ऎका पुण्य पवित्र कथा
3365.
ऎका पुण्य पवित्र कथा । सावधान व्हावे श्रोतां । जयाचेनि अवधानें सर्वथा । कलिकल्मषें नासती ॥१॥
जे आचरला अंबऋषी । रुक्मांगद सूर्यवंशी । तेंचि व्रत एकादशी । निजधर्मासी सांगेन ॥२॥
परिसा एकादशीचा महिमा । तोचि दिवस प्रिय पुरुषोत्तमा । मुगुटमणी सकल धर्मा । विचित्र कर्मा सोडवण ॥३॥
तिथिजयचें महिमान । त्रैरुपें अभिन्न जाण । परिसा तियेचें लक्षण । तात्विकार्थ तो ऎसा ॥४॥
दशमी जाणा महाविष्णु । एकादशी श्रीनारायणु । द्वादशी श्रीभगवानु । भक्त साहाय्याकारणें ॥५॥
संक्रमणादि दान श्रेष्ठ । याहुनी ग्रहणीचें वरिष्ठ । ग्रहणाहुनी वरिष्ठ । व्यतिपात वैधृति ॥६॥
याहुनी अनंत गुणें अधिक । एकादशीचे दान विशेष । दानमिषे एकाएक । देवचि देख पै लाभे ॥७॥
यालागी एकदशीचे दान । ते होय देवाची समान । दानयोगे तेणे जाण । देव अपैसा पै केला ॥८॥
अर्धोदय कपिलाषष्ठी एकादशीच्या चरणांगुआष्ठीं । योगयागाची कोटी । टाळीसाठीं नासरती ॥९॥
दशमी व्राताचा आरंभु । दिडीपुढें समारंभु । मिळोनि वैष्णवांचा कदबु । गीत नृत्य उत्साह ॥१०॥
आली एकादशी परिसोनी । उल्हास उपजे ज्याचे मनी । धन्य धन्य त्याची जननी । पवित्र अवनी तेणे केली ॥११॥
अनंत व्रतांचिया राशी । पाया लागती एकादशी । यालागी हरिदिनीं आख्या ऎशी । त्या दिवसा पै आली ॥१२॥
एकादशी हरीचा प्रसंग । आठही प्रहर ते अष्टांग । जे नर भाग्याचे सभाग्य । पूजा सांग करिताती ॥१३॥
प्रात:काळापासून । तेथे प्रगटे नारायण । त्यासीच म्हणती हरिदिन । व्यास वाल्मिकी नारद ॥१४॥
यालागी तो हरीचा दिवस । तो सत्य जाणा हृषीकेश । धन्य धन्य भाग्य सारस । गीत नृत्य उत्साह ॥१५॥
ऎशी हरितनु एकादशी । म्हणोनी आवडे वैष्णवासी । नारद प्रल्हाद अंबऋषी । या व्रतासी विनटले ॥१६॥
बरवे करावे हरि पूजन । श्र्वुंगारावें देवसदन । आठहि प्रहर हरिकीर्तन । जागरण करावे उल्हासें ॥१७॥
जाग्रणा एकादशी । येता होती पुण्यराशी । पदोपदी कोटी यागांसी । फ़ळ समारंभेसी जोडती ॥१८॥
जे तेथे बैसोनि सावधान । परिसती हरिकीर्तन । त्याचे निरसे भवबंधन । समाधान ते पावत ॥१९॥
वैष्णव होऊनी एकादशी । अंग चोरी हरिकीर्तनासी । भाग्य विन्मुख जाले त्यासी । मुळ्यापासीं तेणे केले ॥२०॥
यालागी एकादशीस वाडेंकोडें । नामासाठी मोक्ष जोडे । तेथेंही अभिमान चढे । रवरव पुढे तयासी ॥२१॥
एकादशी रंगापुढें । रंगी नाचती वेडेबागडे । नाम गर्जती साबडें । ते आवडे गोविंदा ॥२२॥
नामासरसी वाजे टाळी । महादोषा होय होळी । सांडोनि वैकुंठ नव्हाळी । तयाजवळी हरी तिष्ठे॥२३॥
जाग्रणा येऊनि एकादशी । जो हरिभक्तासी उपहासी । तो जाणावा पापराशी । नरक त्यासी पै भीती ॥२४॥
देखोनि निंदकाचा भावो । रवरवा पडिला संदेहो । निंदेपरते पाप पहा हो । जगामाजीं पै नाही ॥२५॥
जेणे निंदिली एकादशी । तो जिताची नरकवासी । कुषठ लाविले मुखासी । ये मुखासी मुखरोग ॥२६॥
ज्यासी न माने माने एकादशी । तनु जाणावी ती राक्षसी । त्यासी संगती घडे ज्यासी । नरकवासी तो होय ॥२७॥
जे एकादशीस भक्षिती अन्न । ते श्वानविष्टेसमान । तांबूल ते रुधिरपान । रजस्वले स्त्रियेचें ॥२८॥
एकादशीस स्त्रीभोग । तयासी लागे क्षयरोग । यमयातना दु:खें अनेग । व्यथा अंगी तो पावे ॥२९॥
बाह्य मिरवी एकादशी । चोरुनी खाये अन्नासी । उदरशुळ लागे त्यासी । नातरी कुक्षीं गुल्म होती ॥३०॥
एकादशीस स्नेहमार्जन । बुध्दि अंध होय तेणे । नेत्ररोगासी उटणे । क्षुद्र पहाणॆं हरिभक्ता॥३१॥
जो निंदी एकादशी । नरका जाणॆं न लगे त्यासी । तो स्वयेंचि नरकवासी । झणी आतळला॥३२॥
