एक मुख नेणती । नाम ह
124.
एक मुख नेणती । नाम हरीचे न घेती ।
मुखे भलतेंचि जल्पती । ते पावती अध:पंथा ॥
नामेंवीण सुटका नाही । ऐसी वेदशास्त्री ग्वाही ।
जो वेद मस्तकी पाही । ब्रह्मयाने वंदिला ॥
नित्य नामाची माळा । जिव्हे घे तू गळाळा ।
तो नर कर्मावेगळा । ऐसे बोलती पुराणे ॥
नयनी श्रवणी हरी । आणिक काम न करी ।
तो साधु भक्त निर्धारी । हरिचा आवडता ॥
ज्ञानदेवी पाहिले । हरिनाम साधुनी घेतले ।
ते समाधीस केले । पुष्पशयनी आसन ॥
अर्थ :
नामाचा महिमा न जाणल्याने मुर्ख नाम घेत नाहीत. जे तोंडाने भलतेच बोलतात त्यांचे अधःपतन निश्चित आहे. ह्या नामाविण सुटका नाही ह्याची वेदशास्त्र ग्वाही देतात. ब्रह्मदेवाने त्यामुळे वेदांचे महत्व ओळखुन मस्तकी धरले. हे जिव्हे तु नित्य नामाची गुळणी घे. असे करणारा तो नर कर्मावेगळा ठरतो असे पुराण सांगतात. ज्या डोळ्यासमोर व मुखात सतत हरि असतो दुसऱ्या कामात मन नसते तो साधु भक्त निर्धाराने हरिचा आवडता होतो. मी हरिनाम साधल्याने पुष्पासनाचे आसन घालुन मला समाधीस्त केले असे माऊली सांगतात.
