आजि शुभ लवे लोचनु हर
893.
आजि शुभ लवे लोचनु हरिखे सांगताहे शकुनु स्वप्न देखिले सुंदरी ।
अलंकार लेववा चंदन चर्चावा जाति जुती पार्यातिके शेंवती करा आइती सेजारी ।
शेला काढा मेचुचा हा दिन दैवाचा ।
सोहळा तो आमुचा मंदिरी गे माये ॥१॥
गुढिया उभवा मखरे शृंगारा भेटी होईल आळंगी ।
स्फुरण आले बाही क्षेमालागी पाही काचोळी न समाये अंगी गे माये ॥२॥
जिवी जीव सुंदर त्याचेनी साचार तो मज भेटवा सुखाचा विसावा ।
सुमने उकलली नित्य दे माळी उचित करी तया भावा ।
आजी वेळु का वो लाविला नेणो पंथी ।
सीणला बुझाऊ जाऊ त्याच्या गांवा गे
माये ॥३॥
हृदयी निर्भर प्रेम वोरबार माझे चित्ती राहो ऐक्य मज ।
दुजिये वस्तुलागी रुत जाय माधवी मन्मथ करिता हे वोज ।
ऐसी तेथवरी जाईन सुखाची होईन नाचेन आनंदाचे भोजे गे माये ॥४॥
ऐसा विपरीत लाघवी लपे सवेंची दावी वासिपे चौके ।
अभ्यासे अंतर पडले येणे तरी मी त्यजीन जिणे म्हणोनी विनवितसे चतुर सुरेखे ।
रात्रीचे ठायी देख मेघःश्याम बोलला अंबरी गे माये ॥५॥
ऐसिये निवांत मूर्ति ऐकोनी ठेली श्रुती ।
आकर्षोनी चित्त चैतन्य भरोनी ठेले लोचन ।
ध्यानी विसर्जिले मन परमात्मया रामा तू एक लाघवी सावेव पावले ज्ञान ।
बापरखुमादेविवरा विठ्ठला सुमन संयोगी आजी सत्य झाले माझे स्वप्न गे माये ॥६॥
अर्थ :
एक विरहिणी म्हणते आज माझा शुभशकुन दाखविणारा डोळा लवत आहे. त्यामुळे मला आनंद होत आहे. मला असे स्वप्न पडले. मी आपल्या मैत्रिणीला म्हणत आहे. माझ्या अंगावर अलंकार घाला. चंदनाची उटी लावा. जाई, जुई, पारिजातक, सेवंती इत्यादि सामुग्रीने शेज़ तयार करा. माझ्या अंगावर घेण्याचा शेला काढा हा दिवस मोठा आवडीचा व भाग्याचा आहे. असा त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटीचा सोहळा मंदिरात होणार आहे. याकरिता तुम्ही गुढ्या उभारा, मखर शृंगारून तयार करा, आज त्या श्रीकृष्ण परमात्म्याची भेट होईल. आणि मी त्यास अलिंगन देईन पहा. त्याला अलिंगन देण्यासाठी माझे बाहु स्फुरण पावत आहेत. ही पहा अंगातील कांचोळी अंगांत मावेनाशी झाली ज्याप्रमाणे माळी सुंदर फुललेली फुले नेहमी देतो. त्याप्रमाणे सर्व जीवांचे जीवन व सुंदर असून, सर्व जीवांचा विसावांच असणारा श्रीकृष्ण मला भेटवा. आज त्यांनी येण्याला का बरे वेळ लावला? वाटेत येता येता थकला कां? काही समजत नाही. चला त्याच्या गावाला त्याची समजूत घालण्याकरिता जाऊ. माझ्या चित्तांत त्याच्याविषयी अत्यंत प्रेम आहे व चित्तांत त्याचे प्राप्तीची खटपट आहे. नेहेमी त्याचे ऐक्य असावे असे चित्तांत वाटते. दुसऱ्या गोष्टीकडे चित्तच जात नाही. जणू काय माझा पाय रूतून जातो. पहा, हा वसंत ऋतु माझ्या अंतःकरणांत काम उत्पन्न करीत आहे. याकरिता मी त्याच्यापर्यंत जाईन आणि मोठी आनंदी होऊन त्या आनंदाच्या जोराने त्याच्यापुढे नाचेन. जगांत आम्ही पुष्कळ पुरूष पाहतो. परंतु या श्रीकृष्णाचे लाघव विचित्र आहे. क्षणांत दिसतो, क्षणांत लपतो, क्षणांत भीती उत्पन्न होऊन अंतःकरण चकित होऊन जाते. अशी त्याचे प्राप्तीकरिता खटपट करूनही त्याच्याशी अंतर पडले म्हणजे भेट झाली नाही तर मी आपला जीव टांकून देईन. याकरिता त्याची प्राप्ती व्हावी म्हणून तुम्हा चतुर बायांना विनवित आहे. रात्रीच्या वेळी पहा ते मेघःशाम आकाशवाणी झाल्यासारखा बोलला. ते कानांनी ऐकून मी अगदी निवांत राहिले. माझे चित्त त्याचेकडे आकर्षित होऊन त्याचेकडे डोळे लावून राहिले. व मन ध्यानांत गुंतले हे परमात्मा सखारामा तू एक जगांत लाघवी आहेस. सर्व प्रकारे तुझे ज्ञान झाले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ठिकाणी मनाचा संयोग होऊन आज माझे स्वप्न खरे झाले. असे माऊली सांगतात.
