(गौळणींची अवस्था)
3778.
(गौळणींची अवस्था)
नका काही उपचार माझ्या शरीरा । करू न साहावे बहु होतो उबारा ।
मनोजन्य व्यथा वेध झाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा वो ॥१॥
सखिया वेशिया तुम्ही प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा ।
उमटली अंगी वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा वो ॥धृपद॥
कळो नेदावी हे दुजियासि मात । घडावा तयासि उत्कंठा एकांत ।
एकाएकी साक्षी येथे आपुले चित्त । कोण्या काळे नेणो होईल भाग्य उदित वो ॥२॥
स्वाद सीण देहभान निद्रा खंडन । पाहिले तटस्थ उन्मळित लोचन ।
अवघे वोसाऊन उरले ते चरण । तुका म्हणे दर्शनापे आले जीवन वो ॥३॥
अर्थ :
एक गोपी आपल्या सख्यांना म्हणते की हे सखयांनो मला श्रीकृष्णाचा वियोग झाला आहे त्यामुळे माझ्या शरीराचा कोणताही उपचार म्हणजे शरीराची कोणत्याही प्रकारची सेवा करु नका मला ती सहन होत नाही याउलट माझ्या शरीराचा दाहच होत आहे. माझ्या मनाला व्यथा झाली आहे माझ्या मनाला केवळ नंदाच्या मुलाचाच वेध लागला आहे त्यामुळे काहीही करु नका केवळ त्या नंदाच्या बाळाला माझ्याकडे लवकर आणा. हे माझ्या सखयांनो मैत्रिणींनो तुम्ही तर माझ्या प्राणप्रिय सख्या आहात माझ्या अंत:करणातील आर्तभूत इच्छा मी तुमच्यापुढे निवेदन केली आहे. हे सखयांनो मला कृष्णभेटीचे वेध लागले आहेत त्यामुळे त्या श्रीकृष्णाची सावळी प्रभा माझ्या अंगी उमटली आहे व माझ्या अंत:करणात जो क्षोभ मला होत आहे जी अवस्था माझी निर्माण झाली आहे त्यावरुनच मला हे सर्व कळत आहे. माझ्या मनाची अवस्था दुसरे कोणालाही कळणार नाही माझी आणि कृष्णाची एकातात गाठ पडावी अशी माझी तीव्र उत्कंठता
