(पाईकाचे अभंग)
3637.
(पाईकाचे अभंग)
एकाच स्वामीचे पाईक सकळ । जैसे बळ तैसे मोल तया ॥१॥
स्वामिपदी एका ठाव उंच स्थळी । एक ती निराळी जवळी दुरी ॥धृपद॥
हीन कमाईचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥२॥
पाईकपणे तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढ्या वाव ॥३॥
तुका म्हणे मरण आहे या सकळा । भेणे अवकळा अभये मोल ॥४॥
अर्थ :
एकाच स्वामीचे सर्व शिपाई असतात परंतू ज्या सेवकाची जशी योग्यता असेल तसे मोल त्याला मिळते. त्याप्रमाणे देवाचे जे सेवक आहेत त्यांचे भक्ती, ज्ञान, वैराग्य पाहून स्वामी त्यांना योग्य तो मोल देतो. व स्वामी सेवकाचा अधिकार पाहून आपल्या उच्च आसनावर किंवा योग्यतेप्रमाणे जवळ दूर ठेवून सेवकाला मोल देत असतात. हीन कर्म करणारा सेवक असेल तर स्वामी त्याला हीन स्थान देतो आणि उच्च कर्म करणारा सेवक असेल तर स्वामी त्याला उच्च पद देतो. जो खरा सेवक आहे तो त्याच्या सेवेने सर्वत्र मान्य होतो आणि जे भित्रे आहेत युध्दाच्या प्रसंगी पळून जाणारे आहेत केवळ वरवर शूराच्या गप्पा मारणारे आहेत ते सर्वांपासून वेगळे निवडले जातात. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सेवकांना मरण तर आहेच परंतू जो युध्दाच्या प्रसंगी भितो त्याला अवकळा होते आणि जो भित नाही त्याला मोल मिळते.
