंगी ॥१६॥
मूर्तिमंत चारी जन्मती इच्या उदरी | म्हणोनि स्विकारी आज्ञा माझी ॥१७॥
उठोनि विठ्ठले स्वप्न सांगितले | हरुषे वंदिले सिदोपंती ॥१८॥
पाचारोनी जोशी घटितार्थ पाहिले | गुण उतरले छत्तीसही ॥१९॥
निर्धारिले लग्न मिळाले ब्राह्मण | निर्विघ्न पूजन केले आधी ॥२०॥
देवकप्रतिष्ठा ब्राम्हणपूजन | घटिका जाली पूर्ण म्हणती द्विज ॥२१॥
कुळदेव स्मरण म्हणती सावधान | उभयंतांचे मन पांडुरंगी ॥२२॥
जाले पाणिग्रहण विधीसी अर्पण | वंदिले चरण सिदोपंती ॥२३॥
पांडुरंगक्षेत्रा मिळालीसे यात्रा | आले पंढरपुरा भक्तराज ॥२४॥
गरुडटके पताका मृदंग वाजती | वैष्णव गर्जती जयजयकारे ॥२५॥
गरुडपारी उभे दाटी वैष्णवांची | उपमा वैकुंठीची पंढरीये ॥२६॥
राऊळाभीतरी प्रवेशली दोघे | देखियेले उभे पांडुरंग ॥२७॥
कायावाचामनी पारुषले नयनी | मस्तक चरणी ठेवियेला ॥२८॥
विठ्ठलासी ध्यान रामकृष्ण माळा | हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ति राया ॥२९॥
