शेत
2135.
शेत
संसार शेत सुलभ थोर भूमी वाहिली नवही द्वारे । पांचही आउते मेळवुनी तेथे जुंपियेली दोन्ही ढोरे ।
उखीते करी येति जाती भारि नव्हती कोण्हि स्थिरे । बुनादि शेत वाहिले ते काय सांगू अपाररे ॥१॥
संसार शेत करि कांरे आल्या देहाचिया लाहे परि । भक्ति उंच माळा उभा राहुनि हरिनाम सोंकरिरे ॥२॥
हरिश्चंद्र राजा सात्विक भला तेणे बाहो केला । सत्त्व नांगर त्रिगुण तिफणि निर्वाण कुळव धरिला ।
भक्ति कुर्हीवरी उभा राहूनिया बहुत भाग्य पिकला । खळेदाणे तेणे दिधले ब्राम्हण युगायुगी तरलारे ॥३॥
शिराळ शेटी कुळवाडी मोठा बहु सोसियेल्या वेठी । आलिया गेलिया जेववी राड भक्ता देतो थोर सृष्टी ।
भला म्हणोनि जगी वाखाणिला देव आला त्याचे भेटी । मुक्ति शेत तया इनाम दिधला ठाव दिला वैकुंठी ॥४॥
रावणाचे शेत चवदा चाहुर दाटल्या दुर्बुद्धी पेढी । गर्व अहंकार दाट खुंट झाडे शेत आले तेणे पडी ।
किडा मुळिंजो बैसला बीज गेले तेणे वोढी । बटकर बाण अंगी जो सेकला तोही झाला देशधडीरे ॥५॥
अवघी कुळवाडी कौरवे केली नाटोपेचि दुर्योधन । अर्ध वांटेकरी धर्म दुराविला शेतासि नाही रक्षण ।
अधर्म टोळी शेत जे खादले बिज गेले चौपट होऊन । हरिभक्तिविण फलकट जाले न जोडे कृष्ण निधानरे ॥६॥
पांचही पांडवी नवाट काढिले वाहिले सद्वैत वन । निरंजन वन शेत जे पिकले आपण कृष्ण रक्षण ।
द्रौपदी सुंदरी डाहोरा जो केला दुर्वासा दिधले भोजन । अनंत खंडी सांजे जे पिकली जोडले कृष्ण निधानरे ॥७॥
ज्ञानदेव चांगदेव वटेश्वर निवृत्ति मुक्ताई सोपानदास । परसाभागवत सांवता सालया रसाळ चोखा मुधेश ।
परमानंद जोगाजनमित्र नागा गोरा दागा कूर्मदास । इतुके शेतकरी त्यांचा अंगेवाटे करी नामा विष्णुदासरे ॥८॥