जेणे दूषिलेंएकादशी । झणी त्याचे नाम घेसी । रामराम म्हणता वेगेसी । त्या पापासी प्रायश्चित॥३३॥
ज्यासी निष्ठ एकादशीचे भजन । त्यासी सर्वथा नाही पतन । पूर्वज उध्दरती जाण । यमयातनेपासुनी॥३४॥
गर्जती हरिनामाचा घोष । त्यांचा यमदूतां पडे धाक । नामे प्रायश्चित शीक । लागली भीक महात्तपा॥३५॥
यमयातनेचें पितर । वाछिताती निरंतर । एकादशी हरिजागर । वंशी तत्पर हो कोणी॥३६॥
पुत्र अथवा भ्रातृपुत्रा । दुहित्र अथवा दुहिता । करिता एकादशी हरिजागर । यमप्रहार ते चुके॥३७॥
जो एकादशी व्रत धरी । तो अतिशय पढीये हरी । यालागी देव त्याचे घरी । निरंतर तिष्ठत॥३८॥
जेथे राहिले हरि वरिष्ठ । तोचि आश्रम होय श्रेष्ठ । ब्रम्हानंदें पिकली पेठ । ग्राहिक तेथे हरिभक्त॥३९॥
ऎसे एकादशीचे व्रत । निर्विकल्प जे आचरत । त्याचे घरी हरि तिष्ठत । कांतेसहवर्तमा॥४०॥
तीर्थव्रताचें पारडे । तुकितां एकादशी पुढे थोडे । तेथेंही जागरण घडे । भाग्य केवढें तयाचें॥४१॥
द्वादशीस शीत मात्र अन्न । ते होय मेरुमंदारासमान । तेथेंही निर्विकल्प ब्राम्हणभोजन । आत्मा गमन तेणे चुके॥४२॥
द्वादशीचें अन्नदानीं । देव भक्ताचा जाला ऋणी । यालागी पै चक्रपाणी । भक्तवाणी नुल्लंघी॥४३॥
द्वादशीचें फ़ळ संधान । अमर्याद पुण्य गहन । कोटीयागांचे श्रेय जाण । निंबलोण करिताती॥४४॥
द्वादशीच्या ग्रासोग्रासी । तृप्ति होय यज्ञपुरुषीं । ते फ़ळ लाधले अंबऋषी । गर्भवासीं देव पै आला॥४५॥
एवं जालिया पारणे विधि । जो आरंभी क्षीराब्धी । भक्तामाजीं तो आधी । वैकुठपीठीं राहे॥४६॥
क्षीराब्धीचा प्राप्तकाळ । मिळोनि वैष्णवांचा मेळ । नाना परी करिती गदारोळ । तो सोहळा हरिप्रिय॥४७॥
एकादशी देवजागरा आला । क्षीरापतिलागीं ठोको लागला । जैसा बुभुक्षु दुकाळला । तैसा वाट पहातसे॥४८॥
ऎकोनि क्षीरापतीच्या गोष्टी । आवडी देव लाळ घोटी । हरीख न समाय सृष्टी । उल्हास पोटी न समाये॥४९॥
क्षीरापती वाळुवटी । संत वैष्णवांची दाटी । देखोनि देवा आवडी मोठी । येत उठाउठी पै तेथें॥५०॥
क्षीरापती सेविता वैष्णव । मुखामाजी मुख घालितो देव । नवल भावार्थाचा भाव । अगम्य पहाहो सुरनरां॥५१॥
सेविता क्षीरापतीची गोडी । येरयेरापुढें घालिती उडी । हर्षे नाचता आवडी । धरिती गोडी उल्हासें॥५२॥
क्षीरापति घालिता वैष्णवांचे मुखी । तेणे सुखें देव होय सुखी । धन्य भाग्याचे इहलोकी । व्रत वोळखी त्या जाली॥५३॥
पडली वैष्णवाचे पायातळीं । जो सेवी क्षीरापतीची रवाळी । सकळ पापा होय धुळी । हरी जवळी तो पावे॥५४॥
सेविता वैष्णंवांचे शेष । कलिकल्मषा होये नाश । पाया लागे मोक्षसुख । स्वात्मसुख तो पावे॥५५॥
यापरी एकादशी । भक्त उद्वरती दोष पक्षी । मोक्षचिया राशी । तिथियत्रा जोडिती॥५६॥
धरी जरी व्रतासी दृढभाव । तरी सबाह्य प्रगटे देव । करुनी संसार वाव । निजात्मा ठाव निजपदीं॥५७॥
व्रतातपांचें काबाड । सकळ धर्मांचें पुरे कोड । धरलिया एकादशीची चाड । सकळही फ़ळें लाभतीं॥५८॥
जो एकादशीचा व्रती । त्यासी तीर्थे पै सेविती । तेणे पुण्ये भगवत्प्राप्ती । क्षणमात्र न लागतां॥५९॥
एकादशीच्या उपवासी । रुक्मांगद सूर्यवंशी । नगरी नेली वैकुंठासी । निजसुखासी पावला॥६०॥
तैशीच जाणावी द्वादशी । प्रसन्न जाली अंबऋषी । दहा गर्भवास सोशी । उणें भक्तासी येवो नेदी॥६१॥
ज्यासी असे मोक्षाची चाड । तींही नाना साधने काबाड । सांडोनिया दृढ । व्रत एकादशी करावें॥६२॥
एका जनार्दनी सांगे । का शिणाल योगयागें । एकादशीच्या प्रसंगें । देवची अंगे लाधला॥६३॥
