उदार चक्रवर्ती । वैक
7.
उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपति ।
पुंडलिकाचिया प्रीति । विटे उभा रहिला ॥१॥
सर्वसिद्धीचा दातार । सवे आणिला परिवार ।
भक्ता अभयकर । घ्या घ्या ऐसे म्हणतसे ॥२॥
जेणे हे विश्व निर्मिले । महर्षी देवा संस्थापिले ।
एकवीस स्वर्गाते धरिले । सत्तामात्रे आपुलिया ॥३॥
तुका म्हणे कृपावंत । इच्छिले पुरवी मनोरथ ।
रिध्दि सिद्धि मोक्ष देत । शेखी संग आपुला ॥४॥
8
विठ्ठल आणि श्री पुंडलिक संवाद
पितयाची भक्ति पुंडलिके केली । मात हे ऐकिली देवराये ॥१॥
नवलक्ष गोधने पांचसे सवंगडे । रामकृष्ण पुढे चालताती ॥२॥
उठा चला जावो पुंडलिक पाहो । देव म्हणे भावो पाहो त्याचा ॥३॥
गोकुळीहूनि देव पंढरपूरा पातला । त्वरित पावला वेणूनादी ॥४॥
तेथुनि परतला वाळवंटी आला । तंव देव देखिला पुंडलिके ॥५॥
देव उभा आहे पुंडलिक पाहे । चतुर्भुज स्वये देखियेला ॥६॥
देखियेला हरि शंख चक्र करी । आयुधे ती चारी झळकती ॥७॥
चतुर्भुज मूर्ती देखियेली दृष्टी । पुंडलिके इट टाकियेली ॥८॥
विटेवरी उभा राहिला विठ्ठल । ठसा मिरवला त्रिभुवनी ॥९॥
पुंडलिक भाव पाहू आला देव । प्रसन्न झाले सर्व पुंडलिका ॥१०॥
वैकुंठ कैलास आणिल हा येथे । नामा म्हणे हित झाले आम्हा ॥११॥
