गोकुळीं लाघव दावितो
115.
गोकुळीं लाघव दावितो चक्रपाणी । भोवंत्या वेष्टित बैसल्या अवघ्या गौळणी ।
मध्येम सुकुमार सांवळा शारंगपाणी । चिमणी पितांबर पिवळा ।
गळा वैजयंती माळा । घवघवीत घनसांवळा । पाहे नंदराणी ॥१॥
नाच रे तू कृष्णा मज पाहुं दे नयनी ॥धृ.॥
नाचतो सांवळा सुंदर निमासुर वदन । वाळेघोळ घागरीयांच्या क्षणत्कार पूर्ण ।
आकर्ण नयन सुहास्य वदन पाहुनी भुले मदन । हातीच्या मुद्रिका झळकती ।
क्षुद्र किंकणी सुस्वर गती । वाकी नेपुरे ढाळा देती । पहाती गौळणी ॥२॥
सप्तही पाताळें नाचती हरिचिया गण गंधर्व देव सर्व अक्षर हरिपदें ।
वैकुंठ कैलास नाचती । चंद्र सुर्य रसनायक दीप्ति । ऋषिमंडळ धाक तोडिती । अदभुत हरिकिरणी ॥३॥
नाचती सर्वही फणीपाळ । परिवारेस नाचती पृथ्वेचे भूपाळ । मेरू पर्वत भोगी नायक ।
वनस्पती नाचती कौतुक । वेदशास्त्र पुराण पावक । नाचत शुळपाणी ॥४॥
नाचती गोपाळा गोपिका सुंदर मंदिरे । उखळे जाती मुसळे पाळी आणि देव्हारें ।
धातुमुर्ति नाचुं लागल्या एकसरे । गौळणी अवघ्या विस्मित ।
देहभाव हरपला समस्त । यशादेसी प्रेम लोटत । धरिला धांउनि ॥५॥
शिणलासी नाचतां आता पुरें करी हरी । विश्वरुप पाहता गोपी विस्मित अंतरी ।
यशोदेनें कृष्ण घेतला कडियेवरी । एका जनार्दनी भक्तिभाव ।
अनन्य भक्ता दावी लाघव । निज भक्तांचे काज सर्व । करिता शिण न मानी ॥६॥
