ध्यानी रंगले मानस ।
729.
ध्यानी रंगले मानस ।
जिव्हे नावांचा उल्हास ।
कीर्तन आवडे श्रवणांस ।
नेत्रही स्वरुपास भाळले ॥१॥
वाचा लांचावली गुणा ।
तुमच्या नामसंकीर्तना ।
देह घाली लोटांगणा ।
मस्तक चरणा सोकावला ॥२॥
ऐसी अवघीच अवघ्या ठायी ।
पडली तुमचिये प्रवाही ।
तुम्हावीण दुजे काही ।
कोणा नाठवे सर्वथा ॥३॥
देखिले ते विटेवरी ।
राहिले डोळियांभीतरी ।
ते अवघिया एकचि सरी ।
वेधूनिया ठेविले ॥४॥
निळा म्हणे नव्हे आता ।
पालट केलियाही सर्वथा ।
नामे रुपे पंढरीनाथा ।
लाविले पंथा आपुलिया ॥५॥
