झाली संध्या संदेह मा
2566.
झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयी शेजें आला॥धृ०॥
गुरुकृपा निर्मळ भागीरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती ।
असीपदें एकत्र जेथे होती । स्वानुभाव स्नान हे मुक्तास्थिती ॥१॥
सद्बुद्धीचे घालुनि शुद्धासन । वरी सदगुरुची दया परिपुर्ण ।
शमदम विभुती चर्चुन जाण । वाचे उच्चारी केशव नारायण ॥२॥
बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हा ।
भक्ति बहीण धाऊनि आली गांवा । आता संध्या कैशी मी करु केव्हा ॥३॥
सहज कर्मे झालीं ती ब्रह्मार्पण । जन नोहें अवघा हा जनार्दन ।
ऐसे ऐकेतां निवती साधुजन । एका जनार्दनी बाणली निज खुण ॥४॥
