एक तत्व सांगति वेदाद
195.
एक तत्व सांगति वेदादिक बडिवार । ब्रह्म कर्म आचार भजनालागी॥१॥
अदिमध्य अवसान सत्व रज तम । प्रकृति सर्वत्र संपत्ति आकारला ॥२॥
सोहं पै अनंतु सेविता साचार । गुरुमार्गे साचार भजन केले ॥३॥
देवी नादे रसना धर्मी नांदे भावो । एकतत्वी देवो क्षरला असे ॥४॥
आदिअंत हरपला नाही तेथे कल्पना । देही दीप भाना विठ्ठलचरणी ॥५॥
याचेनि परिपाठे नासतिल पापे । एक नाम सोपे हरिचे जाणा ॥६॥
निवृत्ति साम्यता सर्वाघटी दिसतु । विठ्ठल हेचि मातु नित्य नेम ॥७॥
अर्थ:
वेदादिक मोठ्या आभिमानाने एक तत्वाची महती गातात तेच ब्रह्मकर्म व भजनासाठी ही लागु होते. तो परमात्मा प्रकृतीसह प्रगटल्यामुळे तिन्ही गुणानी युक्त जगत असार असले तरी सार वाटते पण त्याला आदि मध्य अंत नाही. गुरुमार्गे केलेल्या भजना मुळे मीच ब्रह्म ही अनुभुती साचार होऊन मला भोगता आली. जिभेवर दैवी संपत्ती व भावाला धर्म केला की एक तत्व असणारा आत्माराम साधकाच्या ठायी क्षरला जातो. ज्या ठिकाणी आदिअंत हरपतो कल्पना निमते त्या विठ्ठल चरणावर एकरुप झाले की देहाचा दीप होऊन आत्मप्रकाश प्राप्त होतो. ह्याच्या एक नामाच्या उच्चारणाने पाप संपुन जाते. निवृत्तिनाथ म्हणतात, मी विठ्ठल नामाचा नेम केल्याने मला सर्वा ठायी साम्यता दिसते.
