मातेविण बाळा । आणिक
1838.
मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥१॥
तैसे जाले माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥धृपद॥
वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिसा सिंधू ॥२॥
सारसांसी निशी । ध्यान रवीच्या प्रकाशी ॥३॥
जीवनाविण मत्स्य । जैसे धेनूलागी वत्स ॥४॥
पतिव्रते जिणे । भ्रताराच्या वर्त्तमाने ॥५॥
कृपणाचे धन । लोभ्या लागी जैसे मन ॥६॥
तुका म्हणे काय । तुजविण प्राण राहे ॥७॥
अर्थ :
आई जर जवळ नसेल तर बालकाला कोणताही सुख सोहळा असेल तरी तो आवडत नाही. हे पंढरीनाथा तुझ्या वाचून अगदी माझ्या चित्तातही तसेच झाले आहे. चातक पक्षी पावसाच्या एका थेंबाची वाट पाहत असतो. त्याच्या समोर सागर किंवा नद्या जरी भरून वाहत असल्या तरीही त्याला त्याची आवड नसते. सारस पक्षाला रात्रीच्या वेळी असे वाटते की, केव्हा एकदा सूर्य प्रकाश पडेल याचेच ध्यान लागत रहात असते. पाण्यावाचून मासा जगू शकत नाही आणि गाय आपल्या वासराकडे ज्याप्रमाणे ओढ घेते अगदी त्याप्रमाणेच देवा मला तुझी ओढ लागली आहे. पतिव्रता स्त्रीला आपला पती आपल्या बरोबर असल्यावरच ज्या प्रमाणेच सुख वाटते, कृपण माणसाचे म्हणजे कंजूस माणसाचे मन जसे धना वाचून तरफडत असते. तुकाराम महाराज म्हणतात देवा अगदी त्या प्रमाणे माझे झाले आहे तुझ्या वाचून माझे प्राण राहणार आहेत काय ?
