वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › १३, पंढरी महात्म्य व पुंडलिक भाग्य वर्णन अभंग ४४७ ते ४७१

जयाते पाहता परतला आग

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074932 · अभंग क्र. ४५२

452.
जयाते पाहता परतला आगमु ।
निगमा नाकळे दुर्गुमु ।
सिद्ध साधक निरूते वर्मु ।
न पडे ठायी सर्वथा ॥१॥
ते या पुंडलिका ओळले ।
प्रेम प्रीतीने घोळले ।
भक्तिमातेने चाळविले ।
आधीन केले आपणया ॥२॥
जे माये अविद्ये वेगळे ।
गुणत्रया नातळे ।
काळे गोरे ना सांवळे ।
निर्धारित नेणवे ॥३॥
जे द्वैताद्वैताहूनी परते ।
जे सुखांते वाढविते ।
योगी लक्षी लक्षित ज्याते ।
परि नेणवे सर्वथा ॥४॥
जे रूपा अरूपा वेगळे ।
सहस्रनामांहूनि आगळे ।
परम कृपेचे कोवळे ।
क्रिया कर्माविरहित ॥५॥
जे ब्रह्मरसाचे गोठले ।
ते पंढरिये प्रगटले ।
बापरखुमादेविवरू विठ्ठले ।
नामे आथिले चोखडे रया ॥६॥

अर्थ :
ज्या श्रीविठ्ठलाचा विचार करू गेले असता, तो श्रीविठ्ठल वेदशास्त्रालाही कळणे कठीण आहे. म्हणून 'नेति नेति' असे म्हणून वेद परत फिरला. सिद्ध साधकांनाही त्याचे वर्म सापडले नाही. असा तो परमात्मा पुंडलिकरायांच्या भक्तिभावाने सहज प्राप्त झाला. त्या भक्ति मातेने त्याला स्वकीय स्वरूपापासून चाळवून आपले स्वाधीन करून घेतले. ज्या परमात्मतत्त्वाचा विचार करू गेले असता त्याचे स्वरूप माया व अविद्या याहून वेगळे असून गुणत्रयांत सापडत नाही त्याच्यात काळे गोरे किंवा सावळे या वर्णाचा निर्धार करता येत नाही. तो द्वैत व अद्वैत याहूनही पलीकडे आहे. तरीपण त्याचे नाव घेतले असता मनाला सुख वाटते. योगी लोक ज्याचे ध्यान करतात पण त्यांनाही त्याचे स्वरूप कळत नाही. तो रुपवान नाही रुपरहितही नाही असा तो सहस्त्रनामा हुन वेगळा आहे तो श्री विठ्ठल कृपावंत क्रियाकर्माहुन वेगळा आहे. असे ते ब्रम्हरसाचे गोठलेले ते रूप श्रीक्षेत्र पंढरी येथे श्री विठ्ठल नावाने सुंदर, सर्वगुणसंपन्न, शुद्धस्वरूप प्रगट झाले आहे. असे ते माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल आहेत असे माऊली सांगतात

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग