वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

ढालतलवारे गुंतले हे

🙏 3. संत तुकाराम · ABH-080854 · अभंग क्र. ३३४५

3345.
ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी झुंजार कैसा जुंझो ॥१॥
पोटी पडदाळे सिले टोप ओझे । हे तो झाले दुजे मरणमूळ ॥धृपद॥
बैसविले मला येणे अश्वावरी । धावू पळू तरी कैसा आता ॥२॥
असोनि उपाय म्हणे हे आपण । म्हणे हायहाय काय करू ॥३॥
तुका म्हणे हा तो स्वये परब्रम्ह । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥४॥

अर्थ :
एक भित्रा शिपाई युध्दाच्या प्रसंगी म्हणतो की माझ्या एका हातामध्ये ढाल आहे तर दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे त्यामुळे माझे दोन्हीही हात गुंतले आहेत तसा तर मी फार शूर शिपाई आहे पण आता मी युध्द तरी कसे करु ? अहो युध्द बाजूलाच राहीले परंतू माझ्या डोक्यात टोपी अंगामध्ये जड चिलखत घातलेले आहे कमरेला पट्टा बांधलेला आहे युध्दप्रसंग तर सोडा परंतू या जड हत्यारांनीच मला मरण ओढावल्यासारखे वाटत आहे. त्यामध्ये माझ्या सेनापतीनी मला घोडयावर बसवले आता एवढे ओझे सांभाळून शत्रूच्या मागे मी धावू कसा आणि शत्रू माझ्या मागे लागला तर मी पळू कसा ? त्या शिपायाजवळ युध्दाच्या प्रसंगी लागणारे हत्यार अंगामध्ये चिलखत डोक्यामध्ये टोपी कमरेला पट्टा हे प्रसंगी उपयोगी पडणारे साहित्य शस्त्रे दिलेले आहेत परंतू त्याला ते उपाय वाटत नसून अपाय वाटत आहेत आणि तो म्हणतो कसा की हाय हाय मी काय करु माझ्या अंगावर एवढे जड साधने दिले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, अगदी त्याप्रमाणे हे मनुष्य आहेत विचार करुन पाहिले तर परब्रम्ह हेच मूळस्वरुप जीवाचे आहेत परंतू अज्ञानामुळे परब्रम्हस्वरुप हे झाकले जाते आणि मूर्खांना हे कळत नसल्यामुळे हरीप्राप्तीचे मुख्य वर्म म्हणजे संतचरण सेवा आहे हे देखील कळत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग