पुंडलिकालागूनी म्हणे
9.
पुंडलिकालागूनी म्हणे पांडुरंग । सखा जीवलग तूंचि माझा ॥१॥
न पाहासी वास बोलसी उदास । सांडोनिया आस सर्वस्वाची ॥२॥
वैकुंठ सांडोनि आलो तुजपाशी । का गा न बोलसी भक्तराया ॥३॥
पितृभजनाचा झालासी अधिकारी । केली बा पायरी वैकुंठासी ॥४॥
माग बापा कांही आवडे ते घेई । मज वाटे हृदयी घालावाची ॥५॥
नामा म्हणे देवा स्वामी मुगुटमणी । उभा कर ठेवुनी कटावरी ॥६॥
